मानसिक आरोग्य आणि कायदा

१० ऑक्टोबर पासून मानसिक आरोग्याबाबत चर्चा करताना अनेकजण मानसिक आजार म्हणजे काय याबाबत अनभिज्ञ दिसले. तर काहींना माहिती असून सुध्दा त्यांनी अशा प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. मानसिक आरोग्य विषयावर आधारित लेख हे वर्तमानपत्र, टीव्ही चॅनेल, सोशल मीडिया वर मोठ्या संख्येने पाहायला, वाचायला मिळतात.

जसे आपल्या छातीत, पोटात दुखतं तसेच मनाचेही दुखणे असू शकते. शारीरिक दुखणे हे दिसते, पण मानसिक आजार दिसतही नाहीत आणि पटकन लक्षातही येत नाहीत. मानसिक आजारांबद्दल समाजामध्ये अनेक चुकीच्या आणि वाईट समजुती आहेत.

मानसिक आजार म्हणजे फक्त वेड लागणे अशी एक गैरसमजूत आपल्या समाजात आहे आणि वेड लागले म्हणजे वेड्यांच्या दवाखान्यात दाखल करण्याशिवाय दुसरा काही उपाय नाही असा समज आहे. मानसिक आरोग्य म्हणजे आयुष्यात येणाऱ्या सगळ्या बऱ्यावाईट अनुभवांना खंबीरपणे सामोरे जाणे, कुटुंबातील आणि समाजातील इतर लोकांशी चांगले नाते असणे असा अर्थ आहे.

मानसिक आरोग्य चांगले असण्याची लक्षणे सर्वसाधारण खालीलप्रमाणे दिसतात:

१. त्या माणसाचे मन शांत असते.

२. इतरांबरोबर जुळवून घेता येते.

३. कोणी नावे ठेवली , कोणी आपल्या कमीपणावर केलेली टीका होऊनही दुखावले न जाणे.

४. आपल्या प्रश्नांना आपणच उत्तर शोधणे.

५. आपल्याला आयुष्यात काय करायचे आहे ते ठरवणे.

६. मनावर ताबा असणे.

७. जीवनातले ताण-तणाव, काळजी सहन करण्याची क्षमता असणे.

मग मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काय करावं:

१. योग्य, पुरेसा आणि वेळेत आहार घेणे.

२. स्वतःची व परिसराची स्वच्छता ठेवणे.

३. चांगल्या सवयी लावून घेणे- धुम्रपान, मद्यपान न करणे. नियमित व्यायाम करणे.

४. ताणताणाव व काळजी कमी करणे.

याव्यतिरिक्त घरगुती गोष्टी सुध्दा मानसिक आजार आणण्यासाठी कारणीभूत असतात. जसे की,

१. अस्थावस्थ असलेले घर.

२. घराची प्रतिकृती / आकार / रचना.

३. घरातील वस्तू रितसर पद्धतीने न ठेवणे.

४. घरात होणारा आवाज.

५. विनाकारण होणारे वादविवाद.

६ फाजील लाड, अनावश्यक गोष्टींचा साठा.

७. पैशांची कमतरता.

कौटुंबिक वातावरणात, ऑफिसमध्ये, आद्योगिक क्षेत्रात कोणत्याही रोगाची साधीसाधी वाटणारी लक्षणे दिसून आली तरीही लगेचच योग्य त्या डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो औषधोपचार,  समुपदेशन सुरू केेलेले  बरे.

मानसिक आरोग्य सेवा कायदा:

भारतातील एक दशलक्ष लोकसंख्येमागे निव्वळ तीन मानसोपचारतज्ज्ञ असून मानसशास्त्रज्ञांची संख्या तर त्याहून कमी आहे, असे एका अहवालाद्वारे स्पष्ट झाले आहे. अर्थात प्रती १००००० व्यक्तीमागे ५.६ मनसोपचारतज्ञ असले पाहिजेत या, राष्ट्रकुलच्या निकषांनुसार हे प्रमाण १८ पटीने कमी आहे. भारतातील मानसिक आरोग्याची भीषण स्थिती पाहता, २०१७ साली संमत करण्यात आलेल्या या कायद्याची गरज आणि महत्व पुन्हापुन्हा अधोरेखित होते.

भारतात प्रचलित समजुतीनुसार सायकॉलॉजिकल मदत घेणे आणि वेडेपणा या कल्पनांबाबत बराच गोंधळ आहे, त्यामुळे अशी मदत घेण्याकडे देखील इथे कलुषित नजरेने पाहिले जाते. मानसिक आरोग्याकडे कलुषित नजरेने पाहण्यापासून परावृत्त करणाऱ्या काही तरतुदींचा समावेश या कायद्यामध्ये करण्यात आला असला तरी, पिढ्यानपिढ्या समाजात रुजलेल्या मानसिकतेत रचनात्मक बदल करण्याची गरज आहे, हे देखिल लक्षात घेतले पाहिजे.

कायदा जरी चांगला असला किंवा काही त्रुटी असल्यातरी देखील मानसिक आरोग्य तपासणी करून घेणे, त्यावर समुपदेशन सुरू करणे केंव्हाही स्वतः साठी आणि समाजासाठी भल्याचे आहे. लोकसहभाग  महत्त्वाचा.

©श्रीकांत कुलांगे

मानसोपचार तज्ञ.

 

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *