मानवी जीवनाचा संघर्ष

चेतना (Consciousness ) ही मानवाच्या मनामध्ये चिंतनाच्या रूपात वास करीत असते. चेतना उत्साहाने परिपक्व असली की, मन खंबीर बनते. अशक्य गोष्टी शक्य होतात. आकाशाला गवसणी घालण्याची वृत्ती निर्माण होते. मन खिन्न, उदास झाले की, साध्या-सोप्या गोष्टी महाकठीण वाटू लागतात.
मानवी जीवनात संघर्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संघर्ष जर अपरिहार्य आहे तर त्याचा सामना प्रसन्न, दृढ मनाने, नियोजनबद्ध संकल्पनेने करता येतो. काळाबरोबर सतत पुढे जाणे प्रसन्न मानसिकतेच्या जीवनाचे सार आहे. जीवनाच्या प्रत्येक वळणावर अडथळे आणि प्रयत्न यांचा समन्वय साधत न थांबता जो पुढे जातो तोच यशोशिखर गाठू शकतो. कित्येक जणांना संघर्ष हा नकारात्मक दिसतो तर काही त्याला तोंड देतात. संघर्ष जो आपली प्रगती करतो, सुधारणा घडवतो, जो आपल्या आयुष्याला योग्य दिशा देतो तो सकारात्मक. ज्यांना संघर्ष हा नकारात्मक वाटतो व तो सकारात्मक बनवायचा असेल तर ते आपल्या हातात आहे का हे पाहणे गरजेचे ठरते. त्यासाठी काही सेल्फ चेक करायची झाल्यास;

• माझ्यात चांगल्या गोष्टी कुठल्या आहेत त्याची जाण असणे (सामर्थ्य).
• मनाची प्रगल्भता.
• चुकलेल्या गोष्टींचे मूल्यमापन करण्याची शक्ती.
• देहबोली – बोलणं, चालणं, संभाषण कला, चातुर्य व हास्य – यामध्ये आपण कुठे आहोत.
• आत्मविश्वास (फाजील नको).
• शारीरिक क्षमता.
• एकाच वेळी अनेक काम करण्याची ताकद.

अशा अनेक पैलूंची माहिती घेऊन आपल्यामध्ये बदल घडवणे सहज शक्य असते. त्याकरिता आपल्या मनाची तयारी आणि शरीराची साथ असेल तर संघर्षाला तोंड देणे सहज शक्य होते. दृढ संकल्प करून मनाने सदैव उत्साही असणाऱ्या व्यक्तींनी अनेक महाकठीण कार्ये सहज सत्यात उतरवून दाखविलेली आहेत. स्वकर्तृत्वाचे वैभवशाली इतिहास निर्माण केलेले आहेत. आजच्या घटकेला जगभरातील लॉक डाऊन परिस्थिती मध्ये जीवावर उदार होऊन प्रत्येक संघर्षाशी तोंड देणारे COVID योद्धे असोत किंवा अफाट अशा मोघली सत्तेला आव्हान देत औरंगजेबाला जेरीस आणणारे, स्वराज्य साकारणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे उदाहरण म्हणजे ‘प्रसन्न मनाच्या कर्तृत्वाचे उत्तम नमुने’ होत.

‘यश-अपयश’ जीवन जगण्याच्या प्रक्रियेतील एक स्वाभाविक गोष्ट. जगात एकही व्यक्ती अशी नाही की, तिने अपयशाची चव चाखलेली नाही. आपली क्षमता, सकारात्मक ऊर्जा यांचा ताळमेळ साधत प्रयत्नांची पराकाष्ठा करीत व्यक्ती अपयशातून यशाकडे जाते. स्वतःबरोबर समाजाचे कल्याण साधते. संघर्षाशिवाय आयुष्य म्हणजे बेचव जीवन आहे असे उगीचच जुनी लोक म्हणत नाहीत. त्यामुळेच,
‘रूक जाना नहीं, तू कहीं हार के
काँटो पे चल के मिलेंगे साये बहार के
ओ राही ओ राही। ओ राही ओ राही।

श्रीकांत कुलांगे
9890420209

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *