जबाबदारी – पालक आणि मुलं

मुलं घरात अजिबात जबाबदारी घेत नाहीत, ऐकत नाहीत म्हणून विभा नावाच्या आईचा फोन होता. समुपदेशन करताना त्याबाबत खूप काही गोष्टी बोलाव्या आणि ऐकाव्या लागल्या.  

आपण यशस्वी पालक होण्यासाठी व आपली मुलं जीवनात कर्तृत्ववान होण्यासाठी मुलांना जबाबदारीची जाणीव देणं आवश्यक आहे. मुलं आपलीही काळजी घेतात हे आईबाबांना मिळणारं भावनिक सौख्य खरोखरच अमूल्य असतं. आपल्याला याबाबतीत काय करता येईल किंवा काय करावं असं वाटतं यावर उहापोह केला. ठराविक गोष्टी नक्कीच आपण करू शकतो.

१. मुलांना धमक्या देऊ नये.

२. मुलाला असाहाय्य वाटू देऊ नये.

३. क्षुल्लक चुकांबद्दल मुलांना दोषी ठरवू नका.

४. मुलामुलींची कामं वेगवेगळी नकोत.

५. मुलांची एकमेकांशी तुलना करू नका.

६. जबाबदारी शिकविणं म्हणजे जबरदस्ती करणं नव्हे.

७. कुत्सित बोलणं, अनावश्यक शिक्षा, भीती घालणं, धमकी देणं, टीका करणं, धाकदपटशा दाखविणं इत्यादी गोष्टी टाळा.

८. मुलांना अतिसंरक्षित वागवू नका.

९. अतिअपेक्षा, महत्त्वाकांक्षा, अतिजागरूकता टाळा.

कोणतंही काम किंवा अभ्यास करताना मुलाला स्वतःला ते करू द्या. आपली मदत व मार्गदर्शन जरूर तिथंच द्या. एखादं काम जमलं नाही किंवा करायला वेळ लागला तरी तुम्ही निराश होऊ नका. मुलांना निराश होऊ देऊ नका. प्रत्येक बाबतीत मुलांची प्रतिक्रिया लक्षात घ्या. मुलं काय म्हणतात ते शांतपणानं ऐकून घ्या. आपल्या शांत राहण्यातून, क्रियाशील श्रवणातून, सहानुभूतीपूर्ण मदतीतून मुलाला नेटके काम करण्याची शक्ती आणि सुरक्षितता मिळत असते. त्यातूनच त्याचं व्यक्तिमत्त्व विकसित होतं.

मुलांना कुटुंबाचे जबाबदार घटक कसं बनवाल?

१. दैनंदिन कामं करताना मुलांना त्यात सहभागी करून घ्या. अर्थात मुलांची बौद्धिक, मानसिक, शारीरिक क्षमता यांचा विचार करून मुलांना कामं सांगा,

२. मुलांची स्वतःची दैनंदिन कामं त्यांची त्यांनाच हळूहळू करायला शिकवा.

३. छोटे छोटे निर्णय घेण्याची जबाबदारी मुलांवर टाका. आवश्यक तिथं मदत करा.

४. मुलांना समजेल अशा भाषेत त्यांच्याशी चर्चा करा. त्यांना काम समजावून द्या. मुलांना ते काम सोपं कसं वाटेल याबद्दल आवर्जून विचार करा. त्यांच्या अडचणी दूर करा.

५. मुलांवर एखाद्या कामाची/निर्णय घेण्याची जबाबदारी टाकताना व त्याबद्दल चर्चा करताना मुलांना बोलते करा. त्यांची मतं-अडचणी-भावना समजून घ्या.

६. तुमच्या वागणुकीचा आदर्श मुलांसमोर असतो. जे गुण मुलांमध्ये असावेसे वाटतात ते स्वतःमध्ये आणा, म्हणजे मुलांमध्ये आणणं सोपं जाईल.

७. कौतुक/प्रोत्साहन याचा आश्चर्यकारक उपयोग होतो.

८. एखादं काम का व कसं करायचं, त्याचे फायदे कोणते हे सोप्या शब्दात मुलांना समजावून द्या. म्हणजे फक्त ‘सांगकामेपणा’ न होता मुलांचं सामान्यज्ञान वाढीस लागेल. विचारशक्ती जोपासली जाईल.

९. मुलांना कामं शिकवताना ‘Divide and Conquer’ हे तत्त्व लक्षात ठेवा. एखादं मोठं कामही मुलं या तत्त्वामुळं पार पाडू शकतात. प्रत्येक कामाचे छोटे छोटे भाग करा व त्यातील एक भाग/कृती एकावेळी मुलांना करायला शिकवा.

गोष्टी, चित्रपट, टी.व्ही., मासिकं, साप्ताहिकं, आजूबाजूची मुलं, मित्रमंडळी यातल्या उदाहरणांतून मुलांना जबाबदारीची जाणीव द्या. मुलं अनुकरणप्रिय असतात. असं करण्यामुळं मुलं अनेक गोष्टी शिकतात. अर्थात मनात न्यूनगंड निर्माण होईल एवढी तुलना आणि इतरांचंच कौतुक टाळा.

खरंच! आपण आपल्या मुलांशी मोकळेपणानं, आदरानं बोललो, मुलांनाही मोकळेपणानं बोलू दिलं, ते आस्थेनं ऐकून घेतलं तर आपल्या घराइतके सुखी घर शोधूनही सापडणार नाही!

( टीप: वरील सांगितलेल्या गोष्टी तत्वज्ञान किंवा उपदेश नसून समुपदेशन करताना झालेल्या संवादातून बाहेर आलेली तथ्य आहेत. अनुभव, निरीक्षण, अभ्यास, आणि तज्ज्ञांनी केलेली संशोधन यावर बऱ्याच गोष्टी लक्षात येतात.)

©श्रीकांत कुलांगे

9890420209

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *