नातं स्त्री पुरुषाचं!

‘पुरुषाची बरोबरी करण्याच्या नादात पुरुषी दृष्टिकोन किंवा केवळ पुरुषी विचार स्त्री स्वीकारणार नाही, एवढी जबाबदारी समस्त स्त्रीजातीनं घ्यावयास हवी.’ असे किरण बेदी एकदा म्हणाल्या होत्या. मग स्त्रीची भूमिका कोणती असा प्रश्न नीती अनीती च्या गर्तेत स्त्री पुरुष हरवून जातात का ते पाहायला हवे. अनेक जोडपी विवाहबद्ध होऊन किंवा नात्यात राहून एकमेकांच्या भूमिकेला तडा देतात.

नीती-अनीती मनोधारणेत असते, कृतीत नव्हे; आणि घडलेल्या अनेक घटनांची अशी अनावश्यक ओझी आपण तिथल्या तिथं न सोडता, मनावर वागवत राहून स्वत:ला त्रास तर करून घेत नाही ना, हेही पाहायलाच हवं. अशी ओझी घेऊन दमलेल्या, थकलेल्या अवस्थेत आपण कोणतीही चांगली भूमिका पार पाडू शकणार नाही. म्हणूनच स्वत: आनंदी राहायला हवं. सुखी असायची सवय स्वत:ला लावून घेतली की, त्या बाबतीत मग श्रीमंती येईल. अशी व्यक्तीच दुसऱ्याला सुख देऊ शकेल. मग कुठल्याही भूमिकेला न्याय मिळेल.

म्हणूनच नवऱ्याच्याही फिरून प्रेमात पडावं. त्याच्याशीही मैत्री करायला हवी. मुलांचीही मैत्रीण बनायला हवी. ‘लेक लाडकी या घरची, होणार सून मी त्या घरची’ म्हणणारी एखादी तरुणी कल्पना करते, स्वप्न रचते आपल्या सुरेख संसाराचं. मग संसार गळ्यात पडतो, तेव्हा तो हार न वाटता लोढणं का वाटावं? ते मजेत घालून फिरावं, चटके बसणारच, त्याचा स्वीकार हवा. आपल्याला हे सगळं हवंच असतं ना? इथं स्त्री ही परिपक्व (मॅच्युअर) मनाची गृहीत धरलीय. त्यात हट्टी लहान मूल कमी असावं. तिनं आपल्या वेगवेगळ्या रूपांची, भूमिकांची ओळख करून घ्यावी, स्वत:ला समजून घ्यावं. माझ्या मनावरील कर्तव्य/जबाबदाऱ्या, नातेसंबंध जपण्याचा ताण या चिंतनामुळं हलका झाला. एक स्त्री म्हणून मी स्वत:चा शोध घेतला. त्यामुळं स्त्रीचीच विविध रूपं आणि भूमिका यांचा प्रामुख्यानं विचार झाला; पण याच नाण्याची दुसरी बाजू : ‘पुरुष.’ पुरुषांनीही प्रथम माणूस म्हणून स्वत:चा व इतर स्त्री-पुरुषांचा विचार करावा आणि कांता, माता, स्नेहांकिता या रूपांप्रमाणेच पती/प्रियकर, पिता आणि मित्र या भूमिका जबाबदारीनं निभावून न्याव्यात, प्रदर्शित कराव्यात, पत्नीचा कधी पिता, कधी मित्र आणि कधी प्रियकरही बनावं.

व. पु. काळे लिहितात,

“ तू पतीच्या घरी तर निघालीस! होय, जायलाच हवं! ‘पिता आणि पती’ एक रेघ आणि वेलांटी इकडची तिकडं. तरीही वाटतं, ‘पती होणाऱ्या प्रत्येक पुरुषाला पिता होणं जमेल का?’ “

कन्यादान करताना प्रत्येक पिता मूक का होत असावा? कदाचित तो जावयाला सांगू शकत नसेल की,

“ ‘बाबा रे, माझ्या मुलीचा तू पतीच आहेस, तरीही संसारात तिचा पित्यासारखा सांभाळ करशील का?”

प्रत्येक पुरुषानं हे वाचावं आणि थोडं स्वत:मध्ये आत, मनाच्या गाभाऱ्यात डोकावून पाहून स्वत:ला विचारावं : ‘पती-प्रियकर, पिता आणि मित्रही होणं मला जमतंय का? कधी कोण व्हायचं, हे समजतंय का?’ प्रोफेसर, वैमानिक, डॉक्टर, इंजिनिअर. असं काहीही स्त्री जरूर असू शकते. माणूस म्हणून! यात नवल काही नाही. बुद्धिमत्ता, कला याबाबतींतील सामर्थ्य/ कौशल्य देताना निसर्गानं माणूस म्हणून स्त्री/ पुरुष दोघांत फरक केलेला नाही. आपणही तो करू नये.

एकदा हे सगळं समजून घेतलं की, वृत्ती बदलेल प्रवृत्ती बदलेल आणि नातेसंबंधातील ताण आपोआप कमी होतील. घरकाम करून कंटाळलेल्या किंवा दिवसभर नोकरी-व्यवसाय करून आपल्या इतक्याच दमून गेलेल्या पत्नीला घरगृहस्थी किंवा मुलांच्या संगोपनात बरोबरीनं हातभार लावला पाहिजे, हे सांगावंच लागणार नाही. सगळं कसं उत्स्फूर्तपणे होईल. मनं तृप्त राहतील.

मात्र असं नाही केलं, तर काय होतं? नाटकं चाललेली असतात, रंग फासलेला असतो; पण भूमिका फसत जातात. म्हणूनच स्वत:भोवती विवेकाचं, आत्मज्ञानाचं कुंपण हवं, म्हणजे बाहेर कितीही बरबटलेलं असलं, तरी आपल्यापुरतं सावरता येतं.

घराभोवती कुंपण हवं म्हणजे आपलं जग ठरविता येतं. बाहेर बरबटलेलं असलं, तरी आपल्यापुरतं सावरता येतं आणि मग वाटतं या जगण्यावर, या मरण्यावर शतदा प्रेम करावे. म्हणून तळमळीनं जोडप्यांना सांगावस वाटतंय की एकमेकांना आधार, आदर, प्रेम द्या घ्या.

©श्रीकांत कुलांगे

मानसोपचारतज्ज्ञ

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *