तणावाचा ताण

गेले दोन दिवस समुद्रकिनारी बसून बऱ्याच व्यक्तींबरोबर गप्पा होत आहेत. कोविड जरी कमी होत असला तरी मनावरचा ताण कमी होत नाही आणि बरेच बदल शरीरात जाणवतात असा एकंदर सुर सर्वांचा होता. याच बरोबर दुसरा मुद्दा पण चर्चेत होता तो म्हणजे अस्तित्वाला धोका जो सर्वात जास्त तणाव निर्माण करतोय.

आपल्या सारखा आधुनिक मानव हा स्वतःच्या अस्तित्वाला किंवा मीपणाला धोका उत्पन्न झाला की, खांदे उडवितो किंवा ताठरतो आणि बऱ्याचदा ही तणावप्रक्रियेची लक्षणं दाबून टाकण्याचा प्रयत्न करतो; कारण हा धोका काही शारीरिक इजा पोहोचविणारा आणि म्हणून शारीरिकरीत्या ‘लढा किंवा पळा’ची तात्काळ मागणी करणारा नसतो. बॉस, बजेट, प्रेक्षक, इंटरव्ह्यू, परीक्षा, पैसा, वादविवाद या काही खरं तर जिवीताला धोका निर्माण करणाऱ्या गोष्टी नाहीत; पण तरीही आपल्या मीपणाला आणि म्हणून अस्तित्वाला धोका वाटून तणाव प्रतिक्रिया घडते आणि ती जर सतत घडत राहिली तर कालांतराने त्याचे शारीरिक परिणाम दिसू लागतात.

१. मधुमेह-डायबेटीस.
२. दमा- (श्वसनक्रिया वेगानं होऊ लागते.)
३. हृदयविकार (हृदयाचं काम वाढतं) व हृदयविकाराचा अचानक झटका येऊन अल्पवयीन मृत्यूचं प्रमाण हल्ली खूप वाढलं आहे.
४. हृदयविकाराचा किंवा पक्षाघाताचा झटका-रक्तस्राव चटकन थांबावा म्हणून् रक्ताची गुठळी बनविणारी द्रव्ये वाढतात, अशी गुठळी हृदयाच्या किंवा मेंदूच्या रक्तवाहिनीत अडकू शकते.
५. अतिरक्तदाब-हायपरटेन्शन (तणावप्रतिक्रियेत रक्तदाब वाढतो)
६. मायग्रेन-अर्धशिशी, पाळीच्या आधी पाय वळणे व इतर व्याधी.
७. सांधे, त्वचा या कमी महत्त्वाच्या अवयवांचा रक्तपुरवठा कमी होतो. मध्यम वयातच गुडघेदुखी.
८. त्वचारोग- सोरिअ‍ॅसिस, अटोपिक डर्मटायटीस, केस गळणे व पिकणे.
९. पचनसंस्था-वरचेवर तोंड येणे, अ‍ॅसिडिटी, जळजळ, अपचन, गॅस, अल्सरेटिव्ह कोलायटीस, अतिसार, मलावरोध, पेप्टिक अल्सर, उलटी होणे.
१०. शरीराची वाढ – दुरुस्ती थांबते, प्रतिकारशक्ती कमी होते. लहान मुलांची वाढ खुरटते.
११. टॉन्सिल्स सुजणे, जखम किंवा कोणताही आजार बरा होण्यास वेळ लागतो.
१२. अकाली वार्धक्य.
१३. निद्रानाश (मेंदूचा रक्तपुरवठा वाढतो.)
१४. लैंगिक इच्छा कमी होणे.

अर्थातच शरीर – मन यावरील ताण कमी झाला तरच हे आजार बरे होऊ शकतात. चिडचिड, अस्वस्थ झोप, औदासीन्य, वैफल्य, कंटाळा, असमाधान, वैताग, खिन्नता, कामांच्या बाबतीत चालढकल किंवा दिरंगाई करण्याची प्रवृत्ती, अस्वस्थता, व्यसनाधीनता, इतकंच काय; पण आत्महत्येची प्रवृत्ती ही मानसिक लक्षणंही तणावग्रस्ततेमुळं निर्माण होतात.
म्हणून ताबडतोब तणावमुक्तीची मोहीम आखा. कित्येकदा वडीलधारी मंडळी हेच सांगायची की आत्मविश्वास आणि देवावर भरोसा हेच शेवटी आपल्याला तारते. तरीही अनेक गोष्टींची मदत होऊ शकते.

१. मन प्रसन्न ठेवा. इतकं खंबीर ठेवा की धोका असला तरीही शरीरात तणावप्रतिक्रिया घडणार नाही.
२. यासाठी पुष्पौषधी व इतर चिकित्सा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, समुपदेशन (काउन्सिलिंग).
३. मनाला बळकटी आणणारे मानसिक व्यायाम, विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती.
४. स्वत:/इतर व्यक्ती/ परिस्थिती यांच्याकडे पाहण्याचा विवेकनिष्ठ दृष्टिकोन, ज्यामुळे तणावप्रतिक्रिया टळू शकेल.
५. पालकांची पाल्यांकडून असलेली अपेक्षा कमी करणं आणि आहे त्या परिस्थितीला सामोरं जाणं.
६. इतरांशी तुलना न केलेली बरी.

एकविसाव्या शतकातील कोविढपेक्षाही महाभयानक भस्मासुर कोणता? तर ताणतणाव-टेन्शन! ज्यामुळे अनेक लोक फक्त रोगग्रस्तच नव्हे तर अकालीच मृत्युमुखीही पडत आहेत. मुलांची JEE आणि नीट करता करता नाकी नऊ आलेत. परीक्षा महत्वाच्या परंतु सहज भावनेतून दिल्या तर नक्कीच फायदा होईल परंतु आपल्याकडे हस्तक्षेप नावाचा प्रकार आहे जो नेहमी एकमेकांना टोचत राहतो. हे थांबवायला हवं, तरच तणाव व्यवस्थापन नीट होऊ शकेल. संपूर्ण तणाव मुक्ती शक्य नाही झाली तरी त्यावर आपला अंकुश हवा.

©श्रीकांत कुलांगे
(बिंतान बेट, इंडोनेशिया)
9890420209

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *