विचारांची विसंगती आणि नातं

माझ्या मनात नेहमीच वाईट विचार येतात की माझ्या आयुष्याचं पुढे काय होणार? हा प्रश्न बऱ्याच जोडप्यांच्या मनात येतोय. काही जोडपी तर इतकी विक्षिप्त की मुलं होऊ देण्याचा विचार पुढे ढकलतात किंवा लग्नाची साधी नोंदणी सुध्दा करायला कचरतात. असं का होतं म्हणून बरीच जोडपी उत्तर माहीत असूनसुद्धा मला प्रश्न विचारत असतात. म्हणून काही ठळक मुद्दे त्यांच्याशी बोलताना आढळले. 

१. दोघांचीही वैचारिक नकारात्मकता.

२. आत्मविश्वास नसणं. (दोन्ही)

३. घरच्यांची संसारात लुडबूड.

४. एका हाताने टाळी वाजत नसते हे माहीत असूनही एकमेकांना सोयीस्कर कारणीभूत ठरवणं.

५. पूर्वग्रह, हेतू सह भांडणं करून आपले वर्चस्व दाखवण्याचा, ठेवण्याचा प्रयत्न.

६. दूषित मनोवृत्ती आणि मानसिकता.

७. लहानपणापासून घरातील असणारे वातावरण जे मुलांच्या मनात नेहमी विवाहाबाबत नकारार्थी भावना उत्पन्न करत असतात.

८. पूर्वायुष्यात घेतलेली औषधं, त्यांचा शरीरावर झालेला परिणाम.

९. दारू आणि ड्रग्स यांच्या अतिसेवनाने बोलण्यावर, वागण्यावर कंट्रोल नसणं.

१०. भांडणं म्हणजेच प्रेम, यावर अती विश्वास.

११. काहीही कारण नसताना भांडणं.

१२. अती आधुनिक किंवा जुन्या विचारांचा पगडा व अपेक्षा.

१३. शिक्षणाचा उपयोग संसारासाठी न करणं.

१४. लग्नाचा हेतू न समजणं.

१५. अध्यात्माचा वापर प्रत्येक्षात उपयोगात न आणणे. फक्त मंत्र उच्चारण, देव देव वरवर करून फायदा नसतो हे माहीत असूनही वापर न करणं.

१६. चुकीचे मित्र, नातेवाईकांचे सल्ले.

१७. सदसद्विवेकबुद्धी नसणे किंवा असूनही न वापरणे.

आपण आपल्या मनात जसा विचार करतो तसेच आपण असतो. हे वाक्य केवळ आपल्या समग्र अस्तित्वालाच लागू पडते असे नव्हे तर ते इतके सर्वसमावेशक आहे की ते आपल्या जीवनातील प्रत्येक परिस्थितीला आणि घटनेला लागू पडते. आपण अक्षरशः तेच असतो जसा आपण विचार करीत असतो. कारण आपले चारित्र्य हे आपल्या सगळ्या विचारांची गोळा बेरीज असते.

मी त्या जोडप्याना हेच सांगतो की, स्वर्गात बांधलेल्या गाठी जमिनीवर तुम्ही साकारत असतात. मग या गाठीबरोबर काहीतरी ओझं घेऊन येणं क्रमप्राप्त आहे. म्हणजे काय की, आपल्या पूर्व जन्माचे पाप किंवा पुण्य यांची परतफेड करण्यासाठी आपण भेटतो, एकत्र रहातो. त्यात जर कधी आपल्या विचारांची पद्धत चुकीची आली की प्रश्न वाढतात.

साध्या गोष्टी जर ध्यानात ठेवल्या तर रोजचे भांडणं आठवड्यावर येतील. पुढे प्रयत्न चालू ठेवल्यास महिन्यावर व नंतर कदाचित भांडणं होणारच नाहीत.

१. तारतम्य बाळगून बोलण्याचा प्रयत्न.

२. जोडप्यातील व्यक्ती आपलीच आहे असे मनाला वारंवार सांगणे.

३. जर आपण आपल्या जोडीदाराला साथ देत नसाल तर भौतिक जगातील सर्वात चांगली गोष्ट सुध्दा तुम्हाला क्षणिक गोड वाटेल.

४. आरोप प्रत्यारोप कामाचे नाहीत.

५. असलेले वाद लिहून काढून त्यावर कुठले कंट्रोल आपण ठेऊं शकतो यावर विचार विनिमय.( जास्त भांडणं करणाऱ्यांनी मोठी वही ठेवावी.)

६. चुकलं तर माफ करा, माफी मागा.

७. भांडणं आपले विचार बदलत असतात, त्याचा फायदा इतर घेतात, आयुष्यात स्थिरता येत नाही.

८. अशा परिस्थितीत मुलं झाली तर त्यांच्या बालमनावर परिणाम होतो.

९. घरातील ज्येष्ठांना विनाकारण मानसिक त्रास, छळाला सामोरे जावे लागते.

१०. अध्यात्माचा वापर शिक्षणाबरोबरच घरात आमलात आणाच.

११. वेळोवेळी समुपदेशन घेतल्याने फरक नक्कीच पडतो. मानसिकता सकारात्मक ठेवायला संधी उपलब्ध होते.

१२. इगो फेकून दिल्यास भांडणं होत नाही.

१३. शारीरिक व्याधी असल्यास डॉक्टर आहेत.

१४. रोज किंवा नेहमीच्या भांडणाचे चिंतेत वाढ होऊन आपले चेहरे व तबीयत बिघडते, रोग मागे लागतात.म्हणून शक्यतो भांडण होणार नाही याची जबाबदारी घ्याच.

१५. यामुळे जॉब वर लक्ष लागत नाही. काहींना जॉब मिळत नाही. म्हणून मनापासून शांत आणि खुश राहणं आवश्यक.

१६. जोडीदार आणि स्वतः वर प्रेम करा, करणं यावर तुमचं भवितव्य अवलंबून असते.

१७. आई वडिलांचा मान राखणं दोघांच्या हातात. म्हणून असलेले दूषित ग्रह आजच साफ करा. मनाला ठणकावून सांगा की आज मस्त जगायचं.

कळत-नकळत, अजाणता या परिस्थितीला स्वतःच कारणीभूत असतो. परिस्थिती किंवा घटना या इतक्या गुंतागुंतीच्या असतात, विचार इतके खोलवर रुजलेले असतात आणि प्रत्येक व्यक्तीची सुखाची, आनंदाची व्याख्या व कल्पना इतक्या वेगवेगळ्या असतात की आपली संपूर्ण आत्मिकस्थिती जरी आपल्याला माहीत असली तरी आपल्या आयुष्यातील केवळ बाह्य घटकांवरून त्यांचे योग्य मुल्यांकन इतर कोणालाही करता येत नाही.

चांगले विचार आणि कृती यांचे परीणाम कधीच वाईट येऊ शकत नाहीत तर वाईट विचार आणि कृती कधीच चांगले परीणाम आणू शकत नाहीत. बघा, अंतकरणात झाका, वाईट विचारांना तिलांजली द्या, अन्यथा निसर्ग शिक्षा देतोच याचा अनुभव घ्यायची तयारी ठेवा.

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *