मानसिक आघात आणि आपण

आघात मानसिक आरोग्यावर कसा परिणाम करू शकतो याबाबत चर्चेसाठी संगीता तिच्या पतीसोबत आली होती. दैनंदिन जीवनातील आघात तिला आता सहन होत नव्हते म्हणून त्यासाठी तिने एकत्रित कुटुंबापासून वेगळे राहावे का किंवा याबरोबरच कसे जगता येईल अशी विचारणा केली. आघातजन्य अनुभवांमुळे विविध प्रकारच्या शारीरिक, मानसिक, नातेसंबंधात्मक, अध्यात्मिक आणि सामाजिक परिणाम होतात. काही सामान्यपणे त्यांना तोंड देतात तर काही कोलमडून जातात. अशा व्यक्तींमध्ये अनेक व्याधी दिसतात किंवा नकारात्मक परिणाम दिसतात. 

 

१. चिडचिड, झोपेची कमी.

२. आत्महत्त्या करावीशी वाटते.

३. जोडीदार, कुटुंबातील इतर व्यक्तीं बरोबर अबोला धरणे.

४. अगदी जवळपास होणाऱ्या भांडणाने सुद्धा त्रास होणे. अलिप्त राहण्याचा प्रयत्न होतो.

५. ताणतणाव यामध्ये वाढ होणे. चिंतांमध्ये वाढ होऊन व्यक्ती व्यसनाधीन होतात.

६. एकत्रित आलेल्या आघातामुळे अनेक व्यक्ती घाबरून जातात, सामाजिक ऐक्य कोलमडते.

७. कौटुंबिक हिंसाचार वाढीस लागतो.

८. एखादी व्यक्ती तणावग्रस्त असेल तर सभोवतालच्या इतर व्यक्ती प्रभावित होतात. त्यातून चिंतारोग जडण्याची भीती.

९. नित्य नियमाने करायची कामे करायला उत्साह नाहीसा होतो. उदासीनता.

१०. मानसिक आजार. आहार व आरोग्य ताळमेळ राहत नाही.

अर्थात ठराविक अवधी नंतर या भावना नाहीशा होतात किंवा पुन्हा पुन्हा घडू शकतात. अशा घटना घडण्यासाठी असे कुठले आघात रोज होतात.

१. कोव्हिड संबंधी माहिती, रोज मृत्यू पावणाऱ्या घटना.

२. आर्थिक अडचणींवर प्रयत्न करूनही येणारा ताण.

३. कौटुंबिक कलह.

४. सभोवतालचे आवाज, गोंगाट, परिस्थिती.

५. भूतकाळातील घडलेल्या न विसरण्यासारख्या आठवणी ज्या पुन्हा पुन्हा जाग्या होणे.

६. ऐकीव बातम्या, सोशल मीडियाद्वारे मिळणारी नकारात्मक माहिती.

७. मित्रांकडून, कामावर असताना होणारी हेटाळणी.

८. रोज ऐकावी लागणारी टोमणे, होणारी शारीरिक इजा.

९. युद्धकैदी.

१०. सामूहिक हिंसाचारात होणारी हानी.

११. व्यसनातून आलेली अधोगती व त्यापासून होणारा कलह, मन:स्थाप.

एक ना अनेक रोज होणारे आघात पचवणे सोपे नसते. यातून मार्गस्थ झाले पाहिजे म्हणून प्रत्येकजण आपल्या हिशोबाने मार्ग काढतो. होणाऱ्या आघाताने काही सकारात्मक गोष्टी घडतात जशा की.

१. अत्यंत क्लेशकारक अनुभवाने काही व्यक्तीमध्ये आत्म-सन्मान निर्माण होतो. अधिक सकारात्मक नातेसंबंध होतात. एकमेकांची काळजी घ्यायला लागतो.

२. अनेक लोक एकत्र येऊन मुकाबला करतात, सामुहिक जबाबदारी पार पाडतात.

३. सम विचारी व्यक्ती यावर तोडगा काढण्यासाठी पुढे येतात, यातून मानसिक, आर्थिक, शारीरिक त्रास कमी होण्यास मदत होते.

नैसर्गिक आघात वेगळे आणि आपण कळत नकळत तयार करणारे वेगळे. एकवेळ नैसर्गिक आघात आपल्या हाताबाहेर, आटोक्यात न येणारे असतात पण आपण केलेले आघात हे आपल्याच हातात असतात असे सांगून संगीता आणि तिच्या पतीला याबाबत कसे हाताळावे यासाठी चर्चा केली.

१. कुटुंबातून वेगळे राहणे हा शेवटचा पर्याय. अपरिहार्य असेल तर वेगळे झालेलं बरं.

२. मेंदूला झालेल्या भूतकाळातील जखमा भरून काढण्यासाठी मानसोपचार सुरू करणे. थोडेफार औषधं, थेरपी आपल्याला मानसिक स्वास्थ्य देऊ शकते.

३. व्यस्त राहण्याचा प्रयत्न. संगीत ऐकणे, छंद असतील तर छान.

४. घरातील ज्येष्ठांना आपण नाही बदलू शकत याची जाणीव. कारण त्यांना त्यांचा स्वाभिमान जगायचा असतो. म्हणून योग्य प्रकारे हाताळता येईल.

५. एकमेकांना मदत करून, भूतकाळ विसरून वर्तमानकाळ जगण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न.

६. सामाजिक ऐक्य निर्माण होणे आवश्यक. त्यासाठी सर्वांगीण विचार मंथन आपणच करायचे आणि पाळायचे. कारण माझ्यापासून समाज सुरू होत असतो.

 

प्रत्येक व्यक्ती आपल्या हातात आहे ते करून रोजच्या होणाऱ्या आघाताला तोंड नक्कीच देऊ शकतो. त्यासाठी प्रयत्न करून योग्य तो मार्ग नक्कीच निघेल. पण म्हणून टोकाची भूमिका न घेता मानसिक स्वास्थ्य सुदृढ करून आपले आयुष्य छान जगता येईल.

 

©श्रीकांत कुलांगे

9890420209

 

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *