मनाची घुसमट

 

मानलेल्या बहिणीने एक प्रश्न विचारला दादा मला कित्येकदा गृहीत धरलं जातं. मी नाही पण म्हणू शकत नाही. नुसती घुसमट होते, राग येतो. थोडावेळ चर्चा करून मनाची समजूत घातली, काय करायचे ते सांगितले. हेच चित्र प्रत्येकाच्या घरात थोड्याफार फरकाने दिसून येते. कारणे वेगवेगळी असतात पण गुंता कसा सोडवू हा प्रश्न असतो. जीवन प्रवासात आपण कोणावर तरी अवलंबून राहतो. लहानपणी अनेक गोष्टींसाठी आईवर अवलंबून असतो. आपण जस जसे मोठे होतो तेव्हा नवीन व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात आणि मग आपण परत एकदा दुसऱ्या नवीन व्यक्तीवर अवलंबून राहू लागतो. त्यांना गृहीत धरू लागतो. ज्या व्यक्तीला आपण गृहीत धरतो ती व्यक्ती बोलकी असेल तर पटकन नाही म्हणून मोकळी होते, मग भांडणं होतात. अशा व्यक्तींच्या अनेक अडचणी असतात व त्यांच्यामध्ये अनेक गोष्टी पडद्यामागे घडतात जसे कि;

१. कौटुंबिक स्वास्थ्य बिघडणे.
२. मनापासून काम करण्याची इच्छा कालांतराने होत नसणे.
३. माझ्या मनासारखं वागू शकत नाही असा न्यूनगंड निर्माण होणे.
४. वजन वाढणे किंवा अतिकृष होणे. शारीरिक आजार.
५. चिंता व नैराश्य – त्यामुळे चिडचिड होणे, निद्रानाश, मानसिक आजार.
६. घरात नकारात्मकता दिसून येते. सगळ्या लोकांवर प्रभाव पडतो.
७. घरातील व्यक्ती, नातेवाईक यांच्या बाबत घृणा निर्माण होणे.

कुठं तरी या गोष्टीबाबत योग्य व्यक्तींशी बोलून असे प्रश्न वेळेवर बोलून सोडवले पाहिजेत. समाजात अशा घटना थांबवण्यासाठी सर्वांनी काही प्रयत्न करणे क्रमप्राप्त आहे. कुणाला आपले काम सांगायच्या अगोदर आपण स्वतः काय करू शकतो;
१. आपल्या सवयी बदलणे. बऱ्याच गोष्टी आपण स्वतः करू शकतो.
२. कुणालाही काही काम सांगायच्या आधी दोनदा विचार करा.
३. जे आपले काम करतात त्यांना thank you जरूर म्हणा.
४. स्वावलंबी माणसाच्या बोलण्याला किंमत असते व शब्दाला वजन असते हे विसरू नका. स्वावलंबी व्हा.
५. दुसऱ्यांना काम सांगून आपण स्वतःला कमजोर बनवतो व त्यामुळे स्वतःला काही करण्याची इच्छा होत नाही.
६. घरातील महिला, लहान मोठे भाऊ व बहीण, शेजारी समाजातील व्यक्ती यांचा मनापासून आदर करणे.
७. प्रेमाच्या नावाखाली त्यांना पडेल ते काम देऊ नका. खरोखर प्रेम करा. एकत्र काम केले तर वैचारिक भावना वाढते.
८. अशा व्यक्तींना मनुष्य म्हणून त्यांना वागवा व त्यांचे प्रश्न समजून घ्या. त्यांना होणाऱ्या यातना समजून घेणे.

गृहीत धरणे हा खूप मोठा सामाजिक प्रश्न झाला मग ते राजकारण असो किंवा सोसायटी, घर, लहान-मोठ ऑफिस ते फॅक्टरी पर्यंत. कुणी ना कुणी दुसऱ्याला गृहीत धरून नको ते काम सांगत असतो. ज्या व्यक्ती पीडित आहेत त्यांनी काय करावं;
१. कुणी विचारल्याशिवाय तुमच्या इच्छेविरूद्ध करण्याचे टाळणे. गरज पडल्यास मदत मागणे.
२. कधीतरी नम्रपणे नाही म्हणायला शिका. लक्ष्मणरेखा आपणच आखायची असते.
३. इतरांच्या आनंदात आपला आनंद शोधण्याचा प्रयत्न पण स्ट्रेस कमी होतो.
४. स्वतःची काळजी, व्यायाम, विरंगुळा यात काही प्रमाणात वेळ द्या.
५. आत्मविश्वास ठेवा. आवडी निवडी आपल्या जोडीदराला नक्की सांगा.
६. कुणी मदत केली तर thank you म्हणल्याने समोरची व्यक्ती पण नंतर मदत करण्यास प्रोत्साहित होते.

खुप काही करण्यासारखे आहे. आयुष्यात आपल्या प्रियजनासाठी कित्येकदा आपण काही ना काही करत असतो मग त्यात स्वतःला झोकून देतो, अशा व्यक्तींचा आदर करायला हवा. त्यांना त्यांची duty आहे म्हणून त्यांचा अपमान करणे योग्य नाही. कुटुंब व समाज खरेच शांत ठेवायचा असेल तर माझ्यापासून सुरुवात होते हे ध्यानात ठेवले तर जगणे अजून सुंदर होईल व मनाची घुसमट हि व्याधी न राहता जगण्याची आस निर्माण करील.

@श्रीकांत कुलांगे
९८९०४२०२०९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *