वेळीच अचूक निर्णयाच्या अट्टाहासापायी निर्णयच न घेतल्याने अधिक बिकट प्रसंग उद्भवला, निर्णय साशंक मनाने, घाबरत घेतले जातात, योग्य निर्णय कसे घ्यावेत, याबाबत सतत प्रश्न पडतो असे प्रवीणला नेहमी जाणवते आणि त्यावर त्याला समुपदेशन हवे होते. जवळपास बहुतेकांना हे प्रश्न दैनंदिन आयुष्यात पडतात. शेवटी कुठलातरी निर्णय घेऊन नंतर पस्तावणारे सुध्दा आहेत. का असं होतं?
१. आत्मविश्वासाची कमतरता. कित्येकदा दुसऱ्यावर निर्णय सोपवला जातो.
२. निर्णय घेण्यास मज्जाव असणे. काहीवेळा घरातील मंडळी निर्णय घेऊ देत नाही. त्यामुळे सवय नसणे.
३. अतीलाड.
४. निर्णय घेण्याची चुकीची पद्धत.
५. नकारात्मक मानसिकता.
६. मागील चुकातुन न शिकणे.
७. कल्पना शक्तीचा अभाव.
८. अनेक विचारांचा गोंधळ. चंचल स्वभाव.
आपल्या आयुष्यातील निर्णय अतिशय योग्य प्रकारे फक्त एकच व्यक्ती घेऊ शकते. ती म्हणजे तुम्ही. आपल्या कितीही जवळची व्यक्ती असली तरी प्रत्येक गोष्टीला सदसद्विवेकबुद्धीने योग्यवेळी होकार किंवा नकार देण्याची आणि त्यावर ठाम राहण्याची कला तुम्हाला साध्य झाली ना, की निखळ आनंदाच्या खजिन्याची चावी तुमच्या हाती आलीच म्हणून समजा. कसे निर्णय घ्यावेत?
१. अवलंबून राहणे टाळल्यास चुकीचे का असेना आपण निर्णय घ्यायला लागतो. सुरुवात छोटे-छोटे निर्णय घेण्यापासून करता येईल.
२. पंखांना पसरवू द्या. मुलांना त्यांचे निर्णय घ्यायची शक्ती दिली आणि त्यांना सकारात्मकतेने घेतले तर छान. चुकतील तरी चालेल.
३. योग्य निर्णयाची पद्धत. नेहमी दोन किंवा अधिक पर्याय असू शकतात. ज्यामध्ये फायदा जास्त आणि नुकसान कमी हा पर्याय नेहमी योग्य.
४. अचानक घ्याव्या लागणाऱ्या निर्णयांबाबत मनाची तयारी. सक्षम मन, अनुभव कामास येतो. अशा वेळेस आपण अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेतला तरी चालेल. किंवा त्या क्षणी आपल्याला जे योग्य वाटतं तो निर्णय योग्य असे धरून चालणे.
५. निर्णय चुकल्यास पश्चात्तापाची भावना नको.
६. काळाप्रमाणे निर्णय बदलतात. त्या – त्या परिस्थितीमध्ये घेतलेले त्या – त्या वेळचे निर्णय योग्य असतात.
७. गट – फीलिंगच्या आधारावर घेतलेला निर्णय सुटकेचा नि:श्वास सोडण्यासाठी कारणीभूत ठरतो. यानातून नील आर्मस्ट्राँग आणि एडविन ऑल्ड्रिन दोघेही चंद्रावर गेले. तिथे पोहोचल्यानंतर ‘पाऊल यानाबाहेर टाकू की नको’ अशा विचारात एडविन पडला – क्षणभरच! अन् तेवढ्यात नील आर्मस्ट्राँगनं पाऊल बाहेर टाकलं सुद्धा. अन् तो चंद्रावर पाऊल टाकणारा पहिला मानव ठरला!. गट-फीलिंगनं असा इतिहासही घडू शकतो.
८. आपण जसा विचार करतो तसे घडते. म्हणून मला निर्णय घेताच येत नाही असं आपण स्वतःला बजावत असतो. ते बंद करा. नकारात्मक विचार केला की, कृतीही तशाच घडतात.
९. ‘माझ्यामध्ये निर्णयक्षमता आहे,’ असं पूर्ण आत्मविश्वासानं ठासून स्वत:ला सांगावं. यामुळे निर्णयक्षमता रुजण्याची प्रक्रिया खरोखरच सुरू होईल,
१०. चुकांमधून शिकून पुढे जात राहिल्यास न्यूनगंड दूर राहील. जो शिकतो तो तरतो.
चुकीच्या निर्णयांची काळजी नको – परिपूर्णतेचा किंवा अचूकतेचा आग्रह जरूर असावा, मात्र दुराग्रह अजिबात नको! त्यामुळे विचारपूर्वक घेतलेला निर्णयही एखादेवेळी चुकू शकतो याची जाणीव ठेवा. त्या चुकलेल्या निर्णयातून शिका, आत्मपरीक्षण करा; मात्र काळजी नको!
केवळ ‘निर्णय घेणे’ पुरेसे नाही. ‘योग्य वेळी’ ‘योग्य निर्णय’ घेण्याचे कौशल्य अंगी बाणवले पाहिजे. यशस्वी बनण्याचा निर्णय न घेणं, म्हणजेच अयशस्वी होण्याचा निर्णय घेणं होय.
पसरवू द्या मला पंख माझे,
उडू द्या मला मुक्तपणे,
अडखळत – ठेचकाळत का असेना –
पण शिकेन मी!
माझ्या निर्णयांची सर्वस्वी
जबाबदारीही घेईन मी!
©श्रीकांत कुलांगे
9890420209