आयुष्यात काही माणसं विचित्र स्वभावाची भेटतात. त्याचे काम करून घेण्यासाठी वाटेल ते करणार मग त्यामध्ये हुकमी एक्का असतो तो म्हणजे भावनिकतेला साद घालून आपला स्वार्थ साधायचा. याच बाबत एक केस मागील आठवड्यात आली होती आणि त्या व्यक्तीला या भावनिक ब्लॅकमेलिंग ला कसे तोंड द्यायचे तेच समजत नव्हते.
भावनिक ब्लॅकमेलिंग वेगवेगळ्या मार्गाने केली जाते आणि असे मानसिक त्रास देणारे कित्येकदा आपलेच असतात. त्यामध्ये, मुलं, जोडीदार, आई-वडील, सासू सासरे, भाऊ, काका मामा, शेजारी, मित्र, गुंड प्रवृत्तीचे लोक, ऑफिस मधील अधिकारी आणि कामगार इत्यादी. सर्वात प्रथम हे पाहावे लागेल कुणाला जास्त ब्लॅकमेल केले जाते किंवा काय लक्षणे ज्यांना पटकन ब्लॅकमेल केले जाते? खालील प्रश्न स्वतः ला विचारा.
१. तुम्ही खूप वेळा दिलगीरी व्यक्त करता का? प्रत्येकवेळी माझीच चूक आहे असे जोडीदार बोलतो म्हणून माफी मागता का?
२. आपण आपल्या जोडीदाराच्या क्रियांची जबाबदारी घेत आहात? म्हणजे एखादी गोष्ट चुकली तर तुम्हाला त्यामध्ये तुमची चूक आहे असे वाटते आणि म्हणून तुम्ही ती जबाबदारी घेता?
३. केवळ तुम्हीच आहात जो नात्यात हार पत्करतो किंवा त्याग करतो?
४. आपल्या जोडीदारामुळे बऱ्याचदा घाबरून जात का? त्यांचे म्हणणे पाळणे किंवा सक्तीने त्याचे पालन करण्याची धमकीवजा भीती तुम्हाला वाटते का?
५. आपण फक्त आपल्या जोडीदारास आनंदित करण्यासाठी आपल्या जीवनात बदल करता?
६. स्वत: साठी (हक्कासाठी) उभे राहणे आपल्याला कठीण आहे? किंवा तुम्हाला असे जाणवत कि आपण खूप नाजूक संबंधांमधून जात आहोत आणि आपल्याला त्रास देणार्या गोष्टींबद्दल बोलू शकत नाही?
७. आपणास आपल्या नात्यात सीमा निश्चित करणे किंवा आपल्या जोडीदारास “नाही” असे बोलणे अशक्य आहे?
८. आपल्या जोडीदाराशी संवाद साधणे आपल्याला खूप अवघड आहे? आणि असे केल्यास आपण खरोखर काय म्हणत आहात हे तो / ती ऐकणार नाही?
जर आपण यापैकी कोणत्याही प्रश्नास “होय” म्हटले तर कदाचित आपणास भावनिक ब्लॅकमेल केले जाईल. प्रश्न कुटुंबाच्या सौख्याचा असतो म्हणून बरेच जण तडजोड करण्याचा प्रयत्न करतात. पण हीच तडजोड, जर एखाद्याची कमजोरी झाली तर मात्र आयुष्यभर भोग भोगावे लागतात.
ब्लॅकमेल करणाऱ्यांची सुद्धा एक विशिष्ट वागणूक असते. जसे कि;
१. इतरांचे न ऐकणे व मीच खरं असा विचार. मानसिक हार. मी व माझे हेच विश्व.
२. कोणतीही जबाबदारी घेणे टाळणे.
३. इतरांवर हक्क गाजवणे.
४. वरवर दिलगिरी व्यक्त करणे.
५. हवे ते मिळविण्यासाठी भीती, कर्तव्य, धमकी आणि दोषीपणाचा वापर करने.
६. तडजोड करण्यास तयार नसतात.
७. आपल्या गरजा बद्दल त्यांना जास्त घेणेदेणे नसणे.
८. जोपर्यंत त्यांना पाहिजे ते करीत नाही तोपर्यंत तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करणार.
९. प्रेम मिळवण्यासाठी कुठल्याही थरावर जाण्याची वृत्ती.
१०. न केलेल्या चुकांसाठी हकनाक आरोप करणे.
११. तुमचे किंवा स्वतःचे नुकसान करण्याची धमकी देणे.
१२. प्रलोभन दाखविण्याची क्षमता.
१३. भावनिकदृष्ट्या अपरिपक्व.
१४. हार त्यांना मान्य करायला अवघड जाते. त्यासाठी ते स्वतःला हानी करून घेतात, किंवा इतरांना करतात.
ज्यांना ब्लॅकमेल केले जाते त्या व्यक्ती सुद्धा ठराविक मानसिकतेच्या असतात. काही प्रकार यामधील:
१. लोकांचा विचार करणारी, प्रत्येक गोष्टीला विचारून करण्याची सवय.
२. इतरांप्रती अत्यंत करुणा आणि सहानुभूती.
३. स्वतःवर दोष घेण्याची प्रवृत्ती
४. इतरांबद्दल दया वाटण्याची प्रवृत्ती
५. संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करणारी.
६. शांतता राखण्याच्या सवयी.
७. जबाबदारीची तीव्र जाणीव आणि “योग्य गोष्ट” करणे हे ध्येय.
८. आपला कुणी त्याग करण्याची भीती.
९. गोष्टी वैयक्तिक घेण्याचा कल. संवेदनशीलता.
१०. कुणी रागावणार तर नाही ना हि भीती.
११. स्वत:च्या कार्यावर शंका, कमी आत्मविश्वास.
भावनिक ब्लॅकमेलचा ताण हा पीडित व्यक्तीवर भावनिक आणि शारीरिक दृष्ट्या पडतो. हीच गोष्ट पीडित व्यक्तीच्या स्वाभिमाना बरोबरच त्यांच्या कार्यावर, आत्मनिर्भरतेवर, मनावर, बुद्धीबरोबर तडजोड करते. मानसिक छळाचे हे एक कारण मानले जाते. चिंता आणि नैराश्य मुळे अशा व्यक्ती एकाकी राहणे पसंत करतात, समाजात मिसळत नाहीत, त्यांचे मत प्रदर्शन करायला घाबरतात.
ब्लॅकमेलर, त्यांच्या मागण्या पूर्ण करून करून घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या लढवत असतात. प्रलोभने दाखवून किंवा धमक्या देऊन आपले म्हणणे शक्यतो ते मान्य करून घेतात.
ब्लॅकमेलर पासून सुटका करून घेण्यासाठी जगभरात वेगवेगळ्या गोष्टी केल्या गेल्या. त्यापैकी काही स्वतः मधील बदल करणे, समोरील व्यक्ती जर घरातील असेल तर समुपदेशन करून घेतले जाते. काही ठिकाणी पोलिसांची मदत तर, काही ठिकाणी सामाजिक बंधने घातली जातात. या ब्लॉग मध्ये मी सर्व गोष्टी नाही नमूद करू शकणार पण सर्वसाधारण खालील गोष्टी केल्यास बऱ्याच वेळा ब्लॅकमेलर ला तोंड देण्यासाठी मदत मिळू शकते.
१. स्वतः मधील विद्वत्ता ओळखून प्रामाणिकपणे वेळेवर व्यवस्थित बोललेले बरे. डिमांड कशा प्रकारची आहे त्याचा विचार करून प्रतिसाद ठरविणे.
२. समोरील व्यक्ती अशा डिमांड का करतो, त्याची मानसिकता कशी, त्याचे वागणे का बदलते, यांचा थोडाफार अभ्यास करून त्या व्यक्तीला मानसोपचार तज्ज्ञाकडे न्यायचे का? असा विचार वेळेवर करायला हवा.
३. तुम्ही धोकादायक परिस्थिती मध्ये आहात का? हि परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर, योग्य ठिकाणी याबाबत वाच्यता करणे गरजेचे.
४. जवळील व्यक्ती असेल तर, लोक काय म्हणतील या भीतीपोटी आपण गप्प राहतो. परंतु, त्याच बरोबर, आपली सहनशक्ती कुठपर्यन्त ताणायची याबाबत लक्ष्मण रेखा बनवणे आवश्यक. स्वतः आणि त्या व्यक्तीला समुपदेशन, योगाभ्यास, धार्मिक कार्यक्रम, समजुतीने घेऊन वास्तविक मागण्या मान्य किंवा अमान्य करू शकतो का ते पाहणे.
५. अशी वेळ आल्यास कुणाबरोबर संपर्क करायचा त्याची माहिती घेणे. स्वतःचा बचाव आपण रेकॉर्डिंग करून, व्हिडिओच्या मार्फत किंवा फोटोच्या माध्यमातून जतन करून ठेवा. पुढे पोलिसांना, कोर्टाला द्यायला कमी येतात.
६. आजकाल सोसिअल मीडिया लाईव्ह ब्रॉडकास्ट करते, त्याचा हि उपयोग काही पीडित करून घेताना दिसतात.
७. स्वतःचा बचाव कसा करायचा, आत्मविश्वास कसा वाढवायचा याबाबत प्रयत्न करायला हरकत नाही.
८. योग्य ठिकाणी आपला बचाव करणे – त्यासाठी आपले व्यक्तिमत्व कसे आहे व त्यावर उपचार करून तुम्ही विकसित होऊ शकता.
९. सुरुवाती पासून अशा लोकांची लक्षणे ओळखायला हवीत. वेळ गेल्यावर अश्रू ढाळण्यात अर्थ नाही.
१०. आहे त्या परिस्थितीला मान्य करणे आणि स्वतःला मानसिक त्रासापासून वाचविणे.
११. काहीच पर्याय काम करत नसेल तर सोडचिट्ठी घेऊन अलिप्त राहणे.
१२. स्वतः मध्ये सकारात्मक बदल करणे. चांगल्या लोकांच्या सहवासात जेव्हढे होईल तेव्हढे राहणे. आर्ट ऑफ लिविंग, जिम, योग, वेळोवेळी समुपदेशन, अभ्यास, वाचन, इत्यादी गोष्टी मदत करतील.
वरील पर्याय हे परिपूर्ण नसावीत परंतु प्रत्येकाला काय करावे हे सुचण्यास योग्य आहेत. प्रत्येकाला आपला अभिमान असतो आणि त्याला तेवढा मान पण मिळायला हवा. म्हणून, परमार्थात सांगितल्या प्रमाणे, योग्य वेळी बोलणे, कार्य करणे, दंडित करणे, समजावून घेणे किंवा सांगणे हि रीत आहे. जर ब्लॅकमेलर घरातील असेल तर तोंड देता देता नाकी नऊ येतात – आपलेच दात आपलेच ओठ म्हणून शांत बसण्यापेक्ष वेगवेगळे पर्याय शोधून त्याबाबत सुधारणा करणे गरजेचे आहे. खूप पर्याय आजकाल उपलब्ध असून त्यांचा वापर योग्य करण्यात शहाणपण.