प्रतिकूल परिस्थिती आणि वागणं

अनेक दिवसांपासून मुलांबरोबर काम करताना त्यांच्या मनातील उलघाल जाणवते. त्यांची आजच्या जगात जगायची हिम्मत तुटताना पाहताना मन विषण्ण होऊन जातं. मन स्वस्थ ठेवून, हिंमत न हरता संकटांवर मात करण्याची क्षमता (Adversity Quotient ) कशी विकसित करायची हे मुलांना शिकवण्याची हीच वेळ आहे. या काळात मानसिक स्वास्थ्य जपणं महत्त्वाचं आहे. मनाच्या स्वस्थतेचा आणि शरीर स्वस्थ असण्याचा खूप जवळचा संबंध आहे. याच काळात मुलांच्या मन:स्वास्थ्याकडे लक्ष द्यायला हवं. कारण वाढत्या वयातील मुलांचे अस्वस्थतेच्या आजारांचे, नैराश्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. रोज अनेकजण भेटतात व त्यांना याच कारणास्तव जागृती करण्याचा अविरत प्रयत्न चालू आहेत.

मुलं-मुली वाढत असताना त्यांचं शरीर व मन वाढत असतं. त्यांचं व्यक्तिमत्त्व घडत असतं. सभोवतालचे वातावरण त्यावर पैलू पाडत असतात. उत्साह वाहात असतो; तरीही मुलांना गोंधळात टाकणारे प्रश्न पडतात. आपण अचानक बदलू का लागलो, या चिंतेने मुले अस्वस्थ होतात आणि त्यांना प्रश्न पडतो, इतरांपेक्षा माझ्यात काहीतरी कमी आहे का? प्रत्येक गोष्टीत पालकांचा दबाव का? आईबाबांच्याच कलानं, त्यांना आवडेल तेच मी का करायचे? शैक्षणिक, आर्थिक विकास कधी होणार? कोमल नात्यातून निर्माण होणारी दोलायमान स्थिती निर्माण होते. याच काळात मुलांना सांभाळायला हवं, प्रसंगी तज्ञ समुपदेशक यांना भेटायला हवे. त्याचा काही कारणानं नुसताच मूड गेला आहे की, हा अस्वस्थतेचा किंवा नैराश्याचा आजार आहे, यातील फरक तज्ज्ञ व्यक्ती ओळखू शकते. जसे की.

१. पौगंडावस्थेतील मुले निराश किंवा दुःखी दिसतीलच असंही नसतं. त्यामुळे त्यांच्या नैराश्याच्या, आजाराच्या अवस्थेकडे दुर्लक्ष होऊ शकते.

२. बऱ्याच जणांमध्ये आक्रमकता, चिडचिडेपणाही दिसू शकतो.

३. ही मुलांची शिक्षणाची महत्त्वाची पायाभरणीची वर्षे असतात. याच काळात अभ्यासातली एकाग्रता कमी होण्याची भीती असते. पूर्वीच्या हुशार असणाऱ्या मुलाची गुणवत्ता घसरायला लागते. याचं पर्यवसान म्हणून चिडचिड वाढते.

४. निरुपयोगी असल्याची भावना, उत्साहाचा अभाव वाढतो. ही लक्षणे किती काळ व किती तीव्रतेने जाणवत आहेत हे पालकांनी, शिक्षकांनी व मित्रमैत्रिणींनी जाणीवपूर्वक पहायला हवे.

५. मोबाईल फोन, तसेच समविचारी मित्र त्यांना अजून लक्ष विचलित करत असतात, त्यामुळे मनाच्या अस्थिरतेकडे लक्षणीय बदल दिसतो.

त्याच बरोबर पौगंडावस्था हा एक सर्वार्थाने स्थित्यंतराचा कालावधी असतो. त्यामुळे काहीवेळा ही लक्षणे नॉर्मल असू शकतात. ज्याला वाढीच्या वयातील वेदना म्हणतात. पण ती तशी आहेत की आजाराचा भाग आहेत हे तज्ज्ञच ठरवू शकतात.

ब-याचदा अतिउत्साही वागणं किंवा दुराग्रही वृत्ती ही आजाराची लक्षणे असू शकतात. या वयात अस्वस्थता किंवा नैराश्य वाढण्याचं मुख्य कारण मेंदूतील रासायनिक बदलात असतं. आनुवंशिकता, हार्मोनल चेंजेस, परीक्षेतील अपयश, आई-वडिलांमधील सततच्या भांडणांमुळे येणारा ताण, चांगले गुण मिळूनही अभ्यासक्रमाला नाकारला गेलेला प्रवेश, नकारात्मक व्यक्तिमत्व, स्वप्रतिमा क्षीण असणे यापैकी काहीही या आजाराला या वयात निमंत्रण देणारं ठरतं. पौगंडावस्थेतील अस्वस्थता तसेच नैराश्य दुर्लक्ष करण्यासारखं नक्कीच नाही. त्यामुळे जरा दुर्लक्ष केलं की सगळं काही आपोआप ठीक होईल, वयाचा दोष असेल वगैरे गैरसमजुतीत न रहाणे चांगले. ताबडतोब तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने चांगले.

१. सर्वप्रथम अतिशय विश्वासात घेऊन, प्रेमाने आपल्या पाल्याशी बोला. तुम्हाला त्याच्याविषयी काळजी, प्रेम वाटतंय हे त्याला जाणवू द्या.

२. विश्वासाचं वातावरण तयार करा.

३. आवश्यक वाटल्यास तत्काळ तज्ज्ञाची मदत घ्या.

४. पाल्याच्या वर्तनातले बदल हे नैराश्याच्या आजारापोटी आहेत किंवा कसे हे तज्ज्ञाला ठरवू द्या.

५. आवश्यक औषधोपचार, समुपदेशन, विशिष्ट मानसोपचारपद्धती आणि मुलाला पालक व शिक्षकांकडून मिळणारा भावनिक आधार महत्त्वाचा आहे.

६. विविध मानसशास्त्रीय चाचण्या मुलांच्या मानसिकतेचा अंदाज देऊन जातात. त्या करून घ्या.

आजकल नवीन नोकरभरती साठी एक टेस्ट प्राधान्याने आम्ही वापरतो ती म्हणजे त्या मुलाचा AQ. बऱ्याच काळापासून असे मानले जात होते की आयक्यू आणि इ क्यू महत्त्वाचे आहेत. परंतु त्यापेक्षाही महत्त्वाची बाब म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही कसं रिॲक्ट करता याला जास्त वजन देण्यात येतं.

प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणे आणि त्यातून लवकरात लवकर बाहेर पडण्याची क्षमता हे एक आवश्यक जीवन कौशल्य आहे जे आपल्याला लहान वयात मुलांना शिकवणे आवश्यक आहे. मजबूत AQ असणं हे आरोग्यासाठी आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांपासून बचाव करण्यासाठी देखील महत्त्वाचे आहे. आयुष्य हे एक समान कधीच नसते तर उतार चढाव यांनी ते भरलेले असते. लहान वयापासून जेव्हा आव्हानांना तोंड द्यायला मुलांना शिकवले जाते तेव्हा आयुष्यात येणाऱ्या कठीण प्रसंगांना, पराभवांना अशी मुले धैर्याने सामोरे जातात. अत्यंत चांगला AQ असलेल्या मुलांच्या मध्ये खालील वैशिष्ट्य आढळून येतात.

१. अशी मुलं ऍक्टिव्ह लर्नर असतात, समोर येणाऱ्या समस्या सोडवण्याचा स्वतःहून प्रयत्न करतात.

२. कोणत्याही समस्यांचे निराकरण करताना विधायक दृष्टिकोन बाळगतात.

३. अशी मुलं सहजासहजी हार मानत नाहीत. याउलट काही मुलं हार मानून प्रयत्न करणं सोडून देतात.

४. अशा मुलांमध्ये विश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन दिसून येतो.

५. मनानं सक्षम असतात.

पालकांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की शिक्षणाबरोबरच प्रतिकूल परिस्थितीत मुलांनी दोन हात कसे करायचे यावर ध्यान देणे आवश्यक आहे. यागोष्टी वास्तविक मुलं शालेय जीवनात NCC, स्काऊट, सांघिक ठराविक खेळ, घरातील वातावरण यातून शिकतात. परंतु पालकांचं मुलांना अनावश्यक प्रोटेक्शन देणं त्यांच्या AQ वाढीस अडथळा तर ठरत नाही ना याची काळजी घेतली पाहिजे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *