गेल्या दोन दिवसापासून मला प्रवासामुळे काही लिहायला जमलं नव्हतं. सिंगापुर ते मुंबई हा प्रवास साधारण पाच तासांचा पण यावेळेस मात्र तो तब्बल 29 तास इतका झाला. यावेळेस भारतात पोहोचण्यासाठी जे शक्य होईल ते विमान पकडून आम्हाला पाठवण्यात आलं. आमचा पहिला पाडाव सिंगापूर ते दोहा असा होता. भरपूर महिने समुद्रात काम करून माझ्यासारख्या अनेक खलाशी बांधवांना जगाच्या कानाकोपर्यातून वेगवेगळ्या विमानांमधून दोहा येथे आणण्यात आलं. त्यात काही जुने मित्र भेटले, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे चिंता, तणाव, सहनशक्ती आणि मानसिकता. आता 18 तास एअरपोर्ट वर थांबून पुढचा प्रवास मुंबईचा हा खरोखर त्रासदायक होता. माझा आवडता उद्योग म्हणजे अशा वेळेस व्यक्ती निरीक्षण करणे आहे. शेवटी तणाव हटवण्यासाठी मला काहीतरी करणे गरजेचं होते. काही निरीक्षण नेहमीपेक्षा वेगळी होती जसे की,
१. एक मनुष्य एअरपोर्ट मध्ये रनिंग करताना दिसून आला. त्याच्याशी बोलल्यानंतर समजलं की त्याने तब्बल तीस किलोमीटर रनिंग काही अवधी मध्ये पूर्ण केलेली होती.
२. एक साउथ आफ्रिकन माझा मित्र, त्याला व्यायामाची आवड. त्याने जवळपास असणाऱ्या लोकांना सूर्यनमस्कार कसे करायचे हे प्रात्यक्षिक करून दाखवताना दिसला. आता दिवसभर करायला काही नाही म्हणून इतर लोकही त्याला जॉईन झाले. एका कोपऱ्यात हे मस्तपैकी चालू राहिले.
३. एक मुलींचा ग्रुप आपल्या मोबाईल मध्ये कुठेही इकडे तिकडे न बघता तासंतास गुंतलेल्या दिसल्या.
४. खूप कमी कुटुंब मुलांसहित प्रवास करताना दिसले. हे असं कधी यापूर्वी दिसले नव्हते.
५. नवरा बायको किंवा मित्र-मैत्रिणी सहित प्रवास करणारे फिरंगी कॉफी शॉप मध्ये तासंतास एकमेकांशी बोलण्या ऐवजी पुस्तकात मग्न होते.
६. नेहमीप्रमाणे आयटी कंपनीत काम करणारे तरुण-तरुणी इलेक्ट्रिक कनेक्शन त्यांच्या लॅपटॉपला कुठे भेटेल ते शोधताना दिसले.
७. काही महाभाग तोंडाला मास्क लावून स्वतःची सेल्फी काढून देव जाणे कुणाला तरी पाठवत होते.
८. हे एअरपोर्ट ठराविक लोकं करताच उघडलं की काय याची जाणीव झाली. जेव्हा लाखो लोक या एअरपोर्ट मध्ये असायचे आता फक्त दोनशे ते तीनशे लोक असावेत.
९. मुंबई एअरपोर्टला आल्यानंतर मात्र माणसाचा अपेक्षाभंग होतो. कारण इथल्या स्टाफची निर्बुद्ध मानसिकता. या एअरपोर्ट मध्ये उतरल्यानंतर तुम्हाला शौचालय शोधायला फिरावं लागतं. कुबट वातावरण माणसाची धुंद क्षणात उतरवते.
१०. कधीच कोणी पूर्ण माहिती देत नाही आणि पुढे जायला सांगतात. भारताबाबत नकारात्मक दृष्टिकोन इथून सुरू होतो.
११. Covid-19 बऱ्याच गोष्टी इथे कराव्या लागल्या. सोशल डिस्टंसिंग अजिबात नव्हते म्हणून कदाचित भारतामध्ये येणाऱ्या कोविडचा प्रादुर्भाव एअरपोर्टवरून सुरु झाला की काय अशी शंका यायला लागते.
१२. आयुष्यात पहिल्यांदा फाइव स्टार हॉटेलमध्ये एसटी बसने आम्हाला घेऊन जाण्यात आले.
१३. कुठलातरी फवारा मारून आमच्या सगळ्या बॅग्स हॉटेलच्या बाहेर धुण्यात आल्या व नंतर check-in. धन्य हो असे म्हणत रूम मध्ये येऊन सुस्कारा टाकला.
निरीक्षण करण्याची माझी शक्ती मोबाईलच्या बॅटरी सारखी क्षीण होताना दिसून आली. डोक्याचं भज आणि मनाची उलघाल या निरीक्षण करण्याच्या आवडीमुळे कमी झालं होतं. होणारा त्रास कितीही शारीरिक आणि मानसिक असला तरी त्याचे उत्तर आपणच शोधायला हवं नाहीतर अनपेक्षित घडणाऱ्या अनेक घटकांचा आपल्या मनावर आणि मेंदूवर परिणाम चांगलाच होत असतो. यात आपणच स्वतःला आणि आपल्या सहकाऱ्यांना वाचवू शकतो. हा प्रवास, अनेक अशा प्रवासांपैकी असला तरी काहीतरी वेगळा अनुभवला आणि मुंबईला पोहोचलो म्हणून देवाचे आभार मानले व पुढील येणाऱ्या दिवसांची चाहूल आपोआप झाली.
@श्रीकांत कुलांगे
९८९०४२०२०९
छान अनुभव कथन श्रीकांत
Your observation is so nice,
Looking at your observation, it seems that our observation needs a lot of improvement.