मैत्री आणि आपले भवितव्य

अनेक क्लायंट असे भेटले की ज्यांना आयुष्यात काय करायचं तेच आजवर समजलेले नाही. सुकानुरहित भरकटलेल्या जहाजासारखे त्याचं आयुष्य ध्येयविरहित अनेक वर्ष जसेच्या तसे सभोवतालच्या लोकांसमवेत फिरत राहते. वेळ निघून गेल्यावर समुपदेशन घेणं म्हणजे वेळेचा दुरुपयोग होय.

आयुष्यात आपले भविष्य निश्चित करताना इतर गोष्टींबरोबरच आपला मित्रपरिवार मोठी भूमिका निभावत असतो. मैत्री आणि आपले भवितव्य याबाबत काही तथ्ये अनेक संशोधकांनी सांगितले आहेत.

१. तुमचा मित्रपरिवार नेमका कोणता आहे यावरून तुम्ही आयुष्यात काय मिळवणार आहात, हे ९५टक्के ठरतं.

२. तुम्ही दिवसभर कोणकोणत्या प्रकारच्या लोकांच्या संपर्कात असता यावरून खरा फरक पडतो.

३. तुमचा ‘समविचारी ग्रुप’ तुमचं यशापयश ठरवत असतो.

४. जेव्हा तुम्ही वेगळं व्यक्त्तिमत्त्व असणाऱ्या माणसांचा शोध घेऊ लागता तेव्हाच तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडण्यास प्रारंभ होतो. ‘तुम्ही कोंबडी बरोबर झगडत बसाल तर गरुडाप्रमाणे भरारी घेऊ शकणार नाही’.

५. नकारात्मक वागण्याऱ्या-बोलणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहिलात आणि उत्साही, ऊर्जा देणाऱ्या सकारात्मक व्यक्तींसोबत मैत्री केली, त्यांच्याशी संबंध प्रस्थापित केले, तर तुमच्या विचार करण्यात, अनुभवण्यात आणि कृती करण्यात सकारात्मक बदल दिसायला लागतो.

६. वेगवेगळ्या प्रकारच्या अभ्यासाअंती हे सिद्ध झालंय की, तुम्ही ज्या पाच मित्रांच्यासोबत/सहकाऱ्यांच्यासोबत असता त्यांच्या उत्पन्नाची जी सरासरी निघेल तितकं तुमचं सरासरी वार्षिक उत्पन्न असतं.

आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार जरी असलो तरी आपल्याला काही प्राथमिक बाबींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. काही हटके गोष्टी कराव्या लागतील.

१. तुमच्या वर्तुळातील अशा तीन ते चार जणांची निवड करा. तुमचा स्वतःचा एक मास्टरमाईंड ग्रुप बनवणे.

२. ज्यांचा तुम्ही आदर करता आणि जे तुम्हाला आवडतात त्यांना फोन करा किंवा प्रत्यक्ष जाऊन भेटा.

३. आठवड्यातून एकदा मास्टरमाईंड ग्रुपला एखाद्या रेस्टॉरंटमध्ये किंवा स्थानिक कॅफेमध्ये जेवणासाठी किंवा नाष्ट्यासाठी आमंत्रित करा.

४. मीटिंग सुरू करण्यापूर्वी सगळे मिळून येत्या आठवड्यात वाचण्यासाठी म्हणून एक पुस्तक ठरविणे आणि पुढच्या मीटिंगमध्ये त्या पुस्तकाचं परीक्षण करण्याची जबाबदारी एकाकडे सोपावने. पुस्तकाचं नुसतंच परीक्षण न करता त्या व्यक्तीने आपण या पुस्तकातून सर्वांत महत्त्वाचं काय शिकलो ते सांगणे. त्यानंतर प्रत्येकजण त्या पुस्तकाबद्दल, त्याच्या आशयाबद्दल आपापल्या कल्पना व आपली मतं मांडणं महत्वाचं.

५. स्वतःला नेहमी सकारात्मक, ध्येयवादी, कर्तृत्वान, निश्चयी, आयुष्यात काहीतरी नवीन करून दाखवायची इच्छा असणाऱ्या लोकांच्या गराड्यात ठेवा.

६. थोडंसं कठोर आहे, पण ज्या माणसांचा तुम्हाला कुठल्याही प्रकारे उपयोग नाही अशा व्यक्तींपासून दूरच राहा.

७. ‘‘आवश्यक तितक्या लोकांशीच ओळख ठेवा.’’ ज्या व्यक्ती तुम्हाला पुढे जाण्यापासून मागे ओढत असतील तसंच ज्यांचं तुमच्या कामात काहीच योगदान नाही, अशा उथळ लोकांना टाळा. याच महत्त्वाच्या कारणामुळे लोक त्यांच्या आयुष्यात अपयशी होतात आणि त्यांना याची जाणीवही नसते.

प्रत्येक कृतीचा हिशोब ठरलेला आहे! तुम्ही तुमच्या प्रगतीत अडथळा ठरणाऱ्या लोकांशी मैत्री ठेवण्यातच आनंद मानत असाल तर याचाच अर्थ, ज्यांच्या संगतीत राहण्याने तुमचा उत्कर्ष होऊ शकतो अशा व्यक्तींना जवळ करणं तुम्हाला आवडत नाही.

तुम्ही ज्या माणसांच्या सतत संपर्कात असता अशा व्यक्तींची यादी तयार करा. त्या व्यक्तींसारखं घडण्याची तुमची इच्छा आहे का? तुमची मुलं जेव्हा मोठी होतील तेव्हा ती या यादीतल्या लोकांसारखी व्हावीत असं वाटतं का? अशा व्यक्तींसोबत राहण्याने तुमचं आयुष्य समृद्ध होणार आहे की ना हे प्रश्न जरूर विचारा.

मैत्री जिवाभावाची नक्की परंतु काहीही करून त्या मैत्रीचा उपयोग आपल्या भविष्यात सकारात्मक करून घ्यायचा असेल तर विचार जरूर करा. आपल्या मुलांची, मुलींची मैत्री कुणाबरोबर आहे याची माहिती ठेवा.

 

 

1 thought on “मैत्री आणि आपले भवितव्य”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *