नाविन्याचा ध्यास आणि अपयश

काही विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नाविन्याचा ध्यास आणि अपयश यावर चर्चा झाली. इतिहासातील अनेक दाखले सांगून झाल्यावर अपयशी व्यक्तींनी आपले ध्येय कसे पूर्ण केले याची माहिती त्यांना दिल्यावर एक जाणीव झाली की हे ज्ञान मुलांनाच नाहीतर पालकांना सुध्दा देणं आवश्यक आहे.

काही तरी नवीन करून दाखवण्यासाठी आतुर असलेल्या प्रत्येकानं ध्येयपूर्तीच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकायलाच हवं. मात्र यासाठी मतभेद, कामात आळस किंवा फारशी तीव्र नसलेली महत्त्वाकांक्षा यांना बिलकूल स्थान नाही. आपल्या जीवनात जे जे यशस्वी झालेत, त्यांच्या आयुष्याकडे पाहिलं तर लक्षात येईल की, त्यांची सुरुवात ही काही फारशी चांगली नव्हती. आपल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना अनेक निराश करणाऱ्या अडथळ्यांचा सामना करावा लागला होता. कदाचित, यशस्वी माणसांच्या जीवनातला हा अत्यावश्यक बदलाचा एक क्षण अडचणीच्या प्रसंगी वा अपयशाशी सामना करतानाच येतो आणि तोच तुमच्या सुप्त अशा व्यक्तित्वाला प्रकाशात आणतो.

एखाद्या गोष्टीची इच्छा करणे आणि ती गोष्ट प्रत्यक्ष स्वीकारण्यासाठी तयार असणं या दोन्हींत बरंच अंतर आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनाशी ती गोष्ट तुम्हाला मिळणारच आहे, अशी ठाम विश्वासाची खूणगाठ बांधत नाही, तोपर्यंत तुम्ही ती गोष्ट स्वीकारण्यासाठी पूर्णतः तयार झालेले नसता. अशी मनःस्थिती म्हणजे केवळ इच्छा वा आशा नव्हे, तर ती आहे ठाम विश्वासाची मनःस्थिती. जेव्हा तुमचं मन (सर्व शक्यता स्वीकारायला) खुलं असतं, तेव्हाच असा विश्वास निर्माण होतो. चौकटींनी आखून घेतलेल्या बंदिस्त मनात अशी श्रद्धा, धैर्य आणि विश्वास वसत नाही.

एक लक्षात घ्या की, दुःख आणि गरिबी यांचा स्वीकार करण्यासाठी आपल्याला जेवढे प्रयत्न करावे लागतात तितकेच प्रयत्न जगण्याचा उच्च हेतू, श्रीमंती आणि वैभव मिळवण्यासाठी करावे लागतात.

‘तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनाच तुम्हाला श्रद्धा, विश्वास ठेवायला शिकवतात, आपण फक्त ते मनापासून केलं पाहिजे. आपल्या प्रत्येकाला निसर्ग योग्य मार्गदर्शन करत असतो. ते आपण योग्यप्रकारे ग्रहण केल्यास आपल्याला त्याचे नेमके शब्दही ऐकू येतात.’ आणि तो नेमका शब्द आहे इच्छा! इच्छाशक्ती! ठाम, दृढ इच्छाशक्ती!!

म्हणूनच, तुम्हाला जे करायचं आहे ती तुमची आकांक्षा योग्य असेल आणि तुम्हाला तसा ठाम विश्वास असेल, तर निर्भयतेनं पुढे या आणि तुमचं स्वप्न पुरं करून दाखवा. तुमची स्वप्नं साकारताना जरी तात्पुरतं अपयश आलं, तरी खचून जाऊ नका आणि लोक काय म्हणतील याची तर अजिबातच फिकीर करू नका. कारण अपयशातच यशाची बीजं दडलेली असतात. याची त्या लोकांना मुळात जाणीवच नसते.

संपत्ती मिळवण्याच्या शर्यतीत धावणाऱ्या आपल्यासारख्या लोकांना नव्या जगाची बदललेली मागणी जाणून घेण्यासाठी आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. नव्या कल्पना, नवीन कार्यप्रणाली, नवे पुढारी, शिक्षणाच्या नव्या पद्धती, नवी पुस्तकं, नवीन वाद्य, टी.व्ही.च्या तंत्रज्ञानातील अत्याधुनिक सुधारणा, नव्या सोयी, स्टार्टअपसाठीच्या नव्या कल्पना या सर्व मागण्या नवीन जगाच्या आहेत. आपल्या उद्देशाची निश्चितता, आपल्याला नेमकं काय हवंय त्याचं ज्ञान आणि ते मिळवण्याची ज्वलंत महत्त्वाकांक्षा या गोष्टी जिंकण्यासाठी आवश्यक आहेत, ज्या नव्या सुधारित गोष्टींच्या मुळाशी आहेत.

प्रयत्न करून आपण नाविन्याचा ध्यास आणि अपयश याबाबत कौटुंबिक, शालेय स्तरावर चर्चा घडवलीच पाहिजे. तरच उद्याची पिढी, आजचा भरकटलेला युवक, कोविड ने विस्थापित केलेला वर्ग योग्य मार्गावर येईल.

 

1 thought on “नाविन्याचा ध्यास आणि अपयश”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *