जनरेशन गॅप आणि आपण

मुलीचे आणि तिच्या आजीचे अजिबात पटत नाही म्हणून पालक मुलीला घेऊन समुपदेशन साठी आले होते. एकूणच ही केस बऱ्याचदा अनेक घरात आढळते. विचार आणि वागणूक यांच्या संघर्षामुळे दोन पिढ्यांमध्ये बहुतांश ताणतणावाचे वातावरण दिसून येते. ‘जनरेशन गॅप’ या नावाने ओळखला जाणारा हा प्रकार. त्यातून आधीच्या आणि नंतरच्या पिढीच्या विचारसरणीत असलेले अंतर दिसून येते. परंतु परिस्थितीमध्ये झपाट्याने घडून येणाऱ्या बदलांना संघर्षाकरिता आणि तणावाकरिता सर्वस्वी जबाबदार मानता येणार नाही. परिस्थिती आहे तशी स्वीकारण्याची दोघांचीही तयारी नाही.
परिस्थितीकडे बघण्याची दृष्टी आणि तिचे मूल्यमापन करण्याची दोन पिढ्यांची तर्‍हा वेगळी. त्यात ‘आपलेच बरोबर’ हा हटवादीपणा आणि विवेकाची कास सोडल्याचं आढळणार.

खरंतर प्रत्यक्ष परिस्थिती दोघांकरिता सारखीच असते; पण दोघांच्या मनात उमटणारे तिचे चित्र मात्र वेगवेगळे असते. त्यांच्या प्रतिक्रिया, त्यांचे वर्तन बऱ्याच प्रमाणात त्यांच्या मनात तयार झालेल्या वेगवेगळ्या प्रतिमांनुसार होत असते. परिणामी एका पिढीचे व्यवहार दुसऱ्या पिढीला पटत नाहीत. प्रतिमा जितक्या विसंगत तेवढे दोन्ही पिढ्यांचे आपसातील व्यवहार टोकाचे आणि दोघांनाही क्लेशकारक आणि परस्परसंबंधात कडवटपणा आणणारे असतात. त्यावर उपाय एकच, तो म्हणजे दोन्ही पिढ्यांच्या व्यक्तींनी परिस्थितीकडे बघण्याचा आपापला दृष्टिकोन विवेकपूर्ण आणि वास्तववादी करावा; जेणेकरून त्यातली तफावत कमी होईल. प्रतिक्रियांमध्ये दिसणारा कडवटपणा जाईल आणि सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण होण्यास चालना मिळेल. कुटुंबांच्या मर्यादित वातावरणातही दुसऱ्याने आपल्याशी समजूतदारपणे, सहानुभूतीने आणि न्यायाने वागलेच पाहिजे हा आग्रह अवास्तव आणि विवेकहीन म्हणून त्याज्य ठरतो. इतरांचे वागणे कधी ना कधी आपल्या अपेक्षेविरुद्ध असण्याचीच शक्यता जास्त असते; कारण कोणी कसे वागावे याचे कायमचे, अपरिवर्तनीय नियम नाहीत.
उलट कसे वागावे याचे स्वातंत्र्य स्वत:बरोबरच प्रत्येक व्यक्तीला आहे. आपले वागणे तरी प्रत्येक वेळी इतरांच्या अपेक्षेप्रमाणे असते का? असे स्वत:ला मधूनमधून विचारत राहावे. त्यामुळे इतरांचे वागणे आपल्या अपेक्षेनुसार नसले तरी कुठल्याही निसर्गनियमाचा भंग होत नाही याची जाणीव पालक आणि पाल्य अशा दोघांकरिताही विशेष महत्त्वाची आहे. त्यांच्यातील संबंधात कडवटपणा आणि ताणतणाव येतात ते परस्परांच्या वागण्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन विवेकपूर्ण आणि वास्तवाला धरून नसतो म्हणून. एकदुसऱ्याला ते विनाशर्त म्हणजे त्यांच्या गुणावगुणांसहित स्वीकारित नाहीत म्हणून.

एकमेकांच्या विशिष्ट वागण्याचेच तेवढे मूल्यमापन करून परस्परांना रागीट, हुकूमशहा, दुराग्रही, उद्धट, बेजबाबदार अशी सर्वव्यापी विशेषणे लावण्याचे त्यांनी टाळल्यास प्रसंगी त्यांचे वागणे अपेक्षेनुसार नसले तरी केवळ त्यामुळे परस्परसंबंध बिघडणार नाहीत व घरातील वातावरण ताणतणावरहित आणि सौहार्दपूर्ण होऊ शकेल.
वरील समुपदेशनाची केस हॅण्डल करताना मुलगी आणि आजीबरोबर काही भूमिका स्पष्ट केल्या. कुणाचाही अहं न दुखावता सामाजिक व मानसिक बदल वयोमानानुसार होतात यांची त्यांना जाणीव करून दिली. काही मुद्दे त्या दोघींच्याही लक्षात आणून दिले.
१. स्वभाव बदल. मला आवडत नाही म्हणून त्यांनी तसं वागू नये, असं कुठंही लिहिलेलं नाही किंवा तसा नियमही नाही. म्हणून वरील स्वगत वास्तवाला सोडून आहे इतकंच नाही तर ते विवेकहीनही आहे.
२. इतर व्यक्ती जेव्हा आपल्या अपेक्षेनुसार वागतील तेव्हा तो ‘बोनस’ समजावा. तो आपला हक्क समजू नये.
३. अपेक्षेप्रमाणे असणाऱ्या इतरांच्या वागण्यावर सकारात्मक प्रतिक्रिया द्यावी. ‘त्यात काय मोठे झाले’ अशा शब्दांत धुडकावून लावण्याऐवजी तोंडातून कौतुकाचा शब्द निघू द्यावा.
४. विचारसरणीत आणि परिस्थितीकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनात योग्य बदल करून तसेच दु:खाची शक्यता कमी करून सुखाची संभवनीयता वाढवणे एवढेच आपल्या हाती आहे याची जाणीव.
५. वासना, अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपली चाललेली धडपड आणि वास्तवाच्या मर्यादा व बंधने यामध्ये मेळ किंवा सुवर्णमध्य साधणे आपल्याला नेहमीच शक्य होईल असं नाही.

या गोष्टी फक्त आजी नातीच्या नसून वेगवेगळ्या मानवी संबंधांमध्ये आढळतात. इतरांशी सलोखा राखण्यासाठी आवश्यक पथ्ये पाळणे गरजेचे.
१. संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचा त्यांच्या गुणदोषांसहित म्हणजे विनाअट स्वीकारच नव्हे तर आदर करायला शिकणे. आपल्यालाही त्यांच्याकडून तसाच प्रतिसाद मिळण्याची शक्यता वाढेल.
२. कठीण असले तरी ते अशक्य मात्र नक्कीच नाही याची जाणीव.
३. इतरांच्या वागण्याविषयी मत व्यक्त करण्याचा आपल्याला अधिकार आहे. त्यांच्या विशिष्ट परिस्थितीतील वागण्याचे मूल्यमापन करा आणि ते स्पष्टपणे; पण सौम्य शब्दांत त्यांना सांगा; परंतु संपूर्ण व्यक्तीचे मूल्यमापन करून तिला लेबल चिकटवणं, शिक्के मारणं कटाक्षाने टाळणे.
४. इतरांप्रति आपली सहिष्णुता हळूहळू वाढवणे गरजेचे. त्याकरिता इतरांच्या भावनांशी समरस होण्याचा प्रयत्न करायला हवा. आपल्याशी दुसरी व्यक्ती वाईट का वागली असावी याच्या सर्व संभाव्य कारणांचा विचार करणे चांगले.

विवेकपूर्णता आणि वास्तवता यांचे भान राखून केलेल्या केलेल्या वरील चर्चेवरून स्पष्ट व्हावे की, लोकांनी माझ्याशी नेहमीच सभ्यपणे आणि न्यायाने वागले पाहिजे, ती माझी पात्रताच नव्हे तर माझा हक्क आहे, ही मागणी अयोग्य तर आहेच; पण ती आपल्या हिताचीही नाही. हळूहळू त्या आग्रही मागणीचा त्याग करून काही विवेकपूर्ण धारणा आत्मसात करणे सफल, सुखकर आणि तणावमुक्त जीवन व्यतीत करण्यास उपकारक ठरेल. जरूर विचार करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *