अवास्तव अट्टाहास

शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस किंवा घरचा अभ्यास असो एक कम्पलेन प्रामुख्याने ऐकायला भेटते ती म्हणजे “मुलामध्ये प्रगती नाही आणि हवं तसं यश नाही”. ही डोकेदुखी तर सर्व शिक्षकांना, पालकांना आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात जो तो आपापल्या क्षेत्रात पुढे जायला, अग्रेसर व्हायला धडपडतो आहे. यश हाती लागलं नाही, तर काहीजण कमालीचे नाराज आणि नाउमेद होतात. प्रयत्नांवरचा त्यांचा विश्वास उडतो, जणू काही जिवंत राहण्यासाठी यश अत्यावश्यक आहे. असे अनेक क्लायंट या काळात समोर आले. ‘जिद्द’ या नावाखाली त्या विचाराचे समर्थन करणारे अनेक दिसतील. धडपडणारे असंख्य; पण शिखरावर मोजकीच, त्यामुळे त्या सार्‍यांनाच यशोशिखरावर पोहोचणे केवळ अशक्य आहे. अयशस्वी ठरणार्‍यांपैकी काहींना त्यांच्या अयोग्य विचारसरणी आणि वृत्ती यामुळे वेगवेगळ्या भावना-विकारांचे शिकार व्हावे लागते.

कर्तृत्वावर भर देणाऱ्या हल्लीच्या समाजात या धारणेचे प्राबल्य स्त्रियांच्या तुलनेने पुरुषांमध्ये अधिक दिसून येते. या मुळे ज्या कामाला मी हात लावीन त्यात मला यश मिळालेच पाहिजे, त्याची खात्री नसेल तर एखादे कारण पुढे करून ते काम टाळलेलेच बरे आणि अयशस्वी झाल्यास आपण अपात्र ठरू ही भीती आणि समाज काय म्हणेल हा गैरसमज. अशा प्रकारे स्वत:ला कमी लेखण्याचा हा प्रकार अपयश येईल या विचाराने व्यक्तीला चिंताग्रस्त करतो. अपयश प्रत्यक्ष अनुभवल्यावर आपल्याला डिप्रेशन किंवा विषण्णता आणतो. यश न मिळण्याचे अनेक कारणे आहेत.

अपयश ही यशाची पहिली पायरी खरं तर अपयशाकडे स्वत:ला सुधारण्याच्या प्रक्रियेतील वा प्रगतीच्या मार्गातील महत्त्वाचा टप्पा किंवा संधी म्हणून पहायला हवे. प्रसंगी त्याचे स्वागत केले पाहिजे. आलेल्या अपयशाचे विश्लेषण करून त्याची कारणे शोधलीत तर आपण कुठे कमी पडलो, कुठे चुकलो, कामाच्या पद्धतीत बदल करण्याची गरज आहे काय, आपल्या चिंता आणि ताण अपयशाकरिता अंशत: कारणीभूत आहेत का, हे उमगू शकेल. अपयशाच्या विश्लेषणातून झालेल्या ज्ञानाचा उपयोग करून नंतरच्या प्रयत्नात आपण आधी झालेल्या चुका टाळू शकतो आणि यशाची शक्यता वाढवू शकतो. काही वास्तव समोर आहेत:

१. प्रत्येक व्यक्ती ठराविक क्षमता, बुद्धी घेऊन जन्माला आलेली असते.

२. शिक्षण, अनुभव, संस्कार यांच्याद्वारा त्या क्षमतांचा विकास होत असतो. त्या प्रगल्भ आणि आविष्कारक्षम होत असतात.

३. सोबतच व्यक्ती तिला आवडलेल्या क्षेत्रात काही कौशल्ये संपादन करीत असते.

४. खरा प्रश्न असतो की, व्यक्ती तिच्या क्षमता, कौशल्ये आणि अनुभव यांना स्वत:ला सफल व सुखी बनविण्याकरिता पुरेपूर उपयोगात आणते आहे किंवा नाही. जे त्यात कमी पडतात त्यांना लोकार्थाने अयशस्वी मानले जाते. ज्यांना ते चांगल्या प्रकारे जमते त्यांना आपण यशस्वी समजतो.

५. स्पर्धेत सोबत असलेल्यांची कामगिरी सारखी असावी हा यशस्वी होण्याचा अर्थ नाही.

६. क्षमता, कौशल्ये, वृत्ती, मानसिकता याबाबतीत व्यक्तिपरत्वे भिन्नता आहे. तशीच व्यक्तिभिन्नता कर्तृत्वाबाबतही आढळणार.

७. क्षमता आणि प्रगतीच्या संधीचा पुरेपूर लाभ जे घेऊ शकत नाहीत आणि स्वत:ला अपयशी समजतात त्यातील काहीजण परिस्थिती, भोवतालच्या व्यक्ती यांना आपल्या अपयशाकरिता जबाबदार धरतात आणि दोष द्यायला काहीच सापडले नाही, तर शेवटी आपल्या नशिबाला अपयशाचे कारण मानतात. अशी धारणा करून घेतलेल्या व्यक्तींना जीवनात पुढे जाण्याची आशा फारच कमी असते; कारण परिस्थिती, लोक, नशीब केवळ त्यांच्याकरिता त्यांना हवे तसे बदलतील याची शक्यता जवळजवळ नाहीच.

८. त्यापेक्षा क्षमता, बुद्धी यांना कठोर परिश्रम, निर्धार आणि ध्येयाशी बांधिलकी यांची जोड मिळाली, तर मग यशाच्या भरारीला आकाश हीच मर्यादा असते.

अर्थात, व्यक्तीनं यशाची जिद्द सोडून दिली तर जगण्याला काय अर्थ उरेल? काम उत्कृष्ट झालेच पाहिजे हा अट्टाहास एकतर अवास्तव आहे. शिवाय यश ही काही मानवाकरिता ऑक्सीजन सारखं जिवंत राहण्यास आवश्यक अशी बाब नाही. दुसरं असं की,

१. यश-अपयश हे व्यक्तींच्या विशिष्ट परिस्थितीतील कामगिरीचं इतरांकडून किंवा स्वत:कडून होणारं मूल्यमापनाद्वारे ठरविलं जातं. एकतर स्वत:कडून किंवा इतरांकडून होणारं मूल्यमापन वस्तुनिष्ठ असेलच असं नाही. पक्षपात, पूर्वग्रह, व्यक्तिगत आवडीनिवडी, अहंगंड अशा अनेक घटकांनी ते प्रभावित होऊ शकतं.

२. कामगिरीचं मूल्यमापन आपल्याला हवं तसंच असावं ही अपेक्षाही चूक आहे आणि त्याची खात्रीही देता येत नाही. या दोन्हींपैकी कुठल्याही निर्णयप्रक्रियेवर आपलं मुळीच नियंत्रण नसतं. अशा परिस्थितीत, यश मिळालंच पाहिजे, जिंकायलाच हवं हा अट्टाहास अवास्तव तर असेलच; पण त्याशिवाय वास्तवाचं भान नसल्याचं सिध्द होते.

३. विद्यार्थी हुशार आहे, कसून अभ्यास केला आहे म्हणून त्याला अपेक्षेप्रमाणे यश मिळेलच याची खात्री नाही; कारण पेपरमध्ये कोणते प्रश्न येतात, ते समजण्यास सोपे की कठीण, तयारी केलेल्या भागावर प्रश्न विचारले आहेत का, परीक्षक कोणत्या मूडमध्ये उत्तरपत्रिका तपासणार इत्यादी विद्यार्थ्यांच्या नियंत्रणाबाहेरील घटकांवर ते अवलंबून असते. त्यामुळे यशाची हमी किंवा गॅरंटी मागणे ना विवेकपूर्ण ना वास्तवतेला धरून आहे.

इथे एवढेच म्हणणे योग्य होईल की, काम करीत राहणे महत्त्वाचे. हाती घेतलेले काम चांगलेच झाले पाहिजे असा अट्टाहास बुद्धीला पटणारा नाही. काम करताना झालेल्या चुकांची जबाबदारी स्वत:कडे घेणे, एका अपयशाच्या आधारे स्वत:चे अपयशी असे मूल्यमापन न करणे एवढेच व्यक्ती करू शकते.

विशिष्ट प्रसंगातील तुमच्या कामगिरीचे मूल्यमापन अवश्य करा; पण त्याआधारे स्वत:ला यशस्वी किंवा अयशस्वी असे लेबल लावू नये.

परीक्षेत मिळणाऱ्या गुणांवर गुणवत्ता आणि अभ्यास सोडून इतर कितीतरी घटकांचा परिणाम होत असतो हे वेगळे सांगण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांनी ताण-तणाव, भीती आणि चिंता यांच्या दडपणाखाली दिलेल्या परीक्षेत पेपर्स चांगले जाण्याची शक्यता कमी असते.  घरातील महत्त्वपूर्ण व्यक्तींनी विद्यार्थ्यांवर आपल्या मागण्या लादून त्यांना तणावग्रस्त आणि चिंतातुर करण्याचे टाळणे चांगले. बिकट होत चाललेली स्पर्धात्मक परिस्थिती हे आजच्या जगातील अटळ आव्हान आहे. त्यात आपल्या यशापयशाकरिता परिस्थितीला दोष देण्याऐवजी तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन रास्त, वास्तव, निरोगी, निकोप आणि अर्थपूर्ण करण्यावर भर दिला तर आपल्या प्रगतीची शक्यता वाढेल. क्षमता, कुशलता वापरून परिस्थिती सोयीची करण्याचा प्रयत्न जरूर करावा; पण ती बदललीच पाहिजे हा अट्टाहास धरू नये. इतर पर्यायी मार्ग उपलब्ध असतातच की. अविवेकी धारणा सोडून योग्य धारणा स्वीकारल्यास यशाचा मार्ग सोपा होईल.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *