अंतर्मन आणि वैवाहिक समस्या

विवाहपूर्व समुपदेशन का गरजेचे आहे आणि त्यासाठी मानसिक आरोग्य किती महत्वाचे यासाठी सेमिनार घेण्यात आला. त्यामध्ये प्रामुख्याने एक प्रश्न मोठा उपस्थित केला गेला तो म्हणजे होणारे घटस्फोट. काय करावे ज्याने करून शक्यतो ते होणार नाहीत. 

घटस्फोट टाळण्यासाठीचा सर्वोत्तम काळ म्हणजे लग्नाआधीचा काळ. तुमच्यामध्ये आत दडलेल्या सगळ्या शक्तींबद्दल अनभिज्ञ असणं हे तुमच्या सगळ्या वैवाहिक समस्यांचं कारण असतं. तरी सुद्धा घटस्फोट होण्यामागची अनेक कारणे स्त्रियांनी सेमिनारमध्ये पुढे आणली.

 

१. जोडीदाराची अपरिपक्वता.

२. विचारांचा गोंधळ.

३. नैतिकतेची कमी.

४. आदर न देणे.

५. शारीरिक इजा पोहोचविणे. मारहाण, धक्का बुक्की करणे. मोबाईल फेकून मारणे.

६. मादक पदार्थांचे अतिसेवन.

७. पर स्त्री बरोबर लग्नाबाह्य संबंध.

८. आर्थिक चणचण

९. मानसिक आधाराची कमी.

१०. कामाच्या नावाखाली भलतीकडेच टाईमपास करणे.

११. मूलभूत गरजा न भागवणे.

१२. शारीरिक सुखाची कमी.

१३. मानसिक आजार.

 

सेमिनार मध्ये शेवटी आम्हाला ही लिस्ट पुढे अनेक कारणांकडे वेळेअभावी पुढे नेता नाही आली परंतु समाजात हे वास्तव आहे. आपल्या मुलीने नीट संसार करावा आणि सुखी राहावे हे पालक मुलांकडून अपेक्षा करतात परंतु काही कारणास्तव नंतर समजते की जोड विजोड आहे. अशा परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी समुपदेशन वेळोवेळी घेतले तर संबंध पुन्हा नियमित होऊ शकतात. अंतर्मन याठिकाणी महत्वाचे आहे. लग्नाअगोदर दोघांनाही समुपदेशनमध्ये काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो.

 

१. तुम्ही लग्न आनंदी कसं करू शकाल हे स्वत:ला सांगत रहा. तुमच्या शब्दकोषातून अशक्य हा शब्दच काढून टाका.जी कोणती गोष्ट तुम्ही अंतर्मनावर बिंबवाल त्याच गोष्टीचा अनुभव तुम्ही जगात घ्याल.

२. तुमच्यामधलं असलेलं सर्वोत्तम प्रेम, समर्पण आणि सहकार्य देण्याची तीव्र आकांक्षा मनात ठेवा.

३. स्त्री-पुरुषामधला विवाह ही प्रेमाची कृतीच असायला पाहिजे. प्रामाणिकपणा, सच्चेपणा, माया आणि समग्रता ही सगळी प्रेमाचीच रुपं आहेत. प्रत्येकानं आपल्या जोडीदाराशी पूर्णपणे प्रामाणिक आणि सच्चं असलंच पाहिजे.

४. पैशांसाठी लग्न करणं किंवा पैशांसाठी एखाद्याबरोबर राहणं ही नक्कीच दांभिकपणाची आणि हास्यास्पद गोष्ट आहे.

५. प्रेम, स्वातंत्र्य आणि आदर या भावनांमधून दोन हृदयांचं मीलन व्हायला हवं.

६. दोन हृदयं जेव्हा प्रेमानं आणि शांतीनं एकमेकांशी एकरुप झालेली नसतात तेव्हा त्या लग्नाला काही अर्थ नसतो.

७. स्वत:च्या जोडीदाराविषयी तुमच्या मनात जर द्वेष, चीड आणि कमालीची असहिष्णुता असेल तर स्वत:च्या मनात तुम्ही आधीपासूनच व्यभिचार केलेला असतो.

८. नवरा बायकोमध्ये होणाऱ्या छोट्या छोट्या भांडण वा मतभेदांमुळे काही नुकसान होत नाही. पण दीर्घकाळ मनात धरून ठेवलेला आकस वा वाईट भावना यांमुळे नुकसान होतं.

९. आपल्या जोडीदाराप्रती प्रेम आणि सदिच्छा दर्शवून जर तिला/त्याला माफ केलं तर हे लग्न वाचू शकतं.

१०. अनेकदा तिच्याकडे होत असलेलं दुर्लक्ष हे तिच्या तक्रारीचं कारण असतं. बऱ्याचदा ती प्रेमाची भुकेली असते. हवं असलेलं प्रेम तिला द्या.

११. नवरा बायकोनं गिधाडासारखं वागणं बंदच केलं पाहिजे. सतत आपल्या जोडीदाराच्या चुका वा त्रूटी शोधणं बंद करायला हवं. प्रत्येकानं दुसऱ्याकडे लक्ष द्यावं, त्याच्या चांगल्या गुणांचं आणि सकारात्मकतेचं कौतुक करावं.

 

जेव्हा तुमचं मन आणि हृदय दुसरीकडे कुठेतरी असतं तेव्हा मानसिक पातळीवर तुमचा घटस्फोट झालेला असतो. अशा परिस्थितीत एकत्र राहणं हे सगळ्या दृष्टीनंच विनाश घडवणारं असतं. जर मतभेद झाले किंवा कशावरुनतरी भांडण झालं आणि दोघांपैकी एकानं स्वत:च्या मनात राग वा विरोधासारख्या नकारात्मक भावनेला स्थान दिलं तर त्याच्या मनातच झगडा निर्माण होईल. ही गोष्ट वैवाहिक आनंदाचा नाश करणारी आहे.

प्रशिक्षित समुपदेशकाशिवाय इतर कोणाबरोबरही तुमच्या वैवाहिक समस्यांची चर्चा करू नका. तुमच्या वैवाहिक समस्या वा अडचणी यांची चर्चा नातेवाईक वा शेजाऱ्यांबरोबर करणं ही सर्वात मोठी चूक आहे. कारण दिलेले सल्ले कित्येकदा आगीत तेल ओतण्याचे काम करू शकतात.

 

©श्रीकांत कुलांगे

9890420209

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *