संभाषण आणि आपण

आपल्या वाणीने आपण माणसं जोडतो किंवा तोडतो. काही जण काहीतरी कारण काढून इतरांना दुखावत असतात. एक क्लाएंट आपले संभाषण कौशल्य कसे असावे याबाबत विचारात होता.
उपयुक्त व प्रभावी संभाषणाचे पहिले तत्त्व हे आहे की, ज्यांच्याशी तुम्ही संभाषण करीत आहात किंवा करायचे आहे त्या व्यक्तीला आपल्यापेक्षा अधिक महत्त्व देणे. संभाषण कलेच्या उच्च शिखरावर पोहोचविणाऱ्या पहिल्या तत्त्वाचा परिचय संत कबीरांनी आपल्या दोह्यातून अशा प्रकारे दिला आहे-

ऐसी बानी बोलिए मन का आपा खोय।
औरन को शीतल करें आपहु शीतल होय॥

अहंकाराला सोडून दुसर्‍यांना महत्त्व देताना, सविनय बोलून जे सुख आपण दुसर्‍यांना देतो, तेच दुप्पट होऊन आपल्याला सुखी बनवते व आपले महत्त्वही वाढवते. आपण दुसर्‍यांच्या सुख- सुविधा, आवड-निवड, विचार-सिद्धांत तसेच भावना व मान- सन्मानाकडे लक्ष देत आणि त्यांच्या पसंतीला दुजोरा देऊन आपले विचार व्यक्त करणे संभाषणाच्या यशस्वीतेसाठी आवश्यक असते. मतभेदाच्या प्रसंगीदेखील दुसर्‍यांच्या विचारांवर टीका न करता आपले विचार सविनय व्यक्त करावेत; मात्र दुसर्‍यांवर आपले विचार लादण्याचा प्रयत्न करू नये. वादविवाद दूर ठेवून एकमेकांशी गोडी-गुलाबीने राहिल्याने मतभेद असूनसुद्धा आपला कुणी विरोधक असणार नाही. एखाद्याला आपला मित्र बनविण्यासाठी त्याचा व्यक्तिगत परिचय जाणून घेण्यापेक्षा आपण त्याचे विचार व भावनांना समजून-उमजून घेण्याची कितीतरी जास्त आवश्यकता असते. हा गुणविशेष अंगी बाळगल्यामुळे सर्व जगाला आपलेसे करून घेण्याचे व त्यांच्याशी सामंजस्य साधण्याचे सामर्थ्य आपल्यात येते. तेव्हा आपल्यासाठी कुणी परका राहत नाही तसेच आपण स्वत: सर्वांच्या प्रेमाला पात्र होतो. राग, द्वेष, क्रोध किंवा कुठल्याही प्रकारच्या उत्तेजीत भावनेने प्रेरीत होऊन भल्याबुर्‍यांचा विचार न करता भलतेच काही बोलणे सुसंवाद तत्त्वांच्या विरुद्ध असते. या प्रमादापासून वाचण्यासाठी कुण्या कवीने योग्यच म्हटले आहे.

वाणी अति अनमोल, विचार करूनच बोला जरा । भल्या बुर्‍याचा विचार करुनी, तोंड आपले उघडे करा ॥

दुसर्‍यांच्या भावनांचा आदर करून विचारपूर्वक बोलणारा माणूस कधीच दुसर्‍याला दु:खी करीत नाही. अशा लोकांची संख्या सतत वाढत गेली तर समाज तसेच कुटुंबात असलेली कटुता, असहिष्णुता, वैरभावना इ. सामाजिक रोगांचा विनाश होईल. हे सर्व आपल्याच हातात आहे.

संवाद व गप्पा मारणे या संभाषणाच्या पूर्णपणे भिन्न व विरुद्ध क्रिया आहेत. गप्पा मारणे ही निरर्थक, निरुद्देशीय वेळ वाया घालवणारी प्रक्रिया आहे. दुसरीकडे संवाद साधणे ही सार्थकता, रंजकता आणि उपयुक्ततेच्या गुणांनी संपन्न, वेळेचा सदुपयोग करणारी प्रक्रिया आहे. जिचे काही फायदेशीर परिणाम होतात. संवाद साधताना चर्चेत सहभागी असलेल्या सर्वांबद्दल आपलेपणाची भावना ठेवून सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करायला हवे.

संवाद एखाद्या खेळासारखा असतो. त्यात सर्वांनी रस दाखवला तरच तो रंगतो व सार्थकी लागतो. या खेळाचे एक वैशिष्ट्य आहे की, यात सर्वजण स्पर्धक असूनही एकमेकांचे सहकारी व मित्र असतात. लाजाळूपणा, भिडस्तपणा, भीती, मानसिक उणिवा हे चांगला संवाद साधण्यात अडथळा करणारे महत्त्वाचे घटक आहेत. हे तीन दोष संभाषण आपली प्रगती थांबवतात, मनातील भावना व्यक्त करण्याला मारक ठरतात व हीनपणाची भावना निर्माण करतात. मात्र आत्मविश्वासाने सातत्यपूर्ण तसेच सावध व प्रयत्नपूर्वक केलेल्या सरावाने या उणिवा दूर सारता येतात. संभाषण कौशल्य नक्कीच शिका व वापर करा.

श्रीकांत कुलांगे
मानसोपचारतज्ज्ञ

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *