संभाषण आणि विनोदबुद्धी

प्रत्येक ठिकाणी विनोद नसावा हे माझ्या मित्राचे म्हणणे होते. त्यावर त्याच्याशी सविस्तर चर्चा केली. सर्वश्रुत असलेली वक्ते मंडळी विनोदाचा वापर योग्य त्याठिकाणी कसे चपलख करायचे हे त्याला पटवून द्यायला वेळ लागला नाही.

विनोद नेहमी निरोगी आणि सुखद असायला हवा. त्यात कडवी टीका, तक्रार, टोमणे, उपहासासारख्या भावना मुळात नसायला हव्यात आणि कुणाला अपमानित अथवा लज्जित करण्यासाठी त्याचा आधार घेतला जाऊ नये. विनोदप्रियता हा गुण अंगी बाळगल्याने आपल्या दृष्टिकोनात व परिस्थितीला तोंड देण्याच्या क्षमतेत गुणात्मक फरक पडतो. आपण अत्यंत दु:खी अवस्थेतही तिच्या आनंदी बाजूकडे पाहू शकतो. त्यामुळे आपल्या कष्टाचा भार हलका होतो. त्यावर सर्वोत्तम इलाज आहे, विनोदाचा मलम. मनोविनोद व मनोरंजन यांच्याआधारे प्रतिकूल परिस्थितीत संतुलन कायम ठेवून आपल्या चेहऱ्यावर शांत व सहास्य ठेवण्याचा सराव केला पाहिजे. यामुळे आपल्या स्नायूतंतूंवरील तणाव कमी होतो आणि आपण परिस्थितीला तोंड देण्यासाठी काही विचार करण्यास समर्थ होऊ शकतो. तसे तर माणसाला जीवनातील प्रत्येक क्षेत्रात व प्रत्येक परिस्थितीत मानसिक संतुलन राखण्याची गरज असते. मात्र यशस्वी संभाषणासाठी तर याची सर्वाधिक आवश्यकता असते.

कोणत्याही स्थितीत शांत, संतुलित व आनंदी राहणारा माणूस सर्वांसाठी आनंद, आशा व उत्साहाचे वातावरण निर्माण करतो. तो संभाषणात सरसता व सार्थकता आणतो आणि संभाषणात सहभागी सर्व लोकांचा विचार करतो व दुसर्‍याचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करून आपल्या बोलण्याने, विचारांनी दुसर्‍यांना प्रभावित करण्यास समर्थ ठरतो. विनोदप्रिय माणूस रणांगण किंवा न्यायालयासारख्या अप्रिय वातावरणालाही सुसह्य करून टाकतो.

संभाषणादरम्यान काही कारणावरून चिडचिड झाल्यास तत्काळ खाली दिलेल्या साधनांचा आधार घेऊन स्थिती हाताबाहेर जाण्यापासून वाचविण्याचा प्रयत्न करायला हवा.

1. आपल्याला अप्रिय वाटणार्‍या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे.

2. संभाषणाचा विषय बदलून त्याला विनोदाची झालर द्यावी.

3. काही निमित्ताने थोड्या वेळासाठी तिथून निघून जावे व काही गमतीदार प्रसंग आठवून शांतपणे सुस्मित होऊन परत यावे.

रागाचा आवेश आपल्या मेंदूला अशांत व विवेकबुद्धीला निष्क्रिय करून टाकतो. तो हृदयाला कमजोर व स्नायूतंतूंना सैल करून हळूहळू आपल्याला रोगी बनवतो. रागीट माणूस स्वत: आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्याचा शत्रू बनून आपल्या जीवनाचे क्षण कमी करतो. शांत स्वभावाच्या लोकांच्या तुलनेत चिडचिडे व रागीट स्वभावाचे लोक लवकर-लवकर आजारी पडतात आणि वेळेच्या खूप आधी वृद्ध होतात. असे लोक रागाच्या भरात तोडफोड, हिंसाचार, मारझोड, शिवीगाळ तसेच खूनही करून बसतात आणि कधी कधी आत्महत्याही करतात.

मिळून-मिसळून बोलणे किंवा एकत्र काम करण्याच्या मुळावरच तापटपणा आघात करतो. म्हणून आपल्याला आपली व आपल्या व्यवहार आणि व्यापाराची पवित्रता राखण्यासाठी आपल्या या दुबळेपणालाच संपूर्णपणे नियंत्रणात ठेवायला पाहिजे. राग व तापटपणाला शांत करण्यासाठी विनोदाच्या मलमाने लगेच त्याच्यावर उपचार करायला पाहिजे. विनोदाच्या योग्य वापराने गांभीर्याचे सावट दूर सारून मानवी हृदयाला प्रफुल्लित करण्याची क्षमता प्राप्त करण्यासाठी आपल्याला प्रथम शांत व एकचित्त होण्याचा प्रयत्न करायला हवा.

चिडचिडेपणा व रागाला काबूत ठेवल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीसाठी विनोदाची सामग्री जमवणे अथवा त्याचा व्यवस्थित वापर करणे अशक्य आहे. विनोदप्रियतेचा गुण आपल्यात विकसित करताना आपले वागणे एखाद्या धंदेवाईक विदूषकाप्रमाणे तर नाही ना! या गोष्टीचा आपण विचार करावा. अशा अवस्थेत आपल्या विनोदी गोष्टी उथळ, फालतू व अप्रिय होतात.

विनोदी गोष्टींच्या वापराने गंभीर विषयाची उपेक्षा करू नये. ज्याप्रकारे जेवणात सुगंध व स्निग्धता यावी म्हणून तसेच त्याला संतुलित व आरोग्यासाठी उपयुक्त बनविण्यासाठी तुपाचा वापर केला जातो, त्याचप्रकारे विनोदी गोष्टीचा वापरसुद्धा मर्यादा ठेवून व्हायला पाहिजे. विनोदाचा अति वापर केल्याने परिस्थिती आणखी बिघडू शकते, रंगाचा बेरंग होऊ शकतो, हेही लक्षात ठेवायला हवे.

श्रीकांत कुलांगे

मानसोपचार तज्ञ

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *