अहंकार आणि मानसिकता

अजय आणि योगिता दाम्पत्य लग्नानंतर काही महिन्यांनी स्वभाव जुळत नाही म्हणून समुपदेशन घेण्यास आलेले. पहिल्या पाच मिनिटात मुळ मुद्दा समजला. अहंकार!!! ज्या व्यक्ती स्वतःच्या व्यतिरिक्त इतरांच्या आवडी, श्रद्धा किंवा दृष्टीकोन याकडे दुर्लक्ष करतात, व स्वकेंद्रित: राहुन मीच कसा योग्य अशी भूमिका घेतात तेंव्हा होणारा कलह बऱ्याचदा अटळ असतो. अशा अहंकारी व्यक्तींना बऱ्याचदा अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागतं.

 

१. त्यांना इतर व्यक्तींबरोबर जुळून घेण्यास व दीर्घकाळ संबंध ठेवणे अवघड जाते.

२. स्वभावामुळे, कामाच्या ठिकाणी, नातेसंबंधात विघ्न येते. संघर्ष होतो.

३. मानसिक त्रास, आजार जडण्याची शक्यता

४. आर्थिक व सामाजिक नुकसान.

५. कित्येकदा व्यसनाच्या आहारी जाऊ शकतात.

 

घरच्या मंडळीला अशा व्यक्तींची जाणीव असते परंतु बाहेरील दुनियेत वावरणारा वर्ग कित्येकदा अनभिज्ञ असतो. कसं ओळखणार अहंकारी व्यक्तीला…

 

१. मधेच तुमचे म्हणणे खोडून काढतील.

२. त्यांची कदाचित वरिष्ठ पदी नियुक्ती असेल. त्यामुळे मी म्हणेल तेच खरे अशी बोलण्याची वृत्ती.

३. खूप मोठ्याने बोलून आपले म्हणणे मांडणे.

४. त्यांना हरायला आवडत नाही. हरले की चिडचिड करणार.

५. अशा व्यक्ती कित्येकदा मोठ्या समूहात आपली एक इमेज मिरवत असतात व त्याची कुणी दाखल घेत नाही. त्यांना त्याचा अपमान वाटतो.

६. ते नेहमी जिंकल्याच श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात.

७. स्वतःचे असे इतर व्यक्तींबद्दल मत असते. व ते दुसऱ्या कुणाचे मत मानत नाहीत.

८. ते इतरांना तुच्छ लेखून पुढे जातात.

९. अशा व्यक्ती अहंकारी माणसांबरोबर टिकतात.

१०. कुणावर विश्वास न ठेवणे.

११. टीमवर्क मध्ये सामावून न घेणे व आपलेच मत पुढे रेटने. भांडण करणे.

 

अजय व योगिता मध्ये हाच एक प्रॉब्लेम होता. अजयला अहंकार व तिला त्याचा स्वभाव बदलायचा होता. अशा वेळेस, संसाराचा त्याग करण्याऐवजी समुपदेशन घेण्यात शहाणपण आहे. दोघांना स्वतः मध्ये काही बदल करणे अपेक्षित आहे, जसे की.

 

१.कुठे अहंकाराला स्वाभिमान बनवायचा ते ओळखण्यात एकमेकांना मदत केली तर चांगले फरक दिसून येतात.

२.त्या व्यक्तीचा मूड पाहून त्याला चांगल्या वागणुकीसाठी प्रोत्साहित करणे चांगले.

३.अशा व्यक्तींकडून सॉरी ची अपेक्षा न केलेली बरी.

४.मूड बदल होत राहतात म्हणून त्याची सवय लावलेली बरी.

५.नकारात्मकता नेहमी दिसणार परंतु त्याकडे दुर्लक्ष केलेले चांगले.

६.समुपदेशन, व्यायाम खूप चांगली मदत करतात मानसिक शांती ठेवण्यासाठी.

७.राग, भीती, नैराश्य, मत्सर या गोष्टी नेहमी घडणाऱ्या आहेत त्यासाठी मानसिक तयारी ठेवावी लालागते

८. या व्यक्ती इतरांना समजून घेण्यासाठी कमी पडतात त्यामुळे त्यांच्यामध्ये संवेदनशीलता वाढवणे आवश्यक आहे.(लहानपणापासून केले तर उत्तम)

९. आपण समोरच्या व्यक्तीच्या जागी असतो तर? हा विचार करण्याची सवय लावून घेतली तर बरेच प्रश्न आपोआप सुटतात.

१०.या सगळ्यांत मला बदलण्याची गरज आहे आणि मी बदलणारच असा निश्चय महत्त्वाचा.

 

अहंकारी व्यक्तीला आपण स्वतः चुका करतोय याची बऱ्याचदा जाणीव होते परंतु वेळ गेलेली असते म्हणून नंतर तणाव जाणवतो. अशा व्यक्तींसाठी कायमस्वरुपी तोडगा नाही परंतु समायोजनेतून आणि एकमेकांना समजून घेऊन पुढे चालणे क्रमप्राप्त. सुखी संसाराची सूत्रे आपल्याच हाती असतात. योग्य जोडीदार न मिळाल्यास त्याबरोबर राहणे ही एक कला आहे. बुध्दीजीवी मार्ग काढतात तरी काही काडीमोड करतात.

 

तोंडाळासीं भांडों नये | वाचाळासीं तंडोंनये |

संतसंग खंडूं नये | अंतर्यामीं ||९|| (दासबोध)

 

©श्रीकांत कुलांगे

9890420209

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *