आतल्या मनाची माणसे

अंतर्मुख व्यक्ती कित्येकदा बोलत नाहीत म्हणून त्यांना चुकीचं समजलं जातं आणि त्यामुळे या व्यक्ती इतरांपासून दूर राहतात. अशाच एका अंतर्मुख व्यक्तीबरोबर आज बोलणं झालं आणि त्याच्यावरती असणाऱ्या मानसिक तणावामुळे पुढे काय करावं याबाबत मार्गदर्शन केले. अंतर्मुख व्यक्ती अनेकदा मानसिक स्वास्थ्य गमावून बसतात. वास्तविक ही एक आपल्या व्यक्तिमत्वाची ओळख असते आणि एक नॉर्मल गोष्ट आहे. काय होतं अशा व्यक्तींना?

१. इतरांनासारखे नवीन मित्र सहजासहजी नाही बनवता येत म्हणून खंत वाटते, मोठा समुदाय त्यांना विचलित करतो.
२. आनंदी राहण्यासाठी प्रयत्न पण बऱ्याचदा सफलता येत नाही. स्वतः बाबत अतिशय जागरूक असणे.
३. मिळून मिसळून राहत नाही म्हणून कुचंबना होते. या व्यक्तींचा आपला एक लहान मित्रांचा ग्रुप असतो. त्यापलीकडे नाही.
४. मानसिक त्रास. नैराश्य, तणाव, उदासीनता.
५. बारीक गोष्टींचा किंवा हावभाव याचा विचार करतात ज्या नॉर्मल लोकांच्या ध्यानात येत नाहीत. ते निरीक्षण करून शिकतात.
६. डिप्रेशन कडे जाण्याची भीती. विशेषतः आता साथीच्या काळात जेव्हा आपण एकटे राहून घरी काम करत असतो. सगळं जवळ असून सुध्दा त्या गोष्टींचा उपभोग घेता येत नाही.
७. जीवाची घालमेल परंतु स्वतःला शांत जागी ठेऊन आपले छंद जोपसण्यासाठी वेळेचे नियोजन.

अंतर्मुख व्यक्ती बहुतांशी शांत स्वभावाची असल्याने भांडणाचा नाही पण गैरसमजापोटी त्यांना तणाव अधिक जाणवतो. काही केसेस मध्ये कुटुंबीय सुध्दा हतबल झालेली दिसतात. अंतर्मुख आणि लाजाळूपणा दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अंतर्मुख व्यक्तींनी आपल्यात थोडे सकारात्मक बदल केले तर तणाव कमी होईल.

१. मेडीटेशन. त्यातून भावना नियमन.
२. लिखाणातून आपल्या व्यक्तीत्त्वाबाबत उलगडणे.
३. नकारात्मता आपले तणाव व चिंता वाढवतात. म्हणून आपल्या विचारांची पद्धत चेक करून बदल केला तर सकारात्मक विचारसरणी होण्यास मदत.
४. आपल्या स्वभावाचा अंदाज घेऊन त्याबाबत सकारात्मक राहिल्यास न्यूनगंड दूर राहील. आपल्यात अनेक चांगले गुण आहेत, त्यांना ओळखुन वापर केल्यास आनंदी राहाल.
५. जेंव्हा शक्य असेल तेंव्हा स्वतःला बाहेरच्या जगाशी मिसळू दिल्यास आनंदी वातावरण निर्माण होते.
६. अंतर्मुख व्यक्ती अनेकदा आपल्या मनातील भावना जवळच्या व्यक्तींबरोबर बोलतात. त्याबाबत अजून बोलल्यास मन हलके राहते.
७. मैत्री खूप महत्वाची असते. आपले मित्र मंडळ व्यवस्थित ठेवल्यास नवीन गोष्टी लक्षात येतील.
८. आपले विचार व भावना आवश्यकतेनुसार व्यक्त केल्या तर मानसिक आरोग्य टिकवून ठेवता येईल.

पालकांनी किंवा इतरांनी अशा व्यक्तींना कमी लेखण्याची गरज नसते. कारण अशा व्यक्ती आपल्याला ठराविक समूहात राहणे पसंत करतात म्हणून त्या एकलकोंडी नसतात. त्यांना त्यात समाधान वाटत असेल तर काही विशेष नाही. परंतु जर त्यांच्या मध्ये चिडचिड किंवा डिप्रेशन असेल तर समुपदेशन घेणे केंव्हाही चांगले.

 

 

©श्रीकांत कुलांगे
9890420209

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *