आपला राग आणि आपण

आपण रागावतो वा उदास होतो, त्या वेळी आपल्या मनात त्या भावना (इमोशन) निर्माण करणारे अनेक विचार येत असतात आणि हे घडण्यामागे आपल्या मनातील काही समज जबाबदार असतात. हे समज स्वतः विषयी, इतर माणसांविषयी व परिस्थितीविषयी असतात. एखाद्या विद्यार्थ्याला कितीवेळा वाचूनसुद्धा ना समजल्याने तो उदास होतो; त्या वेळी त्याच्या मनात मला हे का समजत नाही, मला सगळं समजलंच पाहिजे असा त्याच्या मनात दृढ समज असतो. अपयश येता कामा नये असे वाटणे स्वाभाविक आहे, पण अपयश येऊच नये हा अविवेकी समज आहे. हा ‘च’ जेवढा तीव्र असतो, तेवढी येणारी उदासी अधिक असते. हीच उदासी नंतर रागाचे रूप घेते.

मानसशास्त्रीय कारणे पहिली तर त्यात प्रामुख्याने – तीव्र स्वयंकेंद्री असणार्‍या व्यक्ती, चुकीचे विचार आणि कल्पना यात गुरफटणार्‍या व्यक्ती,
चिकित्सा न करता मत बनवणार्‍या व्यक्ती, संशयी किंवा आनंदी वृत्तीचा अभाव असणार्‍या व्यक्ती, न्यूनगंड, इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.
या व्यक्तीमध्ये मनोविकाराचे, तसेच शारीरिक आजाराचे प्रमाण जास्त असते.अस्वस्थता, बेचैनी, नैराश्‍याची भावना, तसेच रक्तदाब, मधुमेह, संधिवात, हृदयविकार, व्यसनाधीनता, आत्महत्येची प्रवृत्ती, अपघातांचे वाढते प्रमाण इत्यादींचे प्रमाण जास्त असते. म्हणजेच अनियंत्रित राग, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात दुष्परिणाम घडवून आणतो. रागाची भावना काही प्रमाणात अनुवंशिक असू शकते. समाज जर मानसिकरित्या संतुलित ठेवायचा असेल तर अशा व्यक्तींची आपण प्रत्येकाने मदद करणे गरजेचे आहे. कारण शेजारी चांगला तर आपण चांगले हा फंडा सगळीकडेच लागू होतो.

रागावर नियंत्रण ठेवायचे का? मग हे कराच;
पहिली पायरी म्हणजे आपण रागावलो आहोत, हे ओळखणे किंवा मान्य करणे.
इतके रागावणे योग्य आहे का, याचा विचार करणे.
आपल्या रागावण्याचे आपल्याच मनावर, कुटुंबावर आणि शरीरावर काय परिणाम होतील, याचा विचार करणे
समोरच्या व्यक्तीच्या ठिकाणी आपण स्वतः आहोत, अशी कल्पना करणे.
आपला विचार, आपली मते सतत तपासून पाहणे-माफ करणे, सोडून देणे या गोष्टी मोठ्या असतात. त्यांचा विचार करणे.
आपला राग खरेच अनावर होत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे.

प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरी प्रत्येक वेळी यशोशिखर गाठता येतेच असे नाही. खेळांत, निवडणुकांत हार-जीत असतेच. उत्तम अभ्यास करूनदेखील परीक्षेत अपयश येऊ शकते. याचे भान राहिले नाही, की उदासी मनात घर करते. अशा वेळी मित्र, आजी आजोबा, आई वडील, भाऊ बहीण यांच्याशी विचार विनिमय केला तर छान फरक पडतो. विवेकनिष्ठ मानसोपचारात वर्तमान स्थिती आणि भविष्यातील अपेक्षा यांचा तटस्थपणे विचार केला जातो. यश मिळण्यासाठी अनेक घटक जमून यावे लागतात. त्यातील कोणते घटक आपल्या नियंत्रणात आहेत आणि कोणते नाहीत, यांचा विचार करून आपले सारे प्रयत्न नियंत्रणात असलेल्या घटकांवर कसे लावता येतील हे पाहणे गरजेचे असते. मनातील अविवेकी समज बदलले की विचारप्रक्रिया बदलते आणि विघातक भावनांची तीव्रता कमी होते. मानसिक आजार होऊ द्यायचा नसेल तर रागापासून चार हात दूर राहिलेलेच बरे.

श्रीकांत कुलांगे
9890420209

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *