भावनिक आधार

अनेकांच्या डोक्यात पायाभूत गोष्टींची पायाभरणी नसते. पालक आपल्या पाल्यांना सगळं टॉप क्लास देतात परंतु भावनांक वाढवायची तसदी घेत नाहीत. नुसती अभ्यासातली बुद्धी किंवा शैक्षणिक पात्रता व्यवहारी जीवनात यशस्वी होण्यासाठी पुरेशी नसते हे त्यांना ठावूक नसतं.

तिथे यशस्वी होण्यासाठीचे आणखी काही निराळे निकष असतात. भावनिकदृष्ट्या व्यक्ती कार्यक्षम व परिपक्व असणं तसंच स्वत:च्या व दुसऱ्यांच्या भावनांची योग्य तऱ्हेने हाताळणी करण्यात तरबेज असणं महत्त्वाचं असतं. थोडक्यात, बौद्धिक गुणांकापेक्षा भावनिक गुणांक तुमच्या आयुष्यावर यशाची मोहर उठवण्याच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा ठरतो. मग कुठले घटक आपल्या बुध्दीवर परिणाम करतात?
१. आनुवंशिकता.
२. सभोवतालचं सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण.
३. घरातील आणि स्व संस्कार,
४. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य,
५. आपल्या सवयी,
६. स्वतःची जाणीव.
७. योग्य गुरू.

हे सर्व घटक अनुकूल असतील तरच बुद्धीचा विकास योग्य पद्धतीने होतो. पण जी व्यक्ती भावनिकदृष्ट्या हुशार आहे तिलाच या बुद्धीचा उपयोग करून घेता येईल.
भावनिक हुशारी नसलेल्या व्यक्तीला बुद्धी असली तरी तिचा योग्यप्रकारे उपयोग करून घेता येणार नाही. दैनंदिन जीवनात क्षणोक्षणी भावनिक हुशारी आवश्यक ठरते. ती नसेल तर,
१. लहानसहान निर्णय घेणं जमत नाही,
२. घेतले तरी चुकीचे ठरण्याची शक्यता असते.
३. आत्मविश्वासाचं खच्चीकरण होऊन व्यक्ती निराश होते.
४. मनात न्यूनगंड निर्माण होतो.
५. काहीच मनासारखं घडत नाही असं वाटून वैफल्यग्रस्तता येते.
६. शिक्षणाची कुठली शाखा निवडावी, कोणत्या प्रकारची नोकरी निवडावी, जोडीदार कसा असावा अशासारखे निर्णय भावनिक हुशारी नसल्याने चुकू शकतात.
७. स्वत:ला आणि इतरांना समजून घेण्यातील असमर्थता.
८. एकाग्रता, संयम, शांत वृत्ती यांची कमी होते. चिडचिड, त्रागा सुरू होणे.
९. अभ्यासात बाधा येणे.
स्वत:च्या भावनांची जाण म्हणजे स्व-जाणीव असणं हा घटक महत्त्वाचा आहे. आपल्या भावभावना नेमकेपणाने ज्यांना कळतात, त्यांना अनेक फायदे होतात.
१. भावनिक पातळीवरचे सूक्ष्म तरंगही ज्यांना जाणवतात ते आपली जीवननौका योग्य समतोल राखत व्यवस्थित हाकू शकतात.
२. आपल्या भावनांची जाण असेल तर त्यांचं नियोजनही करता येईल. म्हणजे लहानशा गोष्टीसाठी टोकाचं नैराश्य येणार नाही. राग, संताप, चीड आदींचा रौद्रस्वरूप धारण करून वेड्यावाकड्या मार्गाने उद्रेक होणार नाही.
३. चिंता करून प्रश्न सुटत नसतात याचं भान येऊन ते सोडवण्यासाठी प्रत्यक्ष काय करता येईल याचा विचार होईल.
४. योग्य कारणासाठी योग्य प्रमाणात भावना उत्पन्न होतील. हानिकारक भावना कमीत कमी उत्पन्न होतील.

थोड्याशा अपयशाने जर व्यक्ती निराश होत असेल तर ती प्रयत्न सोडून देण्याची शक्यता जास्त असते. मात्र अपयशाचा शोध घेऊन, झालेल्या चुका दुरुस्त करून, निराशा झटकून टाकून पुन्हा नव्या जोमाने जे प्रयत्न करायला तयार असतात ते निश्चित आपलं ध्येय गाठू शकतात. हे सर्व भावनिक हुशारीच्या बळावर जमू शकतं. ‘स्व’च्या संदर्भात भावनांची जाण असणं, भावनांचं नियोजन करून स्वत:ला चांगल्या गोष्टींसाठी प्रेरित करणं हे जसं महत्त्वाचं असतं, तसंच स्वत:पलीकडे जाऊन दुसऱ्यांच्या भावना समजून घेणं आणि तसं दुसऱ्यांपर्यंत पोचवता येणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं. ‘तुमच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत’ या वाक्यातून आपण सहानुभूती व्यक्त करतो, तर परानुभूती म्हणजेच दुसऱ्याला नेमकं काय वाटतंय ते त्या व्यक्तीचा दृष्टिकोन लक्षात घेऊन समजून घेणं, तिची मानसिकता लक्षात घेऊन वागणं होय.
ज्यांना असं दुसऱ्याच्या मनात शिरणं जमतं ते कठीण परिस्थितीतही समारेच्याला व्यवस्थित हाताळू शकतात. परानुभूती (empathy) भावनिक बुद्धिमत्तेचं महत्त्वाचं अंग आहे. जिथे जिथे दुसऱ्या व्यक्ती किंवा व्यक्तींशी संबंध येतो तिथे परानुभूतीचा अवलंब केल्यास नाजूक परिस्थितीही कौशल्याने हाताळता येते. नेमक्या याच गोष्टीचं महत्त्व लक्षात घेऊन अलीकडच्या काळात औद्योगिक क्षेत्रात भावनिक हुशारीचं महत्व, तिची मान्यता वाढते आहे. ही हुशारी अंगी बाणवल्यास कार्यालयीन नातेसंबंध अगदी थेट वरपासून खालपर्यंत सलोख्याचे राहू शकतात. परस्परांबरोबर काम करताना अडचणीचं वाटत नाही किंवा बॉसच्या मागे ‘खडूस’ ही उपाधी जोडण्याची आवश्यकता उरत नाही. व्यक्तिगत कार्यक्षमता आणि सामाजिक कार्यक्षमता वाढवण्यासाठी भावनिक बुद्धिमत्तेला पर्याय नाही, हे खरं आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *