मानसिक दुरावस्था

मागील आठवड्यात आलेल्या अनेक केसेस पैकी 40% केसेस या “इतरांच्या वागणुकीमुळे मला त्रास होतोय” या कॅटेगरीतील होत्या. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी अशी ठाम समजूत करून घेतलेली असते की, घडलेल्या घटना किंवा इतरांचं वागणं हेच आपल्या भावभावना ठरवित असतात. आपल्या आयुष्यात दु:ख हे अनुभवाला येणारी परिस्थिती आणि इतरांचं वागणं यामुळेच निर्माण होते. यावर बरेच लोक विश्वास ठेवत असतात. ‘तू मला अस्सा वैताग आणतो’ असे म्हणताना अभिप्रेत असते की, तू आपले वर्तन बदलल्याशिवाय मी सुखी होऊ शकणार नाही. दु:खाची जबाबदारी मी स्वत:कडे घेण्याची गरज नाही; कारण सर्वस्वी तुझ्यामुळेच ते दु:ख होत आहे. परिस्थितीला किंवा इतरांच्या वागण्याला स्वत:च्या भावनिक अस्वस्थतेचे कारण समजणार्‍यांनी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत.
घटना/वागणं तेच; पण ते अनुभवणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींवर होणारे भावनिक; तसेच वर्तनात्मक परिणाम वेगळ्या प्रकारचे आणि कमी-अधिक तीव्रतेचे म्हणजेच व्यक्तिपरत्वे भिन्न असतील. हे जर खरं आहे तर परिणामांची जबाबदारी व्यक्तीकडे जाईल की बाह्य घटना व इतरांचं वागणं याकडे जाईल? अर्थात, व्यक्तीकडे जाईल हे कुणालाही पटावं.
आपल्या दैनंदिन अनुभवांकडे बारकाईने पाहिले तर लक्षात येईल की, आपल्या अनुभवाला येणाऱ्या बऱ्या-वाईट भावनांकरिता घटना किंवा इतरांचं वागणं यांना दोष देण्यापेक्षा तो स्वत:कडे घेणं हे बुद्धीला अधिक पटणारं आणि व्यवहारिक होईल; कारण परिस्थिती किंवा इतर लोक केवळ आपल्याला पाहिजे म्हणून तसे असणार नाहीत किंवा बदलणार नाहीत. त्यापेक्षा स्वत:ला बदलणे शक्य आणि योग्य आहे. शिवाय भोवतालच्या घटना आणि व्यक्ती आपल्या सोयीच्या असल्या पाहिजेत, हा अट्टाहास चुकीचा आहे; कारण तसा नियम नाही. आपण तरी इतरांना हवे तसेच नेहमी वागतो का? मग प्रश्न येतो तो व्यक्तीने स्वत:ला बदलायचे म्हणजे नेमके काय बदलायचे? त्याकरिता काही मूलभूत तत्त्वांची ओळख व्हायला हवी. जसे की:
१. जगात 100 % चांगलं अथवा वाईट असं काहीही नाही, आपल्या विचारांनी ते तसं ठरतं.
२. आपण भावनिकदृष्ट्या अस्वस्थ होतो तो घटनांमुळे नव्हे, तर घटनांकडे बघण्याच्या आपल्या दृष्टिकोनामुळे.
३. स्वानुभवातून घडलेल्या घटनांचा आपल्या विचारांवर परिणाम होऊन आपण त्याच अँगलने सगळीकडे बघतो.

भावनिकदृष्ट्या अस्वस्थतेच्या आणि अस्वस्थता कमी होण्याच्या प्रक्रियेत वेगळे काही टप्पे आढळतात.
१. घडलेली घटना.
२. घटनेच्या संदर्भात व्यक्तीचा स्वत:शी होणारा संवाद व त्यामागील विचार. वास्तवाला धरून व अर्थपूर्ण आहे काय ते तपासणे.
३. भावनिक – राग, नैराश्य, दु:ख, अपराधी भावना, चिंता इ. व त्यांचे आपल्या वर्तनावरील विपरीत परिणाम.
४. आपल्या विचाराला आव्हान. आपले विचार घडलेल्या घटनांशी विसंगत तर नाहीत ना.

. विचारात होणारे बदल.

अस्वस्थतेचे कारण आणि त्यात योग्य तो बदल केल्यास अनुभवाला येणाऱ्या परिणामांची आपल्याला प्रचिती येते. घडलेल्या घटनेकडे आपण कसे पाहतो त्यावरून खूप मानसिक बदल आपण करू शकतो. कुठलीही घटना घडली तर सखोल आणि सारासारविचार करून वाचकांनी स्वत:ला खालील प्रश्न विचारावेत.

१. घटना आणि तिचे भावनिक परिणाम यामध्ये व्यक्तीचं स्वत:शी विचार (बोलणं) होत असतात की नाही?
२. घटनेसंदर्भात स्वत:शी होणारं बोलणं ओळखून त्याची नोंद करता येईल काय?
३. आपलं स्वगत बुद्धीला पटणारं, वास्तवाशी मिळतं जुळत आणि अर्थपूर्ण की अर्थहीन हे आपल्याला ठरवता येईल काय?
४. घटनेसंदर्भात स्वत:शी होणारं बोलणं, त्यातील अनुचित भाग काढून टाकून वर सुचविल्याप्रमाणे त्याला विवेकपूर्ण रीतीनं बदलणं आपल्याला शक्य आहे काय?
५. स्वत:शी होणाऱ्या बोलण्याची तुलना करता त्यापैकी कोणते विचार विवेकपूर्ण किंवा बुद्धीला पटणारे, वास्तवाशी सुसंगत आणि अर्थपूर्ण म्हणता येईल?
६. प्रत्येक टप्प्यावर होणारे विचार अधिक विवेकपूर्ण वास्तविक आणि अर्थपूर्ण असेल, तर त्यामुळे आपल्या भावनिक आणि वर्तनात्मक परिणामांत काही फरक पडेल का?
७. फरक पडणार असेल तर तो सकारात्मक असेल की नकारात्मक?
८. फरक सकारात्मक असेल, तर तो कसा आणि कुणी घडवून आणला?

तात्पर्य, फरक व्यक्तीने स्वत:च घडवून आणला. तोही घटना किंवा परिस्थितीला बदलून नव्हे तर त्याकडे बघण्याच्या तिच्या दृष्टिकोनातील विवेकहीनता आणि अवास्तवता घालवून. त्याऐवजी परिस्थितीविषयी अधिक विवेकपूर्ण, वास्तव आणि सकारात्मक विचार करून आणि त्यानुसार विचारात बदल करून हे घडवून आणले. या थोड्याशा वेळात जर व्यक्ती स्वत:च्या दृष्टिकोनात रास्त बदल करून स्वत:च्या भावनिक स्थितीत सुधारणा घडवून आणू शकते, तर विचाराला तशी शिस्त लावण्यास शिकले पाहिजे. त्यामुळे स्वत:च्या प्रगतीच्या वाटेवर तिनेच निर्माण केलेल्या भावनिक अडसरांवर ती सहज मात करून शकेल. याचा अर्थ असा नाही की, परिस्थितीला सामोरे जाऊन ती बदलण्याचा प्रयत्न करू नये किंवा तिच्याबद्दल नावड असू नये.
स्वत:च्या क्षमता आणि उपलब्ध संधी वापरून परिस्थिती सोयीची करण्याचा प्रयत्न जरूर करावा; परंतु तसे करताना स्वत:च्या मर्यादांची आणि वास्तवाच्या बंधनांची जाणीव ठेवावी. तसंच परिस्थिती बदलायलाच हवी असा हेका न धरता स्वत:ला बदलण्याची तयारी व्यक्तीने ठेवायला हवी. आयुष्यभर येत राहणाऱ्या समस्यांना, भावनिक स्वास्थ्य ढळू न देता, समर्थपणे तोंड देण्यास या सकारात्मक विचारसरणीची आपल्याला मदत होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *