व्यक्तिमत्वाची समतोलता.

व्यक्तिमत्व समतोल कसे ठेवायचे किंवा व्यक्तिमत्व कसे असावे असा प्रश्न मानस ने विचारला होता. त्याला स्वतःच्या अस्तित्वाला समतोल व्यक्तिमत्वाची झालर लावायची होती. आनंदाने त्याला काही गोष्टींबाबत चर्चा करून ठराविक मुद्दे पटवून दिले. 

समतोल व्यक्तिमत्त्वाच्या माणसांनी स्वतःचा आणि स्वतःच्या परिस्थितीचा – एकंदर जीवनाचा आणि इतरांचा – समाजाचा स्वीकार निरोगीपणानं केलेला असतो. आरोग्यदायक सवयी अशा व्यक्तींनी स्वतःला आरोग्यदायक सवयी लावून घेतलेल्या असतात. आहार, झोप, विश्रांती, वैयक्तिक व इतर स्वच्छता या बाबतीतील चांगल्या सवयींमुळं निरोगी जीवनाचा आनंद ते लुटू शकतात. निरोगी मन आणि शरीर याचा उपयोग कर्तृत्व-कर्तव्य इत्यादींसाठी करू शकतात.

मग त्यांचे अजुन कुठले गुण वैशिट्ये असतात?

१. आत्मस्वीकार: स्वतःच्या इच्छा-आकांक्षा, हेतू, उद्दिष्ट याबाबत अशा व्यक्तींना पूर्ण भान असतं. आपल्या व्यक्तिमत्त्वातील सबलता आणि दुर्बलता त्यांना माहीत असते.

२. योजनाबद्धता: अशा व्यक्तींना भोवतालच्या परिस्थितीची स्पष्ट जाणीव असते. परिस्थितीतील अनुकूलता आणि प्रतिकूलता त्यांना ओळखता येते. स्वतःच्या भविष्याबाबत ते योजना जरूर आखतात; परंतु त्यांना भविष्याची भीती वाटत नाही.

३. आत्मविश्वास: स्वतःची लायकी ते ओळखू शकतात. आपण समाजातील लायक आणि उपयुक्त घटक आहोत असं ते समजतात. आत्मविश्वास, आत्माभिमान, सुरक्षितपणा, सहनशीलता इत्यादी गुण त्यांच्या ठिकाणी दिसून येतात.

४. प्रयत्नशीलता: यशस्वी होण्याची पात्रता आपल्या अंगी आहे, असा विश्वास या व्यक्तींना असतो. दैनंदिन आयुष्यातील समस्या ते आत्मविश्वासानं, सहजतेनं आणि परिणामकारकरीत्या सोडवतात.

५. वास्तवतेचा सहज स्वीकार: कल्पनेच्या किंवा मनोराज्याच्या जगात न जगता काही लोक वास्तवतेचा सहज स्वीकार करू शकतात. प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचा योजनाबद्ध प्रयत्न करतात.

६. सहनशक्ती: दैनंदिन जीवनातील अपयश, निराशा, वैफल्य हे जीवनाचा एक भाग समजून त्या बाबत सहनशक्ती दाखवतात व शांतपणे समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात.

७. भावनिक परिपक्वता: अशा व्यक्ती भावनिकदृष्ट्या परिपक्व असतात. राग, लोभ, द्वेष, मत्सर, चिंता, ताण इत्यादी भावनांना आवश्यक तेव्हा आवर घालू शकतात.

८. स्वतःबाबत विनोदबुद्धी: अशा व्यक्तींना बऱ्यापैकी विनोदबुद्धी असते. स्वतःच्या चुका, व्यंग इत्यादी गोष्टींवर निराश न होता ते स्वतःही हसू शकतात. त्याचा हसतमुखानं स्वीकार करू शकतात.

९. प्रामाणिकपणा, न्यायबुद्धी इत्यादी: अशा व्यक्ती काही मूलभूत सद्गुण उदा. प्रामाणिकपणा, दयाळूपणा, न्यायबुद्धी इत्यादी बाळगून असतात.

१०. सदसद्‌विवेकबुद्धी: अशा व्यक्ती योग्य/अयोग्य, चूक/बरोबर, चांगलं/वाईट यातला फरक ओळखू शकतात आणि नैतिकदृष्ट्या योग्य तेच करतात; निदान तशी त्यांची इच्छा असते.

११. इतरांच्या हक्कांची जाणीव; अशा व्यक्ती इतरांच्या गरजा ओळखतात. आपल्याप्रमाणंच इतरांच्याही हक्काची जाणीव त्यांना असते. स्वार्थासाठी इतरांच्या सुखावर, हक्कांवर ते अतिक्रमण करत नाहीत.

१२. स्थिर मनोवृत्ती : अशा माणसाची मनोवृत्ती स्थिर असते. आपण त्यांच्यावर विश्वास टाकू शकतो. एखाद्या प्रसंगात अशी माणसं योग्य प्रकारेच वागतील अशी खात्री देऊ शकतो.

१३. प्रेम जिव्हाळा: यांची देवाणघेवाण समतोल व परिपूर्ण व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्तींचे कुटुंबातील व्यक्तींबरोबर, सहकारी, मित्र यांच्याबरोबर प्रेमाचे, आपुलकीचे, जिव्हाळ्याचे संबंध असतात. त्यांची मैत्री टिकाऊ असते. हे संबंध क्षुल्लक कारणावरून बिघडत नाहीत.

१४. ‘इतरांना आपण हवेहवेसे वाटतो’ ही भावना: इतरांचंही आपल्यावर प्रेम आहे, त्यांनाही आपण हवेहवेसे वाटतो ही भावना, असा विश्वास परिपूर्ण व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्ती बाळगून असतात कारण त्या स्वतःही इतरांना प्रेम देतात व इतरांच्या प्रेमाला स्वतःला लायक समजतात.

१५. आसपासच्या व्यक्तींशी मित्रत्व : अशा माणसाचे सहकाऱ्यांशी, मित्रांशी, नातेवाइकांशी, शेजाऱ्यांशी व एकंदरीत संबंधित व्यक्तींशी मित्रत्वाचे व निरोगी संबंध असतात.

 

एवढं सगळं सांगून झाल्यावर मानसला चक्कर येणे बाकी होते. हसून त्याला सांगितलं की हे सर्व शक्य आहे आणि रोजच्या वागण्यात हे आपल्याला जाणवत असते किंवा पाळाव लागतं.

परिपूर्ण व समतोल व्यक्तिमत्त्वाची ही वैशिष्ट्यं स्वतःशी, आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्त्वाशी ताडून पाहा बरं. कुठं काही चुकत असलं तर वेळेवर लक्षात येईल, नाही का?

 

©श्रीकांत कुलांगे

9890420209

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *