अनेक लोक संताप आणि चिडचिड करून शक्ती आणि ऊर्जा वाया घालवतात आणि आयुष्य विनाकारण कठीण करून टाकतात. त्यापैकीच एक आगुस, इंडोनेशिया देशातील एक मित्र काल मला जकार्ता येथे भेटला. त्याच्या बायकोने त्याला अल्टिमेटम दिलाय, राग सोड नाहीतर मी तुला सोडेन. शीघ्रकोपी असणारा आगुस् शांतीच्या शोधात मला भेटला आणि आम्ही त्याच्या या अवस्थेकरिता कारणीभूत घटक शोधायला घेतले.
१. सिगारेट एका पाठोपाठ पिणं.
२. अतिघाईत काम करणं.
३. पूर्ण कामाचं स्वरूप न ऐकता कामाला सुरुवात करणं आणि नंतर बोलणे खाणं.
४. बायकोची बडबड व निरंतर चौकश्या.
५. घरगुती प्रश्न, बायकोचे त्याच्या आईशी होणारे वाद.
६. आर्थिक टंचाई. बेसिक सुविधांची वानवा.
७. मित्रांनी त्याला प्रसंगी मदत न करणं.
८. मानसिक कुचंबणा. त्यामुळे शारीरिक आजार.
९. भांडखोर वृत्ती. सबुरीची कमी. जगाकडे पाहण्याचा चुकीचा दृष्टीकोन.
हनुमानाच्या शेपटीप्रमाने लिस्ट वाढत गेली. मतितार्थ, अनेक भानगडीत अडकलेला अगुस स्वतःच्या रागावर सुद्धा नाराज होता. बायको का रागावते हे माहीत असून सुध्दा तो काही करू शकत नव्हता. बियरचा मस्त घोट घेत त्याच्या संतापी वृत्तीवर तोडगा काढायचा प्रयत्न केला.
१. सर्वात प्रथम संताप येतो आणि मला तो कमी करायचा हे मनाला नेहमीं सांगणं, हे पहिले पाऊल.
२. या नियंत्रणासाठी वेळ लागतो व परिश्रम व सातत्य आवश्यक.
३. कामाचा वेग थोडा कमी करणं, व एक वेळी एक काम करण्याची सवय लावून घेण्यासाठी प्रयत्न.
४. ज्यावर आपला कंट्रोल नाही, त्या गोष्टींचा विचार न करणं हेच चांगलं, परंतु त्यामुळे आपल्यावर परिणाम होत असेल तर, मात्र त्यासाठी पर्याय शोधणं सोपं.
५. मेडीटेशन किंवा प्रार्थना मनापासून करण्याचा प्रयत्न. वेळ लागतो पण इतरांच्या साहाय्याने शक्य होते.
६. आर्थिक व प्रापंचिक अवस्था कित्येकदा आपण निर्मित केलेली असते तर काहीवेळा नैसर्गिक. त्यासाठी, पैसे सांभाळून वापरणं, स्मोकिंग, छंदावर नियंत्रण,
७. घरात शांतता ठेवणं महत्वाचं, त्यासाठी कमी बोलणं, संगीत, वाचन, शांत ठिकाणीं सहकुटुंब नियमित जाणं.
८. गोंगाट आणि जेवणाची अनियमितता मानसिक ताण निर्माण करून आपल्या हृदयाची धडधड वाढत नेते. म्हणून वेळेवर जेवण आणि काहीवेळ अलिप्तता महत्वाची.
९. कुटुंबाचे प्रश्न सोडविण्याची मानसिकता. नवरा बायको, दोघांनी एकमेकांना आधार देऊन आत्मविश्वास वाढविणे.
१०. अध्यात्म व शिक्षणाचा नियमित वापर.
११. व्यायाम, समुपदेशन, यांचा फायदा नक्कीच होतो.
१२. सभोवालच्या सौंदर्याची जाणीव करून घेणं आवश्यक. मेंदूला थोडी उसंत मिळते, ऊर्जा भेटून सुपीक आयडिया सुचली जाते.
१३. भौतिक सुविधा किती हव्यात हे आपण ठरवल तर संताप कमी होईल.
१४. अगुसला एक सल्ला दिला, दर आठवड्यातून एकदा अर्धा दिवस स्मशानात, दफनभूमीत घालवावा.आयुष्याच खरं स्वरूप तिथेच.
इंडोनेशिया प्रमाणे भारतातसुद्धा मोठमोठ्या शहरातील लोक मानसिक ताण, कृत्रिम उत्तेजना आणि गोंगाटाने पीडित आहेत. पण आता हा आजार ग्रामीण भागातही झपाट्याने हातपाय पसरू लागला आहे, कारण हवेच्या लहरी ताणतणाव प्रसृत करतात.
“आयुष्य म्हणजे रहाटगाडगे.’’ दैनंदिन जीवनातील वाढत्या जबाबदाऱ्या, दडपणं आणि ताणतणाव आपल्याला दिसून येतात. दैनंदिन जीवनाच्या आपल्यावरील सततच्या आग्रही मागण्यांचे आपल्यावरील दडपण हे चीड, राग आणणारे आहे. रात्री अंथरुणात शिरेपर्यंत आपली अवस्था पिळलेल्या कपड्यासारखी होते. कशासाठी आणि कुणासाठी??
आपण स्वत:ला कायमसाठी शांतपणाची सवय लावायला हवी. जर त्यामुळे आपल्या जीवनात होणारा फायदा हवा असेल तर ते करावेच लागेल.
जीवनाच्या वेगवान लयीला जे बळी पडले आहेत, त्यांनी सावकाश वल्हवण्यासाठी किंवा संथगतीने कामे करण्यासाठी आणि जिंकण्यासाठी आवश्यक असलेली गती टिकवून ठेवण्यासाठी, भगवंताच्या शांतीशी सुसंवाद साधायला हवा, त्याची कार्य करण्याची गती आपल्या मनात, आत्म्यात आणि अर्थातच शरीराच्या, प्रत्येक स्नायूत आणि प्रत्येक पेशीत रुजवायला हवी.
©श्रीकांत कुलांगे
9890420209