पालक – तरुण – संवाद

आयुष्यभर एकत्र राहून सुद्धा कित्येक विवाहित जोडीदार, नातेवाईक, पालक – मुलं इत्यादी एकमेकांशी नीट संवाद करत नाहीत हे दुर्दैवी आहे. पदवी घेतलेला तरुण जो एम.पी.एस.सी. ची तयारी करतोय, वडील कित्येक वर्षापूर्वी देवाघरी गेलेले, आई एकटी काम करून संसाराचा गाडा हाकत असताना हा गडी मात्र आईशी अबोला धरून बसलेला. काळजी करणारी आई मला सांगते की तुम्ही त्याला विचारा की काही प्रॉब्लेम तर नाही ना? हा असा रागाने का बोलतो? अनेक प्रश्न. असा पदवीधर तरुण किंवा तरुणी बऱ्याच घरात आढळतील. म्हणून जेंव्हा जेंव्हा अशा व्यक्तींबरोबर बोललो तर काही तथ्ये समोर आली.

१. लहानपणापासून आई वडिलांमधील विसंवाद. जसजशी मुलं मोठी होत गेली, तसतशी दरी वाढत गेली.
२. मुलांची स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची ओढ.
३. प्रेमभंग किंवा नकाराची भीती.
४. मित्रांचा जास्त सहवास. कारण पालक कामावर.
५. पालकांची मुलांकडून अवास्तव अपेक्षा किंवा अती काळजी.
६. मानसिक आजार. नैराश्य, उद्याची चिंता, समाजाप्रती उदासीनता.
७. सभोवतालचे वातावरण पोषक नसणे.
८. पालकांचे नेहमी टोचून बोलणे. इतरांकडे मुलांच्या तक्रारी करणे, जसे काही त्यांच्यात चांगले गुण नाहीतच.
९. जेवणाची हेळसांड, पर्यायाने पोषक आहाराची कमी.
१०. अभ्यास करून देखील कमी मार्क्स मिळतात म्हणुन फ्रस्ट्रेशन. मन लागत नाही कारण इतर मित्र पुढे गेलेले असतात.
११. कुणाशी आपले मन मोकळं करायचं ते समजत नाही म्हणून एकाकी राहणं.

अशा एक ना अनेक प्रकारची गुंतागुंत आणि प्रश्नांची सोडवणूक करताना होणारी मुलांची मानसिकता पालकांच्या ध्यानात येत म्हणून त्यांच्या तक्रारी. दोन्ही बाजूंनी असलेली ही नकारात्मक मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न होतो पण पद्धत चुकीची असते.

१. आपल्या जोडीदाराबद्दल आदर दाखवा. तो लहानपणापासून मुलांना घरात दिसू द्या.
२. मुलं बोलत असताना व्यत्यय आणण्यापेक्षा पूर्ण ऐकून घेऊन त्यांचे मन मोकळे होऊ दिले तर फायदा होईल.
३. आपण त्यांच्याशी कसे व काय बोलतो या बाबत काळजी घेतली तर संवाद चालू राहील.
४. आपल्या चिंता, विचार आणि कल्पनांचा मुलांवर परिणाम होऊ नये म्हणून आपल्या व्यथा त्यांना सांगण्याऐवजी त्यांचे प्रश्न आधी ऐकून मदत करू शकतो का याचा विचार सुरुवाती पासूनच सुरु करायला हवा.
५. मुलांनाही आता आपण पदवीधर आहोत आणि घर गृहस्थी चालवायची आहे, पुढे कसे होईल याबाबत चिंता करून आई वडिलांना वेठीस धरणे योग्य नाही हे समजायला हवे.
६. आपले म्हणणे मुलांनी व्यवस्थित सांगून पालकांचा आदर ठेवला पाहिजे त्यासाठी मानसिक ताण तणाव व्यवस्थापन अपेक्षित आहे.
७. समुपदेशन ही काळाची गरज आहे म्हणून अनेक एन.जी.ओ. आजकाल तरुणांशी बोलतात व मार्ग दाखवतात. त्यांना भेटा, बोला.
८. आईने जे काही घरात बनवले ते आनंदाने खाऊन, मदत करून, तिच्याशी हसत खेळत गप्पा मारून तिलाही आनंदी ठेवणे ही पुढील सुखी संसाराची पायाभरणी असते हे समजून घ्या.
९. मुलांच्या घडवण्यात जशी आईची भूमिका असते त्याहून अधिक वडिलांची असते ही जाणीव ठेऊन मित्रत्वा चे नाते ठेवल्यास छानच.
१०. मतभिन्नता ही मानवी संस्कृती आहे. म्हणून राग कशाला करायचा. समजून घेऊन प्रश्न वेळेवर सुटू शकतात.
११. व्यायाम, मेडीटेशन आणि आनंदी जीवन ही गुरुकिल्ली.

काल मुलाशी व आईशी बोलून त्यांना समुपदेशन करून झाल्यावर गुंतागुंत व घालमेल कमी झाल्याचं दोघांनी कबुल केलं. मनमोकळ झाल्याने हे असं होते पण ते करताना योग्य व्यक्तींबरोबर झाले तर चांगले. बरेच प्रश्न हवेतील व अर्थहीन असतात हे नंतर समजते. तरीही, वडीलधाऱ्या व्यक्तींचा योग्य सन्मान केलाच गेला पाहिजे. त्यांच्याही समस्या असू शकतात हे आजच्या तरुणांनी समजून घेऊन, पैसे जरी कमवत नसाल तरी फक्त प्रेमाने विचारपूस केली, इतर कामात हातभार लावला तरी खूप झाले.

 

 

©श्रीकांत कुलांगे
9890420209

1 thought on “पालक – तरुण – संवाद”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *