वर्चस्ववादी विचारसरणी आणि घरपण

 

घरात काही प्रमाणात असं आहे की नवऱ्याला जे आवडतं तीच गोष्ट किंवा आवड जोपासली जाते व बाकीचे लोक बिचारे होतात अशा आशयाचा मेसेज मला आला. अशी प्रवृत्ती वेगवेगळ्या घरात कधी बायको, आई, वडील, भाऊ यांच्या रुपात दिसून येते. अनेकदा अशा मनमानी पद्धतीने विचार करणारी मंडळी कुटुंबातील सदस्यांना वेठीस धरत असते. त्याचा परिणाम सदस्यांवर होतो. असे का वागतात हे लोक म्हणून गृहिणीने केलेला प्रश्न.

१. स्वभावाचा गैरफायदा- अशा व्यक्तींना आपण महत्त्व दिलेले असते व ते त्याचा वापर चुकीचा करतात.
२. सवय – भावनिक व कौटुंबिक स्थिरता ठेवण्यासाठी आपण त्यांचे ऐकतो व स्वतःला बदलतो. पण या व्यक्ती आपल्या स्वभावाचा गैरफायदा घेतात.
३.  गृहीत धरण्याची मानसिकता – सुरुवातीपासूनचा स्वभाव मीच श्रेष्ठ व सांगेल तेच योग्य अशी धारणा. इतरांना गृहीत धरणे.
४. अस्तित्व – नाही ऐकलं तर चिडचिड व आरडाओरडा करणारी मंडळी स्वतःचं अस्तित्व टिकवून असतात.
५. हटवादी – मला नंतर कुणी विचारणार नाही या भावनेतून वर्चस्ववादी भूमिका घेतात. भूतकाळातील घटनांचा परिणाम असू शकतो.
६. अहंकार – जर कुणी विरोधात गेले तर यांच्या अहं ला धक्का बसतो.
७. पैसा किंवा ताकदीचा विपर्यास.

अशा वर्चस्ववादी व्यक्ती इतरांच्या भावना व अपेक्षांना समजून न घेतल्याने घरातील वातावरण दबावात राहते व सदस्यांवर परिणाम होतात;
१. आत्मविश्वास व स्वतःची भावना कमी होणे.
२. इतर काही नवीन करण्यास अडचण.
३. औदासीन्य, चिंता, निराशा, आत्महत्या सारखे विचार.

अशा व्यक्ती बरोबर कसे राहावं हे एक व्यवस्थापन आहे व प्रयत्न केल्यास चांगलेच..

१. आपली भूमिका योग्य भाषेत व योग्य वेळी त्यांचा अहं न दुखवता स्पष्ट करणे.
२. त्यांच्या म्हणण्यानुसार न वागण्यास असणारी कारणे त्यांना समजतील अशा भाषेत समजून सांगणे. फायदे तोटे कदाचित त्यांना माहीत नसतील.
३. वर्चस्ववादी विचारसरणी ही एक विकृती असू शकते म्हणून त्यांना याबाबत कल्पना देऊन समुपदेशन घेतल्याने समजूतदारपणा यायला वेळ लागत नाही.
४. घरातील सदस्यांनी भांडण करण्याऐवजी एकमेकांची काळजी घेतली तर कलह विकोपास जात नाहीत. स्वतः समुपदेशन आणि मेडीटेशन ने मन शांती शक्य.
५. अशा व्यक्ती समजावून सुद्धा ऐकत नसतील आणि त्यामुळे नुकसान होणार असेल तर त्यांना ठामपणे सांगणे योग्य. त्यासाठी आपले विचार स्पष्ट हवेत.
६. इतर मित्र, परिवार यांच्याकडून मध्यस्ती केल्यास फायदा होतो.
७. शेवटी कायदेशीर सल्ला व पर्याय. एकदम टोकाची भूमिका घेऊन आत्महत्येसारखा विचार करण्यापेक्षा केंव्हाही चांगली.

स्त्री अथवा पुरुष वर्चस्ववादी विचारसरणी ही अनंत काळापासून समाजात दिसून आली आहे, कधी आदराने तर कधी विकृतीने.
आदराने आपण वर्चस्व राखल्यास त्या व्यक्तीला मान सन्मान मिळतो व कौटुंबिक स्वास्थ्य शाबूत राहते. मानसिक कुचंबणा व आजार दूर ठेवण्यास मदत होते. आपण सर्वांनी आपल्या कुटुंबातील आपले वर्चस्व पुन्हा एकदा या चौकटीत राहून शहानिशा करायला हरकत नाही… स्विकृत अथवा विकृत…

©श्रीकांत कुलांगे
9890420209

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *