जीवन आणि मानसशास्त्र

 

कित्येकांना जीवनाचा अर्थ शेवटपर्यंत उमगत आणि समजत नाही. जीवन तर सर्वच जगतात परंतु जीवन कशासाठी जगत आहोत, हेतू, उद्देश्य काय? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती नगण्य असतात. मनुष्याच्या पहिल्या श्वासापासून तर अंतिम श्वासापर्यंत चा प्रवास म्हणजे त्या व्यक्तीचे जीवन. मी सहज अनेकांना जीवन म्हणजे काय हे विचारले. काहींनी जीवन म्हणजे कुटुंब, संपत्ती, धर्म याला जास्त महत्त्व दिले. परंतु या गोष्टी जीवन नसून घटक आहेत. ज्यांना हे कळले त्यांनाच जीवनाचा आनंद लुटता येतो. या व्यक्ती सदैव विद्यार्थी असतात व समाजाचे उत्तम मार्गदर्शक.

मानवी जीवनात विविध प्रकारच्या व्यक्ती आढळून येतात आणि त्यांच्या दृष्टीने जीवनाचा अर्थ बदलतो. हे विचार मानसिक सक्षमता किंवा अक्षमता दर्शवतात.

१. कृतिशील विचारवंत- यांच्या मते, जीवन म्हणजे अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा विरुद्ध लढा देऊन समाज परिवर्तनाचे कार्य करणे.

२. असामान्य व्यक्तिमत्व – जीवन म्हणजे स्वतः विरुद्धचा संघर्ष असतो.

३. आदर्श व्यक्तिमत्व – यांच्या मते आयुष्य ही एक adjustment आहे. समाजातील समाजसुधारणेशी संबंधित गोष्टींना चालना देतात. जीवनभर नवीन ज्ञान संपादन करत राहतात. आदर्श व्यक्तिमत्वाचे अनुकरण.

४. नायक – यांच्यामते, जीवन हे युद्ध असते. हे युद्ध असते मानसिक गुलामी, असत्य, हिंसा, अन्याय व मानवी कृत्यांना पाठिंबा देणाऱ्या समाज व्यवस्थेविरुद्धचे. त्यांच्यासाठी वेळ हा अमूल्य असतो. लाचारीने कमावलेल्या अमाप संपत्ती पेक्षा कष्टाची भाकरी गोड असते. तळागाळातील जनतेला सक्षम बनवणे म्हणजे जीवन.

याविरोधात मानसिक दुर्बल नागरिक आहेत. या गटातील व्यक्तींना जीवन म्हणजे

१. भुलभुलय्या किंवा पाण्याच्या बुडबुडे सारखे.

२. संपूर्ण जीवन मौज-मजा करत जगायचे असते.

३. स्वतःवर नियंत्रण नसल्यामुळे अनियंत्रित जीवन व्यतीत करतात.

४. आधारासाठी चुकीचे पावले उचलतात. वेळप्रसंगी हिंसेचा स्वीकार करण्याची मानसिकता असते.

मग जीवन कसे असावे ज्यानेकारून मानसिक आरोग्य चांगले राहील? प्रत्येकाचे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. तरीही, अनेक संवादातून ऐकायला मिळालेली तथ्ये आहेत,

१. परिश्रमाची लाज नको संपत्तीचा माज नको अति शृंगाराचा साज नको.

२. अशुद्ध गोष्टीविषयीचे ऐकणे, टीव्ही बघत जेवण, व मादक पदार्थांचे सेवन नको.

३. कुविचारांना थारा नको, डोळ्यात अश्रूंच्या धारा नको, संकुचित मनोवृत्ती चा आधार नको..

४. भावनिकतेकडे धाव नको, धूर्त, लबाडपणा जीवनात वाव नको, स्वतःच्या चारित्र्यावर घाव नको.

५. नावीन्याचा ध्यास हवा, जगाचा अभ्यास हवा, असावा हा संकल्प नवा.

जीवनावर आपण बोलू तेवढे कमी. जीवन जगताना वेगवेगळ्या सत्रात आपल्या खांद्यावर नकळत अनेक ओझी आपण वाहत असतो. हे ओझे कमी करायचे असल्यास, मानसशास्त्र आपल्या दैनंदिन जीवनात खूप मदत करतं.

१. या ओझ्यांची एक यादी बनवा. अनावश्यक ओझी विनाकारण आपलं ध्येय गाठू देत नाही. त्यांना हद्दपार करा.

२. संभाषण कौशल्य विकसित करा. बोलताना काय, कसे, कुठे बोलतो यावर विचार करा.

३. नातेसंबंधात सुधारणा. गुंतागुंत वाढते जेंव्हा अपेक्षा वाढतात. नात्यांचा आदर ठेवा. लक्ष्मणरेषा पाळा.

४. शिक्षणाचा योग्य वापर. स्वतः व समाजासाठी चांगल्या पद्धतीने कसा करता येईल याचा विचार हवा.

५. आत्मविश्वास. तो जपणे, वाढवणे, योग्य वापर करणे, व नेहमी इतरांकडून नवीन शिकत राहणे या गोष्टी आपला आत्मविश्वास वाढतात.

६. वागणूक. प्रेमळ पण प्रसंगी कठोर, समान, योग्य, निरहेतुक, अहं नसलेली, असेल तर मानसिक विकृती येत नाही.

जीवनाचा सारासार पहिला तर मानसिक तयारी आणि त्याचा संयुक्तिक दैनंदिन वापर महत्वाचा ठरतो. Covid संक्रमणाच्या वाढीला बेजबाबारपणामुळे वागणाऱ्या ठराविक व्यक्तींचा जर बारकाईने अभ्यास केला तर असं जाणवेल की यांना जीवन कधी समजलच नाही. ना स्वतःचे ना इतरांचे. शेवटी प्रारब्धाला दोष देण्यात अर्थ नाही. म्हणून जीवनाला ओळखा व अर्थ जाणून घ्या.

©श्रीकांत कुलांगे

मानसोपचारतज्ज्ञ

9890420209

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *