हल्ली कुटुंबातील संवाद हरवलाय. घरातील माणसं काही टीव्हीसमोर, काही फोन वर, सगळे घरात असून विखुरलेले ही माणसं एकत्र असतात पण एकेकटी. ती जवळ असतात; पण त्यांच्यात जवळीक नसते. माणूस असा एकटा-एकटा जगायला लागला; कारण जगण्यासाठी माणसाला माणसाची गरज वाटेनाशी झाली. म्हणजे प्रत्यक्ष गरज जाणवणं बंद होताना दिसतंय. खरं तर रोज आपण अंगावर घालतो ते कपडे, आपण खातो ते अन्न बनविण्यासाठी लागणारं सामान- आपलं घर, इतर साधनं, वाहनं – हे सर्व बनविण्यासाठी समाजातील हजारो माणसांचे हात अप्रत्यक्षपणे लागलेले असतात. फक्त याची प्रत्यक्ष जाणीव आपल्याला होत नाही. यामुळंच इतरांविषयी मनात कृतज्ञता नाही, माणसामाणसांमध्ये प्रेम नाही, संवाद नाही. यामुळंच भावनिक आणि सामाजिक बुद्ध्यांक कमी होत चाललाय!
मुलांमध्ये आणि आपल्यात नेमकं हेच कमी होत चाललं आहे. भावनिक आणि सामाजिक बुध्यांक वाढविण्यासाठी प्रशिक्षणाची गरज पडते आहे. कारणही तसेच आहे.
१. सर्व प्रकारची मुबलकता, सोयीसुविधा असूनही माणूस सुखापासून, मन:शांतीपासून वंचित झाला आहे.
२. ताणतणावांचा शिकार झाला आहे. सध्याचे 70 टक्के आजार हे ताणतणावांमुळे आहेत.
३. नजीकच्या भविष्यकाळात दर दोन माणसातील एक औदासीन्यानं ग्रासलेला असेल असा मानसशास्त्रज्ञांचा कयास आहे.
४. वैफल्यग्रस्त तरुण पिढी. का? सगळं मिळूनही न मिळाल्यासारखं. का?
५. परिस्थितीतील बदलांचा अधिक परिणाम हा प्रौढांपेक्षा मुलांवरच अधिक झाला. मुलांवरील ताण मागील पिढीपेक्षा 975% म्हणजे जवळजवळ 10 पट वाढलाय.
६. मुलांमधील वैफल्यग्रस्तता, निराशा अधिक वाढलीय. भावनिक बुद्ध्यांक कमी झाला आहे. म्हणूनच आत्महत्या, आक्रमकता व इतर गुन्हे तसंच व्यसनाधीनता वाढलीय.
७. अपयश सहन करूनही पुढे जात राहण्याची क्षमता कमी झालीय.
८. प्रौढांना, तरुणांना औदासीन्यानं ग्रासलंय. तणावजन्य आजारांनी थैमान घातलंय.
म्हणजे सर्व प्रकारची मुबलकता, सोयीसुविधा असूनही जे मिळालं त्याचं सुख नाही. मात्र जे नाही मिळालं त्याचं दु:ख आहेच. ‘मी’ विकसित होण्याच्या प्रत्येक टप्प्याचा आनंद नाही. ‘मी सर्वांसाठी याऐवजी ‘सर्व माझ्यासाठी’ ही भावना वाढीस लागली.
काही वर्षांपूर्वी, वेगवेगळ्या स्वभावाची, विचारांची माणसं! त्यांच्याशी बोलणंचालणं व्हायचं. मग कठोर काका, मायाळू आजी, कडक शिस्तीचे बाबा आणि भीती वाटली तरी प्रेमळ असलेले आजोबा, एखादा तिरसट मामा, कजाग काकू आणि गमत्या दादा-रसिक वहिनी अशा अवतीभवती असणाऱ्या गोतावळ्यामुळे आपोआपच मुलं शिकायची. इतर माणसातील गुणदोषांचा स्वीकार करायला आणि त्यांच्याशी फायदेशीर ‘देवाणघेवाण’ करायला! हीच समाजशीलता! किंवा सामाजिक बुद्ध्यांक.
भोवतालची परिस्थिती, त्यातील समस्या किंवा त्यातील जे जे चांगलं असेल त्याचा फायदा करून घेणं याचंही प्रात्यक्षिक पाहायला मिळायचं. कारण इतक्या माणसांचं जगणं प्रत्यक्ष जवळून पाहायला मिळायचं. श्रमविभागणी. एखादं काम, सणसमारंभ सर्वांनी मिळून पार पाडण्यातील गंमत अनुभवायला मिळायची. जीवनातील या अस्थिरतेचा, अनिश्चिततेचा, काही बाबतीतील पराधीनतेचाही स्वीकार करायचा असतो हे आपोआप कळायला लागायचं. मग भावनिक बुद्ध्यांक चांगलाच वाढायचा.
घर लहान असू दे, मन मोठं करा. जगा आणि जगू द्या. इतरांच्या दु:खांची-सुखांची सहअनुभूती घ्या. सभोवतालच्या माणसांच्या सोबतीनं पुढे जात राहा. पहा, सुखाचा गुणाकार आणि दु:खाचा भागाकार होईल. अशाप्रकारे भावनिक आणि सामाजिक बुद्ध्यांक उंचावत राहील.
मला तर वाटतं हे प्रयत्न मोठ्यांनी फक्त मुलांसाठीच नव्हे तर स्वत:साठीही करायला हवेत, तरच तुम्ही स्पर्धा-वेग-ताणतणाव यांच्या वादळांनी खवळलेल्या नदीच्या प्रवाहात आनंदानं पोहू शकाल. यासाठी मुलांनी अनेकविध प्रकारची माणसं, भावना, परिस्थिती, घटना, वातावरण अनुभवायला हवं. पालकांनी असे प्रयत्न आवर्जून करायला हवेत.
(आजचा हा ब्लॉग सामाजिक, मानसिक या मानसिकतेतून लिहिला गेला आहे. याला कारण म्हणजे न पहावणारी मुलांची आणि आईवडिलांची होणारी फरफट.)
© श्रीकांत कुलांगे
मानसोपचार तज्ञ
खरंच आहे जाणिवा व संवेदना बोथट झाल्या आहेत…