मनाची खिडकी

माझा नवरा नेहमी चिडचिड करतो आणि उगीचच कुणावरही रागावतो असं शकुंतला आपल्या मिस्टरचे गाऱ्हाणे सांगत होती. काल घडलेली घटना, हॉटेलमध्ये जेवायला गेलो आणि तो खूप वैतागलेला आणि चिंतेत दिसला. वेटर ने त्याची ऑर्डर लगेच घेतली नाही म्हणून तो चिडला. जेवण यायला खूप वेळ गेला म्हणून पण तो चिडला. त्याने खाण्याची तक्रार केली आणि बिल लगेच आले नाही म्हणूनही तो वैतागला. काय कारण असतील अशी विचारणा तिने मला केली.  

वास्तविक, बोलताना शकुंतला तशी एकदम सकारात्मक जाणवत होती परंतु तिचा नवरा मात्र एकदम नकारात्मक वृत्तीचा जाणवला. तुमची वृत्ती म्हणजे अशी मानसिक चाळण आहे ज्यातून तुम्ही जगाचा अनुभव घेता. काही लोक आशावादी (ग्लास अर्धे भरलेले आहे) तर काही लोक निराशावादी (ग्लास अर्धे रिकामे आहे) चाळणीतून जगाकडे बघतात. तिला या दोन्ही गोष्टीतला फरक समजाऊन सांगितला.

१. नकारात्मक वृत्ती असलेली व्यक्ती नेहमी विचार करते की, “मी करू शकत नाही.”

२. सकारात्मक वृत्ती असलेली व्यक्ती नेहमी विचार करते की, “मी करू शकते / शकतो.”

३. नकारात्मक वृत्ती असलेली व्यक्ती समस्यांमध्ये हरवून जाते.

४. सकारात्मक वृत्ती असलेली व्यक्ती समस्यांचे निराकरण करण्याकडे लक्ष केंद्रित करते.

५. नकारात्मक वृत्ती असलेल्या व्यक्तीला इतरांमध्ये दोष दिसतात.

६. सकारात्मक वृत्ती असलेल्या व्यक्तीला इतरांमध्ये चांगलेपणा दिसतो.

७. नकारात्मक वृत्ती असलेली व्यक्ती काय कमी आहे याकडे लक्ष देत असते.

८. सकारात्मक वृत्ती असलेली व्यक्ती ती किती भाग्यवान आहे याकडे लक्ष देत असते.

९. नकारात्मक वृत्ती असलेल्या व्यक्तीला मर्यादा दिसतात.

१०. सकारात्मक वृत्ती असलेल्या व्यक्तीला शक्यता दिसतात.

खूप काही उदाहरणे देता येतील. आपण नेहमी परिस्थिती नियंत्रणात आणू शकत नाही पण आपले स्वतःचे विचार नियंत्रणात ठेवू शकतो.

आपली वृत्ती म्हणजे जगाकडे बघण्याची आपली खिडकी असते. खिडकी म्हणजे नेमकं काय? आपण सगळे आपल्या आयुष्याची सुरुवात चांगल्या दृष्टिकोनाने किंवा असे म्हणायला हरकत नाही की, एका स्वच्छ मानसिक खिडकीने करतो. उदा. जेव्हा मूल अडखळून पडते, तेव्हा ते काय करते? ते चिडून जमिनीला दोष देत नाही. ते मूल चुकीच्या सूचना दिल्या म्हणून त्याच्या आईवडिलांकडे बोट दाखवत नाही. ते हार मानत नाही. ते हसते, पुन्हा उभे राहते, दुसऱ्यांदा प्रयत्न करते आणि पुन्हा प्रयत्न करत राहते. ते मूल सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जोवर नीट चालता येत नाही तोवर प्रयत्न करत राहते. त्याची खिडकी खूप स्वच्छ असते आणि त्याला असे वाटत असते की, ते जग जिंकू शकते.

मग अशी एक वेळ येते जेव्हा “आयुष्य” आपल्या खिडकीवर धूळ फेकायला लागते आणि मग खालील गोष्टी होतात :

१. आपल्या खिडक्यांवर आपले पालक आणि शिक्षकांच्या टिकांमुळे शिंतोडे उडतात.

२. आपल्या बरोबरीच्या लोकांमुळे आपल्या खिडक्यांवर डाग पडतात.

३. नकारांमुळे आपल्या खिडक्या खराब होतात.

४. निराशेमुळे आपल्या खिडक्या कळकट होतात.

५. आपल्या खिडक्या शंकांच्या ढगांमुळे आच्छादून जातात.

समस्या ही आहे की, धूळ वाढत जाते आणि बरेच लोक त्याविषयी काहीच करत नाहीत. ते त्यांची खिडकी मळकी ठेवून आयुष्य जगत राहतात. त्यांचा उत्साह मावळत जातो. ते निराश आणि उदास होतात. सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे ते त्यांच्या स्वप्नांचा त्याग करतात, कारण ते सगळे त्यांच्या वृत्तीची खिडकी स्वच्छ करू शकत नाहीत.

शकुंतलाच्या नवऱ्याची वृत्ती अशीच. त्याला फक्त खिडकी स्वच्छ करायची गरज होती! त्याला त्याचा दृष्टिकोन सुधारावा लागणार होता ज्यानेकरून तो जगाकडे पुन्हा स्पष्टपणे बघू शकेन. एकदा का ही खिडकी स्वच्छ केली की विफलता आणि नैराश्य नाहीसे होईल. त्याच्यातला आत्मविश्वास वाढेल.

वृत्ती म्हणजे जगाकडे बघण्याची तुमची खिडकी आहे या माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे. तुमच्या वृत्तीचा तुमच्या जगाकडे बघण्यावर कसा परिणाम होतो हे तुम्हाला समजले तरी खूप झाले. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे तुमची खिडकी कोणकोणत्या भागांमध्ये स्वच्छ करण्याची गरज आहे हे तुम्हाला शोधायची आहे. शोधा बरं मग!!

 

©श्रीकांत कुलांगे

मानसोपचार तज्ञ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *