आत्महत्या प्रवृत्ती

शाळेतील एका डॉक्टर मित्राने आत्महत्या केली आणि मग चर्चेला उधाण आले की असं का होतं. दररोज कुणी ना कुणीतरी शेजारी, गावात, शहरात आत्महत्या करतय. हसतमुख माणूस अचानक आत्महत्या करून जातो अशी अनेक उदाहरणे आहेत. एखाद्या मित्राला, कुटुंबातील सदस्याला किंवा सेलिब्रिटीला आत्महत्या करण्यास कशामुळे प्रवृत्त केले गेले याची कल्पना करणे कठीण असते. अनेकदा कोणतीही स्पष्ट चेतावणी किंवा चिन्हे दिसत नाहीत. बऱ्याचवेळा अनेक घटक एकत्रितपणे एखाद्या व्यक्तीला स्वतःचा जीव घेण्याच्या निर्णयाकडे नेतात असं संशोधनात दिसून आले आहे.
१. मानसिक आजार: बहुसंख्य लोक आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा निर्णय मोठ्या प्रमाणावर नियोजन करण्याऐवजी आवेगाने घेतात.
२. सर्वात सामान्य घातक म्हणजे तीव्र नैराश्य (डिप्रेशन). सर्व आत्महत्यांपैकी निम्म्या घटनांमध्ये नैराश्य हे कारण असते.
३. इतर मानसिक आजार जे आत्महत्येचा धोका वाढवू शकतात: जसे की, बायपोलार डिसऑर्डर, बॉर्डरलाइन पर्सनॅलिटी डिसऑर्डर (बीपीडी), खाण्याचे विकार, स्किझोफ्रेनिया.
४. अत्यंत क्लेशकारक ताण. आघातानंतर असलेल्या व्यक्तीनंमध्ये नैराश्य सामान्य राहते, ज्यामुळे असहायता आणि निराशेची भावना उद्भवते व आत्महत्या करण्यास प्रवृत्त होऊ शकतात.
५. ड्रग्ज आणि अल्कोहोल, आत्महत्येची भावना असलेल्या व्यक्तीवर प्रभाव टाकू शकतात.
६. नुकसान किंवा नुकसानाची भीती.
७. शैक्षणिक अपयश.
८. अटक किंवा तुरुंगात टाकले असेल तर अपमान वाटून आत्महत्या.
९. आर्थिक अडचणी.
१०. घनिष्ठ मैत्री किंवा रोमँटिक नातेसंबंधाचा अंत.
११. नोकरीची हानी.
१२. कुटुंबातील मान सन्मान गमावणे.
१३. सामाजिक मानहानी.
१४. एखाद्या व्यक्‍तीला दीर्घकाळचे दुखणे किंवा आजार असल्यास बरा होण्याची आशा नाही किंवा दुःखापासून मुक्ती मिळत नाही, तर आत्महत्येला मार्ग सोपा वाटतो.
१५. समाजातून बहिष्कार.
१६. अपघाती आत्महत्या.
१७. दांपत्य मधील पराकोटीचा कलह.
१८. प्रेशर (ताण) सहन न झाल्यास किंवा न पेलवल्यास.
एखाद्या व्यक्तीने आत्महत्या का केली हे तुम्हाला कधीच कळणार नाही. समाजात आपल्याला जगण्यासाठी सर्व काही आहे असे असले तरी, कदाचित काहींना तसे वाटत नाही. एका क्षणात आत्महत्येचा ट्रिगर तयार झाला की त्या वेळी असेल तो पर्याय वापरून व्यक्ती स्वतःला संपवतो.
मग अशा आत्मघातकी विचारांना थांबवायचे कसे? नैराश्य हा एक उपचार करण्यायोग्य आजार आहे आणि असे अनेक पर्याय आहेत जे तुम्हाला मदत करू शकतात. ज्या व्यक्तींच्या मनात आत्महत्येचे विचार येतात त्यांनी खालील पैकी काही गोष्टी जरूर कराव्यात.
१. हेल्पलाइन वर कॉल करणे. (उदा.022-25521111, 9152987821) भारतात अनेक सेवाभावी संस्था आत्महत्येचा विचार करणाऱ्या लोकांना मदत करतात.
२. घरातील ज्या गोष्टींचा वापर आत्मघातकी कारणांसाठी होऊ शकतो, त्यांना घरा बाहेर काढणे.
३. प्रोफेशनल कौन्सेलरशी बोला. जवळपास असणाऱ्या सायकॉलॉजीस्ट बरोबर संपर्क साधणं.
४. डॉक्टरांच्या सल्ल्याने यावर उपचार होऊ शकतो. काही औषधे त्यावर उपाय म्हणून आहेत.
५. डिप्रेशन मधील व्यक्ती मादक पदार्थांचा वापर करू शकतो. अशा वेळेस मादक पदार्थ सेवन हळूहळू कमी करून तणाव कमी करण्याचा प्रयत्न करता येतो.
६. इच्छाशक्तीला ॲक्टिवेट करणे.
७. रागावर नियंत्रण करणारे अनेक थेरेपी उपयोगी ठरतात. योगा, मेडिटेशन, औषध, ग्रुप थेरपी कामी येते.
८. तुमचे नैराश्य तुमच्या जीवनातील एखाद्या परिस्थितीशी संबंधित असल्यास, समस्या सोडवण्यासाठी थोडा वेळ घालवणे उपयुक्त ठरू शकते.
९. तुमच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींची स्वतःला आठवण करून द्या.
१०. योग्य व्यक्तींबरोबर स्वतःच्या विचारांना व्यक्त करा. त्यामुळे डिप्रेशन कमी होऊ शकतं.
११. तुमच्या आत्मघातकी भावना कमी होण्यास वेळ लागू शकतो. म्हणून त्या विचारांना मनात न येऊ देण्यासाठी मनाला विचलित करायची सवय लावणे.
१२. इतर उपचार पर्यायांचा विचार करणं. आज आत्मघातकी विचारांना दूर ठेवण्यासाठी अनेक ट्रीटमेंट डॉक्टर देऊ शकतात.
१३. कौटुंबिक कलह वेळीच थांबवा. जास्त खतपाणी न घालता कौन्सेलर ला भेटा.
१४. विद्यार्थ्यांचा कल कुठे आहे ते चेक करून शिक्षण कुठले घ्यायचे ते ठरवा.
तुम्हाला गंभीर नैराश्य असल्यास, तुमच्या सपोर्ट नेटवर्कच्या मदतीने सुरक्षितता योजना तयार करणे हे जीवन वाचवणारी योजना असू शकते. आपली सुरक्षा योजना आपल्याला आपले नैराश्य सर्वात वाईट स्थितीत असताना आणि आत्महत्येचे विचार येत असताना त्याचा सामना करण्यासाठी ठोस पावले उचलण्यात नक्कीच मदत करू शकते.
आयुष्यातील गोड कडू अनुभवांना प्रत्येकाला सामोरं जावं लागतं आणि अप्रिय, सहनशीलतेचा अंत पाहणाऱ्या अनेक घटना रोज घडत असतात. काही प्रश्न कधीच न सुटणारे असतात. प्रत्येकानं काळाची पावलं ओळखून धोरणीपणा ठेवला तर कदाचित तुम्ही आत्महत्येचा विचार करणार नाहीत. भारतामध्ये अजूनही आत्महत्येचा विचार करणाऱ्यांना हवी तशी मदत मिळत नाही किंबहुना कित्येकांना ही मदत कुठे मिळते ते ही माहित नाही. अनेकजण अशी इच्छा बोलून दाखवत नाहीत. म्हणून बोलके व्हा. आपली प्रत्येक इच्छा या जन्मात पूर्ण होईल याची गॅरंटी नसते म्हणून निराशेचा रस्ता न धरता जीवनाकडे योग्य नजरेने पाहा.

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *