मेनोपोज

रजोनिवृत्ती बाबत अलीकडेच एक कार्यशाळा घेण्यात आली आणि त्यातून अनेक महिलांचे प्रश्न चर्चिले गेले. अर्थात ही सर्व क्रिया नैसर्गिक असूनही त्याबाबत पुरेशी माहिती नसते हे दिसून येते
आपल्या रक्तात अनेक घटकांपैकी हार्मोन हा एक घटक असतो, शरीरातील विविध ग्रंथींमधून स्त्रवणारे हे हार्मोन अतिशय अल्प प्रमाणात आपल्या रक्तात असतात, पण शरीराच्या जडणघडण अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. स्त्री जन्मल्यापासून हे हार्मोन शरीरात असतात, पण त्यांचं महत्त्वपूर्ण कार्य सुरू होतं पहिल्यांदा पाळी (MC) सुरू होते तेव्हा. ईस्ट्रोजन व प्रोजेस्टेरोन हे दोन हार्मोन्स गर्भाशयाच्या बाजूला असलेल्या ओवरीमधून तयार होतात. गरोदरपणातील आणि प्रसूतीनंतरचे काही दिवस सोडले तर हे हार्मोन पाळीची सायकल नियमितपणे चालू ठेवतात. गरोदरपणी हार्मोन्समध्ये होणारे बदल काही महिन्यांत पुन्हा पूर्वरत होतात.
हे बदल स्त्री सहजतेनं व स्वागतार्ह म्हणून स्वीकारते. पण हेच बदल वयाच्या ४५व्या वर्षानंतर कायम स्वरूपात पुढील आयुष्यभरासाठी होतात, तेव्हा अनेक समस्या तयार होतात. ईस्ट्रोजन व प्रोजेस्टेरोन या हार्मोन्सचं रक्तातील प्रमाण खूप कमी होतं. या बदलामुळे पाळी येणं कायमचं बंद होतं. यालाच आपण ‘रजोनिवृती’ म्हणजे ‘मेनोपॉज’ असं म्हणतो. ही रजोनिवृती साधारणत: वयाच्या ४५व्या वर्षी येते. कधी कधी दोन-तीन वर्षं अगोदर किंवा पाच-सात वर्षांनंतरही येऊ शकते.
२८ दिवसांच्या पाळीच्या सायकलमध्ये स्त्रियांच्या स्वभावामध्ये अल्प काळासाठी अनेक बदल होतात. जेव्हा पाळी बंद होते, तेव्हा स्त्रीच्या स्वभावामध्ये व शरीरात अनेक बदल होतात. जसे कि;
१) भावनिक बदल उदा. क्षणात उत्साही, क्षणात नैराश्य आल्यासारखं वाटणं.
२) भावनिक पातळीवर टोकाची भूमिका घेणं.
३) चिडचिड होणं, मानसिक ताण वाढणं.
४) योनीच्या ठिकाणी शुष्कता येणं. हॉट फ्लैशस (शरीरातून गरम वाफा निघाल्यासारखं वाटणं),
५) रात्री घाम येणं, डोकं दुःखणं, हात-पाय, सांधे दुखणं.
६) मन/चित्त एकाग्र न करता येणं, भीती वाटणं.
७) दुःखी होणं, अधीर होणं, निरुत्साहित वाटणं.
८) जोडीदार आपल्याला सोडून जाऊन दुसरं लग्न करेल का, याची भीती वाटणं.
९) एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणं.
१०) पाळीची अनियमियतता (जास्त रक्तस्त्राव, जास्त दिवस रक्तस्त्राव किंवा पंधरा दिवसांनी रक्तस्त्राव होणं).

वरील पैकी सर्वच लक्षणं एकाच स्त्रीमध्ये दिसतील असं नाही. यापैकी अनेक लक्षणं असतील तर त्याला ‘पोस्ट मेनोपॉजल सिंड्रोम’ असं म्हणतात. पाळी सुरू झाल्यावर भावनिक पातळीवर बदल होतात, त्यापेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीचे बदल रजोनिवृतीनंतर होतात. गृहिणी असो की नोकरी करणारी महिला, ही लक्षणं विविध स्वरूपात व्यक्त होतात. मात्र याची माहिती आपल्या समाजातील अनेक शिक्षित महिलांनासुद्धा नसते. त्यामुळे अनेक महिला काहीतरी समज किंवा गैरसमज करून घेतात.
खरं तर यात घाबरण्यासारखं काही नाही. ज्या स्त्रीमध्ये ‘पोस्ट मेनोपॉजल सिंड्रोम’ची लक्षणं असतील त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे की, तुम्हाला कोणताही आजार झालेला नाही. तुमच्या शरीरात जे काही बदल होत आहेत ते भावनिक आहेत. रजोनिवृतीबद्दल समुपदेशन (कॉउंसलिंग) होणं गरजेचं आहे. स्त्रीरोग तज्ञास दाखवल्यास ते गरजेनुसार मार्गदर्शन करतात. लक्षणांमध्ये तीव्रता जास्त असेल आणि रोजच्या जीवनात काही व्यत्यय येत असेल तर मानसोपचार किंवा मानसरोग तज्ज्ञाकडे पाठवलं जातं. लक्षणांच्या तीव्रतेनुसार मानसरोग तज्ज्ञ औषधं देतात किंवा मानसोपचार तज्ज्ञ (सायकॉलॉजिस्ट) समुपदेशन करतो. तीव्र स्वरूपाची लक्षणं असून उपचार न घेतल्यास पुढील आयुष्यभरासाठी मानसिक आजाराप्रमाणे लक्षणं राहू शकतात. त्यामुळे योग्य उपचार घेणं गरजेचं आहे. रजोनिवृतीनंतर हाडाचा ठिसूळपणा वाढू शकतो. या बरोबर अनेक आजारही होतात. त्या आजाराविषयी सविस्तर माहिती आपण घेणे जरुरी असते.
पोस्ट मेनोपॉजल सिंड्रोममधील मानसिक लक्षणं व कॅन्सरसारखे आजार, यांमुळे स्त्रीच्या जीवनास धोका निर्माण होऊ शकतो.
या सर्वांत महत्त्वपूर्ण असतं स्त्रीनं आपलं शरीर समजून घेणं. अशा वेळी योगा किंवा आध्यात्मिक कामात लक्ष गुंतवलं पाहिजे.
पुरुषांमध्ये रजोनिवृत्ती होते, ज्याला आपण एंड्रोपॉज (Andropause) म्हणतो, असे डॉक्टरांच्या एका गटाचे मत आहे. तर दुसरा गट एंड्रोपॉजचा सिद्धांत स्वीकारत नाही. 40 वर्षांनंतर सहसा काही हार्मोनल बदल होतात. एंड्रोपॉज या बदलांमुळे लक्षणे आणि कमी टेस्टोस्टेरॉनशी संबंधित आहे. या बदलांमुळं समोर येणारी लक्षणं आणि टेस्टोस्टेरोन कमी होण्याच्या प्रकाराला एंड्रोपॉजशी जोडून पाहिलं जातं. पुरुष रजोनिवृत्तीची लक्षणे (एंड्रोपॉज):

१. मूड बदलणे.
२. अशक्तपणा येणं.
३. आळस येणं.
४. अंगदुखी.
५. हाडे कमकुवत होणे.
६. काम करण्यात मन ना लागणे.
७. लैंगिक उत्तेजना कमी.
८. उदास वाटणे.

परंतु वरील लक्षणं संसर्गामुळं किंवा चयापचयाशी संबंधित आजारांमुळे सुध्दा उद्भवू शकतात. म्हणून लगेच कोणत्याही रुग्णावर एंड्रोपॉज असं लेबल लावण्याआधी सखोल तपासणी करणं फार महत्वाचं आहे. ही सर्व लक्षणे इतर कुठल्यातरी आजारामुळे किंवा समस्येमुळेही होऊ शकतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *