तक्रारखोर

 

अमन नेहमी तक्रार करतो अशी त्याची आई सांगत होती. कारणे अनेक पण हा त्याचा स्वभाव बनलाय आणि यामुळे काही प्रॉब्लेम होतील का असा त्यांचा प्रश्न होता. यामध्ये दोघांना त्रास होत असतो, तक्रारदार आणि ऐकणारा. आपल्या सोबत असलेल्या व्यक्तींचा प्रभाव आपल्यावर नेहमी पडत असतो. तक्रारखोर व्यक्ती दोन प्रकारच्या आढळतात -एक हक्कांकरिता लढणारा तर दुसरा उगीचच. उगीचच हा प्रकार जास्त त्रासदायक असतो. या सर्व प्रक्रियेचा परिणाम कळत न कळत आपल्यावर किंवा तक्रारखोरांवर होत असतो:

१. सारखी तक्रार करणाऱ्या व्यक्ती तुम्हाला आजारी पाडू शकतात .

२. आपल्या हार्मोन्सवर दुष्पपरिणाम व्हायला लागतो.

३. मित्र आणि कुटुंबातील व्यक्तींना मानसिक त्रास.

४. निराशा वाढते – आपले कोणी ऐकत नाही असे त्यांना वाटते मग अजून चिडचिड होते.

एका रिसर्चनुसार, एखादी गोष्ट मिळवायची असेल तर तुम्ही प्रयत्न करताना कमीत कमी तक्रारी करायला हव्यात. सर्वसाधारण व्यक्ती दिवसातून १५ -३० वेळा तक्रार करते. जेंव्हा कोणी नेहमी तक्रार करतात, त्यांना कसे तोंड द्यायचे :

१. त्यांची तक्रार ऐकणे – कुणीतरी ऐकतेय हे पाहून त्यांचा चिडचिडेपणा कमी होण्यास मदत होते.

२. कशासाठी – विषय काय ते पहा. आपल्याशी निगडित असेल तर त्यावर ऍक्ट करू शकता. नसेल तर तक्रार निवारण करण्याची दुसरी पद्धत असेल तर ती पहा.

३. जास्त वेळ न देता थोडक्यात विषय संपवणे चांगले. लक्ष्मणरेखा ठरवून घेणे.

४. आपण सहमत नसाल तर प्रेमाने सांगा. राग येईल म्हणून सहमती नको.

५. त्यांना सांगा अशा गोष्टी आयुष्यात होत राहणार पण त्या ठीक होतील.

६. त्यांची तक्रार त्यांच्या समोर इतरांकडे करू नका.

तक्रार करण्याऐवजी ठरवायचे कि मी जास्त तक्रार करतोय आणि ती कमी करायला पाहिजे. काय करावं ? :

१. आपल्या विचारांना आवरणे. जबाबदारी स्वीकारणे.
२. प्रत्येकवेळी तक्रार करण्याऐवजी विचार करा कि काय साध्य होईल? खरच तक्रार आवश्यक आहे का?
३. योग, प्राणायाम, मेडिटेशन, व्यायाम यामुळे भावनिक स्थैर्य लाभते.
4. आयुष्यात जे भेटले त्यात समाधान मानून पुढे चालणे आयुष्यात ध्येयप्राप्तीसाठी प्रेरणा महत्वाची असते.
५. उगीच इतरांचे मूल्यमापन करू नये. उणीव सगळ्यांत असतात.
६. स्वतःचे परिक्षण – जर हा त्रास कमी होत नसेल तर समुपदेशन घ्या.
७. तक्रार करण्याची पद्धत शिकून घेणे. ई-मेल, फोन, फीडबॅक, वकिलांद्वारे, तक्रार पेटी अशा अनेक सुविधा असतील तर प्रश्न तिथेच संपवा. उगीच सोशिअल मीडियावर किंवा घरच्यांवर आगपाखड करून मनःशांती भंग करण्याचा उद्देश बालिश असतो.

“The No Complaining Rule” हे जाॅन गॉर्डन यांचे पुस्तक मध्ये वाचण्यात आलं होतं. त्यात असं म्हटलंय की तक्रारींमुळे होणारा त्रास हा सिगरेट ओढल्यानं होणाऱ्या त्रासासारखा आहे.संशोधकांच्या म्हणण्याप्रमाणे सारखी तक्रार करणारा व्यक्ती हा चेन स्मोकरसारखा असतो.
नक्की काय हवे आयुष्यात ?- तर सुखी व आनंदी जीवन. सकारात्मक मानसिकता ठेवल्यास तक्रारी कमी होतील.

@श्रीकांत कुलांगे
९८९०४२०२०९
( हा ब्लॉग लेखकाच्या नावासह शेअर करायला हरकत नाही.)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *