नाकारण्याची भीती

नाकारण्याची भीती ही एक मोठी भीती आहे ज्याचे आपल्या आयुष्यावर दूरगामी परिणाम होतात. मागील आठवड्यात चार केसेस आल्या व त्यात हीच चर्चा की आम्हाला कुणीतरी रिजेक्ट केले, किंवा मी कुणालातरी नकार दिलाय. आता नकार पचवणं हे देखील आपल्या जीवनाचं विभिन्न अंग आहे. नाकारण्याची भीती आपल्यात एक पोकळी निर्माण करते. नाकारण्याच्या भीतीचे परिणाम आपल्यात कुठे व कसे होतात?

१. मुलाखत – जेंव्हा मुलाखतीला जातो तेंव्हा मनात असणाऱ्या नकाराची भीती आपल्यात बदल घडवते, त्याचा परिणाम प्रचंड घाम येणे, काही न सुचणे यात होतो.
२. बिझनेस करार – या दरम्यान बिझनेस संबंधी माहितीची देवाणघेवाण करताना हीच भीती त्रास देते. आत्मविश्वास कमी होतो.
३. नवीन व्यक्तींना भेटणे.-ते आपल्याला नाकारणार तर नाहीत या भीतीपोटी नवीन मित्रांना न भेटणे.
४. डेटिंग – जेंव्हा दोन व्यक्ती पहिल्यांदा जोडीदार मिळावा या आशेने एकमेकांना भेटतात तेंव्हा भीतीपोटी तारांबळ उडते.
५. विवाहित जीवनात चर्चेची आणि तडजोडीची न संपणारी मालिका असते. जोडीदार आपल्याला सोडून तर जाणार नाही ना ही भीती.
६. नाते संबंध – अनेकदा नात्यामध्ये नाकारले जाते. अबोला, क्षुल्लक कारणावरून झिडकारने.
७. समाजात मला मान मिळत नाही म्हणून निराश होणे, अलिप्त राहणे.

नाकारण्याच्या भीतीमुळे व मानसिक त्रास टाळण्यासाठी अशा व्यक्ती आपल्या व्यक्तिमत्वात बदल करतात. स्वतः मध्ये काय बदल करतात?

१. आपण जगासमोर आपला खरा आत्मविश्वास दाखवला तर आपल्याला नाकारले जाईल या भीतीने आपण एखाद्या मुखवटाच्या मागे आयुष्य जगू लागणे.
२. जरुरीपेक्षा जास्त पुढेपुढे करणे. त्यांना हे चुकीचे आहे हे माहीत असून सुद्धा आपली जागा निर्माण करण्यासाठी असे बदल करतात.
३. अनेकदा संघर्ष टाळण्यासाठी आपल्या मार्गापासून दूर जातात.
४. नाकारण्याची भीती आपल्याला स्वप्नांच्या मागे जाण्यापासून थांबवते. मग आयुष्यात तडजोडी सुरू होतात. जे आहे त्यात समाधान .

नाकारण्याच्या भीतीमुळे अशी वर्तणूक दिसून येते ज्यामुळे आपण असुरक्षित, कुचकामी आणि दबून जातो. घाम येणे, शरीर थंड पडणे किंवा थरथरता जाणवणे, समोरील व्यक्तीच्या डोळ्यात न बघणे आणि प्रभावी संभाषणाची क्षमता गमावू शकता. ठराविक बदल आपल्यात केले तर नकार मिळण्याची शक्यता कमी होऊन ही भीती काढण्यासाठी काही करू शकतो.

१. काळ व वेळ पाहून समोरील व्यक्तींशी बोलल्यास ते लगेच नाही म्हणत नाही. आपले बोलणे शक्यतो अचूक ठेवल्यास छान.
२. बोलताना आपल्या बुध्दीचा वापर करून माहिती व्यवस्थितरित्या संभाषण कौशल्य वापरून देणे. त्यासाठी व्यक्तिमत्त्व विकास कोर्स उपयोगी येतो.
३. व्यायाम, दीर्घ श्वसन सराव आपल्या भावना सुरळीत करतात.
४. मानसोपचरतज्ज्ञ भीती घालवण्यासाठी थेरपीचा वापर करून सुधारणा करतो.
५. अनुभवातून शिकून पुढे चालणे.
६. कुणालाही गरजेपेक्षा जास्त खुश करण्याच्या प्रयत्नात फायदा नसतो. म्हणून पाहिजे तेवढेच आदराने केल्यास छान.
७. जोडीदाराबरोबर आदराने वागल्यास व काळजी घेतली तर विश्वासार्हता निर्माण होते.
८. खंबीर मन व शिक्षणाने मानसिकता सकारात्मक होते.

नकार दिला म्हणजे सगळे संपले हा विचार अयोग्य. हा निसर्ग नियम आहे आणि प्रत्येकाला या नकाराला सामोरे जावे लागते. म्हणून घाबरून जाण्यापेक्षा, आहे त्या परिस्थितीचे अवलोकन करून योग्य निर्णयप्रक्रिया चालू ठेवणे गरजेचे. त्यासाठी भक्कम मन लहानपणापासूनच तयार करायला हवे ज्यामुळे मुलांना उद्याच्या नकाराची भीती वाटणार नाही.

©श्रीकांत कुलांगे
9890420209

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *