आपली व्यसनाधीन व्यक्ती

घरात दारू पिण्याची सवय असलेली व्यक्ती असेल तर किती त्रास होतो आणि शेजारी पाजारी कसे टाकून बोलतात म्हणून एका गृहिणींचा फोन होता. नवऱ्याला सोडून जायची इच्छा नव्हती. तिच्याशी जुजबी बोलून अशा व्यक्तींबरोबर कसे राहावे याबाबत चर्चा केली. यासाठी जगभर व्यसमुक्तीसाठी प्रयत्न केले जातात परंतु काही व्यक्ती तयार होत नाहीत किंवा अनेक अडचणी येतात. असं का होतं?

१. त्यांना काही प्रॉब्लेम आहे हे मान्य न करणे.
२. स्वतः मध्ये बदल करायला तयार नसणे.
३. अनामिक भीती, निराशा, चिंता व प्रेरणा नसणे.
४. व्यसनाबाबत चर्चा करायला लाज वाटणे.
५. इतर समस्या पासून दूर पळण्यासाठी किंवा अपयश झाकण्यासाठी व्यसनाधीन होणे. .

व्यसनाधीन व्यक्तींना मूळ प्रवाहात आणणे जलदगतीने कधी होत नाही व त्यासाठी इच्छाशक्ती आणि दृढनिश्चय लागतो. म्हणून अशा व्यक्तींबरोबर राहुन त्यांना ठराविक पद्धतीने मदत करता येते.

१. विश्वास स्थापन करणे. त्यासाठी चीड चीड कमी करणे, लेक्चर देणं, निंदा करणं, हे आपण कमी केल्याने एक विश्वास तयार होण्यास मदत होते.
२. स्वतः मानसिक समुपदेशन घेतल्याने आपण स्वस्थ राहण्यास मदत मिळते.
३. संवाद – आपल्याच माणसाला नीट करायचं ना, मग संवाद चालू ठेवले पाहिजे. सोपं नाही, पण आपण सकारात्मतेने केले तर अशा व्यक्ती हळू हळू बोलक्या होतात.
४. तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले तर पुढील उपचार घ्यायला व्यसनाधीन व्यक्ती तयार होतात.
५. त्यांची निराशा कमी करण्यासाठी त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करू दिल्यास इच्छाशक्ती प्रबळ होते.
६. महत्वाचं म्हणजे त्याच्या पेक्षा तुमच्यात चिकाटी, जिद्द आणि सातत्य हवं. त्यासाठी मेडीटेशन, जप, योगा, व्यायाम यासाठी वेळ काढायला हवा.
७. मन आणि मानसिक शांती त्यांना सुध्दा हवी असते, त्यासाठी वेळेवर लक्ष दिल्यास फरक पडल्याचे शास्त्रज्ञ म्हणतात. कुठल्या वेळेला ते काय करतात, बोलतात, ट्रिगर पॉइंट काय आहेत, याचे नियमित लिखाण करून घेणे.
८. मानसशस्त्रीय समुपदेशक इतर थेरपीचा वापर करतात त्यामुळे व्यसनमुक्ती कडे हळू हळू पावले पडतात.

हे सगळे प्रचंड त्रासदायक आणि वेळखाऊ आहे. परंतू अशा व्यक्तींवर आपले प्रेम सुद्धा तितकेच असते. म्हणून विश्वास वाढवा, त्यांना धमक्या न देता, छळ न करता प्रामाणिकपणे मदत करणे चालू ठेवल्यास अपेक्षेप्रमाणे बदल होताना दिसून येतात.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यसन लागू नये म्हणून लहानपणापासून मुलांना योग्य शिकवण दिली तर या वाटेला ते जाणार नाहीत. सिगारेट, दारू, गुटखा, तंबाखू, जुगार व इतर ड्रग्स पासून आपल्या कुटुंबीयांना दूर ठेवले तर मृत्यु किंवा व्यसने दूर राहतील. त्यासाठी थोरा- मोठ्यांनी आपल्यात बदल करायला तयार हवेत. आहोत का तयार???

©श्रीकांत कुलांगे
९८९०४२०२०९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *