आयुष्याचे मूल्यमापन

 

जगण्यात खरंच जाम मजा आहे रे असे जेंव्हा मित्र बोलला तेंव्हा मी उडालोच. बऱ्याच दिवसांनी एवढा सकारात्मक मित्र भेटल्यामुळे साहजिकच मी विचारले, काय रे काय कारण. त्याला कुणीतरी सांगितले कि बच्चा, आयष्याचं विश्लेषण करून बघ. तेंव्हा कुठं माझ्या डोक्यात प्रकाश पडला कि हा असा का बोलतोय. हसून त्याला मी विचारले कि सांग कसं केलं मूल्यमापन. काही नाही सोपं आहे, देवाने सगळं शरीर शाबूत दिलंय, आई-वडील ठणठणीत, बायको मस्त साथ देते, मुलं त्यांच्या हिशोबाने चाललेत, माझी नोकरी जशीतशी पण भागतं, मग अजून काय पाहिजे रे जगायला. दोन मिनिटे शांत राहून विचार केला कि खरंच इतकं हे सगळं सोपं आहे? मी स्वतःशी हसलो, माझं उत्तर मिळालं होतं. साधा फंडा आहे – काय करायचं ते ठरविणे, त्याप्रमाणे करणे, ठीक करतो का ती खात्री करणे आणि अजून चांगले कसे करू शकतो ते पाहणे. (PDCA cycle ) अशी विश्लेषण पद्धती बहुदा बऱ्याच कंपन्या वापरतात ज्याने करून सगळी सिस्टीम नीट चालावी. तशी आपण आपल्या आयुष्यात सुद्धा वापरली तर खूप काही समजेल. पण हे विश्लेषण का करावं त्याला काही कारणे जसे कि;

१. एक तर आजच्या युगात आपण कुठे आहोत. आपली नीती योग्य ठेऊन वाटचाल.
२. आपलं कुठे चुकतेय का – रोज मी काय चुकीचे केले ते अवलोकन.
३. आपले वागणे, आचरण कसे आहे. आपल्या पद्धतीवरून आपली समाज किंमत करत असतो.
४. आपले व्यक्तिमत्व बदल – चांगले कि वाईट. योग्य आहार, नित्य व्यायाम, चांगले विचार, बोलणे.
५. स्वतःची बुद्धी अवलोकन – आपले निर्णय योग्य होते का.
६. आपल्या संवेदना – संवेदनशीलता स्वतः व इतरांसाठी.
७. प्रेरणा स्थान – अनेक व्यक्ती भेटल्या, पुस्तके वाचली, कुटुंब व्यवस्था – नेमके प्रेरणा कुठून घेतली व काय केले.
८. अपेक्षा पूर्तता – स्वतःच्या व इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी काय केलेय.

यांचे फायदे काय असे कुणाला वाटणे साहजिक आहे :
१. विद्यार्थ्यांना स्वतःची शिकण्याची प्रगती आणि कार्यक्षमता गंभीरपणे विचार करण्यास प्रोत्साहित करते.
२. विद्यार्थ्यांना स्वतःच्या शिक्षणासाठी अधिक जबाबदार राहण्यास व त्यांचे कौशल्य विकसित करण्यात मदत करते.
३. तरुणांना आपल्या व्यवस्थापन कला विकसित करून जबाबदार नागरिक बनवते. लहान – थोरांची काळजी घेण्यात पुढाकार.
४. गृहिणींना “माझा आदर करा” हि सांगायची वेळ येऊ देत नाही व स्वतः सर्वांची काळजी मनापासून घेतात.
५. जेष्ठ नागरिक तसेही आयष्याचा जमाखर्च करून कुंपणावरून गम्मत पाहतात व चुकले कि सांगतात – हि कला अजून छान होईल.

अशा खूप काही गोष्टी वर आपण चर्चा करू शकतो ज्याने करून काय कमी किंवा जास्त ते समजते. बऱ्याचदा काय करावं माहित असून सुद्धा आपण ते करत नाही. बारीक बारीक चांगल्या गोष्टी आपण केल्या तर लहान मुलं किंवा शेजारी पाजारी आपले अनुकरण करतात. आपले विचार आणि आचार यांचे विश्लेषण आज काळाची गरज आहे. उद्याचे जगणे आजच्या जगण्यावर अवलंबून असते हे ज्याला समजले तोच आनंदी राहू शकतो.

@श्रीकांत कुलांगे
9890420209

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *