वैवाहिक जीवन आणि एकतर्फी प्रयत्न

प्रत्येक वैवाहिक संबंध महत्वाचे आणि वेगळे असतात. परंतु, जीवन जगताना काही लक्षणं सांगतात की विवाहात गंभीर समस्या आहेत. संदीप आणि सुनीता या चिंतेने ग्रासले होते व त्यांच्या मधील तणाव स्पष्ट दिसत होता. त्यांच्याशी बोलून काही टेस्ट घेतल्या की नेमकं काय चुकतंय. दोघानाही आपण चुकतोय याची जाणीव पण स्वतःमध्ये बदल करायला तयार नाहीत. विवाह संबंधात व्यत्यय निर्माण करणारे असे काय मुद्दे असतात?

१. आपण बोलतो एक, करतो दुसरेच. चांगल्या गोष्टींचे नियोजन व करणे यात तफावत. यातून येणारे नैराश्य.
२. मुलांसाठी किंवा आपल्यासाठी वेळ काढत नाही
३. भावनिक किंवा शारीरिक अत्याचार.
४. वारंवार अविश्वासूपणाने वागणे. विवाहबाह्य संबंध.
५. जुगार, जास्त मद्यपान करणे. प्रचंड खर्च करणे.
६. खूप नकारात्मक दृष्टीकोन असणे.
७. नोकरी ठेवण्यास सक्षम नाही.

एखादा जोडीदार असा असेल तर मग कसं वागायचं किंवा सोबत राहायचं? जर आपला जोडीदार बदलत नसेल, तर आपल्या वैवाहिक जीवनात सुधारणा घडवून आणण्यासाठी काम करण्यास तयार नसेल किंवा मदत घेऊ इच्छित नसेल तर आपण घटस्फोटाच्या मार्गावर जाऊ शकता. या परिस्थितीचा सामना करणे सोपे नसले तरीही आपल्यातील एकालाच बदलण्याची इच्छा असल्यास काही मार्ग काढू शकतो.

१. स्वतःचे शक्ती स्थान ओळखल्यास प्रयत्न कसे करायचे ते ठरवता येते.
२. जोडीदार बदलत नाही याबाबत मानसिक तयारी ठेऊन पुढे एकटा चालण्याचा निर्णय व प्रयत्न.
३. सोबत समुपदेशन घेतले तर मानसिक आरोग्य धोक्यात येत नाही. ऊर्जा मिळेल.
४. महत्वाचे म्हणजे जोडीदाराबरोबर चर्चा करत राहणं.

असा जोडीदार आणि चर्चा सोपी नसते म्हणून त्यासाठी व्यवस्थित नियोजन करणे अपेक्षित.

१. गोष्टी कशा चालल्या आहेत याचा आढावा घेऊन वेळ किती लागेल याचा अंदाज घेत राहणे.
२. समजूतदारपणा ठेवून वागले तर मुकाबला करायची वेळ टाळू शकतो.
३. समस्येच्या निराकरणावर चर्चा सकारात्मकतेने करत विवाह समुपदेशन करण्याची शक्यता समोर आणल्यास उत्तम.
४. व्याख्यान देऊ नये, उपयोग नाही होत.मुद्द्याचे बोला.
५. समस्या ओळखुन, मुळाशी जाऊन त्यांना काबूत आणायचा प्रयत्न कित्येकदा सफल होतात.
६. स्वतः किंवा जोडीदार अशा व्यक्ती केंद्रित प्रश्र्नपेक्षा कुटुंब वाचवण्यासाठी चर्चा चांगली.
७. वेळोवेळी आढावा घेऊन कंटाळा न करता प्रयत्न चालू ठेवायला हरकत नसावी.

विवाह पश्चात अशा घटना एकतर घडू नयेत, घडू देऊ नयेत. त्यासाठी कुटुंबातील सर्वांनी सहकार्य केले तर आयुष्यभर साथ हवीहवीशी वाटेल. त्याग आणि मानसिक आरोग्य यांचे संबंध असतात. आदर व योग्य विचार, वैवाहिक जीवनाच्या प्रेरणा आहेत. काल त्या दोघांना शेवटचे समुपदेशन झाल्यावर एकच प्रश्न विचारला की आतापर्यंत खरंच स्वतहाला किती आनंद मिळाला? उत्तर अर्थात नकारात्मक होते. आपणही असा प्रश्न विचारून पहा…

©श्रीकांत कुलांगे
9890420209

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *