भावनिक प्रगल्भता

आपल्या भावना कशा व्यक्त कराव्यात ज्यानेकरून समोरच्या व्यक्तीला त्रास होऊ नये याबाबत एका क्लाएंटला समुदेशन करायची वेळ आली.

आपल्या भावना समोरच्याकडे मांडताना जर ‘त्या माझ्या भावना आहेत’, हे सांगून, समोरच्याला दोष न देता भावना मांडल्या तर खऱ्या अर्थी ती पूर्णता असते. खूप वेळेस आपण आपल्या भावना मांडून रिकामे होतो. पण त्या भावना मांडताना समोरच्याला त्रास होतोय का ? याची काळजी घेत नाही.

आपल्या भावना समोरच्याला सांगणं, याचा अर्थ त्याला दुखावणं, त्याला दोष देणं किंवा त्याचा अपमान करणं असा होत नाही.

आपल्या मनात हरल्याची, अपमानाची भावना असते, ‘माझं काहीतरी चुकलंय, मला जमलं नाही…’ अशी भावना असते तेव्हा आपल्याला ती रुखरुख लागते किंवा त्रास होतो. अशा वेळेस स्वतःचं परीक्षण करा. परीक्षण करून जरी आपल्याला त्यात, ‘माझ्या या दोन चुका झाल्या’ हे समजलं तरीसुद्धा खूप झालं. कारण या परीक्षणातून ‘मला या दोन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या, ज्याचा उपयोग मी पुढे करेन…’ हे महत्त्वाचं. आपल्या अपूर्ण भावना आपल्याला त्रास देतात पण त्या पूर्ण करताना आपण जेव्हा समोरच्याला दोष देतो, ‘तुला कळत नाही’, ‘तुझ्यामुळे असं झालं’ त्या वेळेला या पद्धतीने आपण आपल्या भावना व्यक्त करत नाही तर आपण समोरच्यावर दोषारोप करत असतो. ‘तो चुकीचा’ असं सांगत असतो. जेव्हा ‘तो चुकीचा’ असं म्हणतो तेव्हा ‘मी बरोबर’ असा आपोआप यातून अर्थ निघतो. एखादी घटना घडली आणि त्यावर तुम्हाला दुःख झालं, त्रास झाला, आनंद झाला… जे काही झालं, तर ती घटना आणि तुमच्या भावना या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत हे समजून समोर मांडा. आपलं मत कळवणं यात वाईट काहीच नाही. परंतु ‘हे माझं मत आहे’ हे सांगायला नक्की विसरू नका. तुम्हाला काय मत मांडायचंय? तुमच्या भावना काय आहेत हा संपूर्ण तुमचा अधिकार आहे. त्या भावना योग्य आहेत का अयोग्य आहेत हे ठरवण्याचा पण समोरच्याला अधिकार आहे.

खूप वेळेला समोरचा चिडून, रागवून बोलत असतो. ‘तुम्ही जे बोलताय ते मला वाटतंय, रागवून बोलताय. माझ्यावर रागवू नका.’ असं म्हणणं कदाचित जास्त होईल. कारण या जगात कोणी रागवत नाही असं कधीच शक्य नाही. प्रत्येकाला राग येतो. ‘तुम्ही रागवू नका, चिडू नका’ हे म्हणण्यापेक्षा ‘तुम्ही हळू आवाजात बोला, तुम्हाला चांगलं वाटेल’ हे सांगणं जास्त आवश्यक आहे. किंवा ‘तुमचा आवाज वाढलाय, आपण जरा कमी आवाजात बोलू या’ असं सांगून त्याला वास्तवाची जाणीव करून दिली तरी पुरेसं आहे. जेव्हा आपण समोरच्याला म्हणतो की, ‘चिडू नकोस, रागवू नकोस’ याचा अर्थ तो चिडलाय, तो रागवलाय हे त्याला आपण सांगतो तेव्हा त्याच्या संतापात अजून भर पडते. खासकरून मुलांशी, जवळच्या नातेवाइकांशी बोलताना तो कुठे चुकलाय हे दाखवण्यापेक्षा या वेळेला काय आवश्यक आहे… असं माझं मत आहे… हे जेव्हा तुम्ही सांगाल त्या वेळेस आपोआप तुम्ही आणि तो, दोघं भावनिक जगातून वास्तविक जगात यायची शक्यता वाढते.

एखाद्या प्रसंगात नवरा-बायकोची मतं वेगळी पडतात. ऑफिसमध्ये एकमेकांची मतं वेगळी पडतात. त्या वेळेला ‘तुम्ही चुकीचे, तुम्ही असे आहात’ असे म्हणण्यापेक्षा ‘मी या गोष्टीशी सहमत नाही’, असं सांगा. अर्थात तुम्ही डिसअ‍ॅग्री करता म्हणजे तुमचं डिसअ‍ॅग्रीमेंट त्यांना कळवा. ‘मी याला सहमत नाही’ हे सांगून तुम्ही फक्त तुमची असहमती व्यक्त करता.

यामध्ये तुम्ही किती भावनिक प्रगल्भ आहात हे समोरच्याला दिसून येतं. भावनिक प्रगल्भ असलेली माणसं कधीही दुसऱ्यावर दोषारोप करत नाहीत. दुसऱ्यावर टीका करत नाहीत. त्यांना एखादी गोष्ट आवडली नाही तर न चिडचिड करता शांतपणे आपली असहमती व्यक्त करतात. त्यांच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली किंवा त्यांना राग आला, वाईट वाटलं तर ‘मला राग आला, मला वाईट वाटलं’ अशी स्वतःची भावना व्यक्त करतात. कुठलीही गोष्ट मांडताना, ‘तू असंच कर’ यापेक्षा ‘असं माझं मत आहे’ हे सांगतात. भावनिक प्रगल्भ असलेली माणसं समारेच्याला रागवू नको, चिडू नकोस हे सांगण्यापेक्षा ‘शांतपणे बोल’ हे सांगतात. समोरच्याला त्याच्या भावना व्यक्त करायचा अधिकार आहे तसंच मलाही माझ्या भावना व्यक्त करायचा अधिकार आहे हे त्यांना माहीत असतं.

भावना व्यक्त करताना चिडून, ओरडून न सांगता शांतपणे सांगणं हे भावनिक प्रगल्भतेचं लक्षण आहे, हे त्यांना समजतं आणि त्यांच्या वागण्यातून बाकीच्यांनाही समजतं. भावनिक प्रगल्भ असलेली माणसं कधीही भावनिक जगाला प्रतिक्रिया देत नाहीत तर वास्तविक जगात काय घडलं, इकडे लक्ष देतात आणि त्यांची प्रतिक्रिया किंवा त्यांचा प्रतिसाद हा नेहमी वास्तविक जगाला असतो. समोरच्याची भावनिक स्थिती ते नेहमी समजतात आणि त्यानुसार ते प्रतिसाद देतात. सर्वात महत्त्वाचं, भावनिक प्रगल्भ माणसं ही समोरच्याला त्याच्या चुका सांगताना किंवा नकारात्मक भावना सांगताना भावनिक होऊन कधीच सांगत नाहीत. शांतपणे आपल्या भावना मांडतात. परंतु चांगल्या भावना प्रकट करताना मात्र नक्की भावनिक होतात!

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *