स्मित हास्य आणि आपण

खरे स्मित हास्य तसं दुर्मिळ असतं. परंतु आपल्या याच सवयीमुळे आपण चांगल्या प्रकारचे यश मिळवू शकतो. यामुळे काय साध्य होते यापेक्षा मी किती आनंदी राहतो याकडे लक्ष द्यायला हवं.

 

खोट्या हसण्यामुळे काहीही साध्य होत नाही, ही गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवायला हवी. नकली गोष्टी पाहिल्या बरोबर आपल्याला ओळखू येतात त्यामुळे आपल्याला त्या अजिबात आवडत नाहीत. वास्तविक पाहता खर्‍या स्मितामध्ये सर्वांचे मन जिंकण्याचे सामथ्र्य असते. मनाला स्पर्श करणारे स्मित, एक असे स्मित जे मनातून येते आणि मनापर्यंत पोहचते. त्यामुळे असे स्मित अनमोल असते, बहुमूल्य असते. स्मिताचा प्रभाव अतिशय शक्तिशाली आणि दीर्घकालीन प्रभावी असतो. कायम स्वरुपी असतो. मग तो प्रभाव कोणाला जाणवो अथवा न जाणवो. स्मित तुमच्या चेहर्‍यावर दिसत असते तसेच ते तुमच्या आवाजातूनही ऐकायला येत असते.

फक्त एक आठवडाभर दर तासाला कोणाकडे तरी बघून हसावे. त्याचा काय परिणाम होऊ शकतो ते तुम्हाला नंतर समजेल. ‘आपली चांगली वाईट कामे आपल्या भावनांवर अवंलबून असतात, असे आपण समजत असतो. वास्तवात मात्र कामे आणि भावना हातात हात घालून वाटचाल करीत असतात. कोणत्याही कामावर नियंत्रण मिळवून आपण आपल्या भावनांवरही नियंत्रण मिळवू शकतो. कारण कामांवर नियंत्रण मिळविणे सोप असते तर तुलनेने भावनांवर नियंत्रण मिळविणे अवघड असते. यावरून हेच स्पष्ट होते की आनंदी राहण्यासाठी आपण अशा प्रकारे बोलायला आणि वागायला हवे की आपण खरोखरच खूप आनंदी आहोत.

स्मित करणे किवा हसणे हे तुम्हाला खरोखरच अवघड काम वाटते का? तर मग या समस्येपासून सुटका मिळविण्याच्या दोन पद्धती आहेत. सर्वात पहिली बाब म्हणजे स्वत:ला हसण्यासाठी विवश करा. तुम्ही घरात एकटे असाल तेव्हा शिटी वाजवित गुणगुणत रहा. गाणे म्हणा, नाचा, काही तरी असे करा की त्यावरून तुम्ही खूप आनंदी आहात असे वाटेल. मग काही वेळा नंतर तुम्हाला आपोआपच या गोष्टी करण्यामध्ये आनंद वाटू लागेल.

स्मित हास्य आपल्याला व सभोतालच्या वातावरणाला, व्यक्तींना आनंदी बनवते. बघा प्रयत्न करून.

श्रीकांत कुलांगे

मानसोपचार तज्ञ

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *