उद्देशपूर्ण जगणं….

 

ग्रुपमध्ये गप्पा मारता मारता सहज विषय निघाला की आपल्या जगण्याचा हेतू (purpose ) काय ? आता तरुण मंडळी असल्यामुळे मोक्षप्राप्ती वगैरे कोणी काय म्हणालं नाही पण उत्तर मात्र करिअर, चांगले कुटुंब, यशस्वी कारकीर्द इत्यादी. तथापि, असे काही लोक आहेत जे सर्व मिळून सुद्धा काहीतरी कमी आहे याची जाणीव होत राहते व हाच “काहीतरी कमी ची भावना” हा त्यांचा जीवनातील हेतू आहे. हीच भावना काहींना जगण्याची उर्मी देऊन जाते व मग ते त्याकरिता अविरत कष्ट घेतात.

एकाने विचारले की “जगण्याचा उद्देश” ही भावना का जरुरी आहे? अप्लाइड सायकोलॉजीच्या अभ्यासानुसार ज्या लोकांचा काही जगण्यासाठीचा हेतू आणि तशी भावना असते असे लोक जास्त आनंदाने जगतात, व इतर अनेक फायदे आहेत. आपल्याला हेतुपूर्ण जगायचं असेल तर ते शक्य आहे. पण हे पटकन नाही जमत व यासाठी काही धोरणे आखावी लागतील :

१. वेळ, पैसा, बुद्धी खर्च करणे – वृद्धांना, समाजातील ज्याला मदतीची गरज आहे त्यांच्या साठी.
२. अभिप्राय ऐकणे – आपण हेतू साध्य करण्यासाठी जे काय करतोय त्याबाबत फीडबॅक जरूर घ्या, चुकत असाल तर त्या सुधारणे.
३. स्वतःला सकारात्मक लोकांसमवेत ठेवणे – योग्य मार्गावर चालाल.
४. नवनवीन लोकांशी चर्चा / संभाषण – काम, प्रवास, शिकताना वेगवेगळ्या लोकांशी बोलल्यास माहिती मिळते ज्याचा उपयोग तुम्ही करू शकता.
५. स्वतःला कशामध्ये रुची आहे ती शोधणे – त्या नुसार तुम्ही क्षेत्र निवडू शकलात तर त्यात तुम्ही चांगले कार्य करू शकाल.
६. पूर्ण वेळ द्यायची गरज नाही – चालत बोलता, काम करताना, सहजासहजी या गोष्टी झाल्या पाहिजेत.
७. मला काय करायला आवडते त्याचा शोध – कोणत्या प्रकारचे कौशल्य, प्रतिभा आणि आवडी यांचा विचार करून त्या आपल्याला हेतू साध्य करण्यासाठी कशी मदत करून शकतात याचा आढावा घेणे.

पर्पजफूल लाईफ किंवा जगण्याचा उद्देश ही कधीही न संपणारी आणि नेहमी बदलणारी नशा आहे. कधी तुम्ही गरिबांना मदत करणार तर कधी देशाचा सैनिक बनून, चांगला नागरिक तर कधी चांगली संतती बनून..लोकांना आपल्या चांगल्या विचारांची संगत देणार तर कधी माझ्या हातुन पर्यावरणाची रक्षा, असे एक न अनेक उद्देश आपले आयुष्य सार्थकी लावत असतं.

पण एवढं सगळं करून मी काय प्राप्त करणार ? हा प्रश्न काहींना नक्कीच मनातून ऐकायला येईल.
१. आत्मसन्मान
२. अहंकार, नैराश्य, चिंता, मनस्ताप दूर पळवतो. विचारात लवचिकता येते. निर्णयशक्ती द्विगुणित होते.
३. निसर्गाचे देणे जिवंतपणीच दिल्याची भूमिका आपल्या येणाऱया पिढीसमोर सशक्तपणे ठेवल्याचे समाधान.
४. जरी आपला हेतू पूर्ण नाही झाला तरी मी प्रयत्न केल्याचे समाधान.

उद्देशपूर्ण जीवन जगण्याचा मार्ग स्वीकारताना रस्ता कसाही असो, मानसिक समाधान मात्र अधिक सुखदायी असते फक्त इच्छाशक्ती पाहिजे ती नसेल तर जगण्यात तरी काय अर्थ आहे?

पथ का अंतिम लक्ष्य नहीं है, सिंहासन चढ़ते जाना।
सब समाज को लिए साथ में, आगे है बढ़ते जाना I

@श्रीकांत कुलांगे
९८९०४२०२०९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *